Monday, 6 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०६ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      ग्रीन आशा या एलपीजी वाहक भारतीय जहाजाचं होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडून भारताकडे मार्गक्रमण

·      महाराष्ट्रात एलपीजी पुरवठा सुरळीत असल्याचा पुरवठा विभागाचा निर्वाळा

·      बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल

·      बीड जिल्ह्यात रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याप्रकरणी चार वैद्यकीय व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

·      छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामं गतीने पूर्ण करण्याचे रोहयो मंत्र्यांचे निर्देश

आणि

·      दिशा अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल लातूर जिल्ह्यातल्या चार शाळांची राज्यस्तरावर निवड

****

ग्रीन आशा या भारतीय जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून भारताकडे मार्गक्रमण सुरू केलं आहे. पश्चिम आशियामध्ये संघर्ष सुरु झाल्यानंतर ही सामुद्रधुनी पार करुन एलपीजी घेऊन भारतात येणारं हे नववं जहाज आहे. ४६ हजार ६५० मेट्रिक टन इंधन घेऊन आलेल्या ग्रीन सान्वी या जहाजानेही आपला प्रवास पूर्ण केला आहे. या भागातून भारतीय जहाजांची वाहतूक नियमितपणे सुरु आहे.

****

दरम्यान, महाराष्ट्रात एलपीजीचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचं, पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलं आहे. आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे पुरवठा नियंत्रक चंद्रकांत डांगे यांनी इंधन पुरवठा सुनिश्चितीबद्दल माहिती दिली. स्थलांतरित कामगारांसाठी पाच किलो छोट्या गॅस सिलिंडरची वाढीव मागणी तसंच ऑटो रिक्षांसाठी एलपीजीची वाढीव मागणी केंद्र सरकारकडे नोंदवल्याचं डांगे यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - चंद्रकांत डांगे

****

एअर इंडियाने इस्रायलला जाणाऱ्या विमानसेवा रद्द केल्या आहेत. तेल अविवला जाणारी विमान उड्डाणं येत्या ३१ मे पर्यंत स्थगित केल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. काही इस्रायली कंपन्या वगळता इतर सर्व कंपन्यांनी तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानसेवा स्थगित केल्या आहेत. इस्रायलमध्ये वास्तव्याला असणारे ४० हजार भारतीय यामुळे तिथे अडकले आहेत.

****

भारतीय जनता पक्ष आज आपला ४७ वा स्थापना दिन साजरा करत आहे. यानिमित्त पंतप्रधान तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात पक्षध्वजारोहण झालं.

दरम्यान, भाजपा मुस्लिमविरोधी असल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूरमधे भाजपाच्या स्थापनादिन सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपा कोणत्याही धर्माविरोधात नाही, देशाच्या परंपरा आणि सर्वांचं कल्याण होवो, या धारणेवर भाजपाचा विश्वास असल्याचं गडकरी यांनी नमूद केलं.

छत्रपती संभाजीनगर इथं भाजप स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यालय परिसरात ध्वजारोहण तसंच वंदे मातरम गायन झालं. यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

धाराशिव इथं भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस साजरा झाला. आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

****

राज्यसभा सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. या दोन्ही नेत्यांची महाराष्ट्रातून सभागृहावर पुन्हा निवड झाली आहे. नवनिर्वाचित खासदार माया इवनाते, रामराव वडकुते आणि डॉ.ज्योती वाघमारे या राज्यातून निवडलेल्या सदस्यांनीही आज शपथ घेतली.

बाईट – डॉ.ज्योती वाघमारे

****

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. या जागेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करु नयेत अशी विनंती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केली आहे. काँग्रेसनं बारामतीतून प्रदेश सचिव आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी एफआयआर दाखल केल्यास, काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेतला जाऊ शकतो, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीनं आज स्पष्ट केलं.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाचे अक्षय कर्डिले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्यावतीने गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या जागेसाठी आतापर्यंत चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

****

महिलांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यानुसार प्रत्येक महिलेनं आपल्या हक्कांचा वापर करावा, असं आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केलं आहे. दिल्ली इथं महिला-केंद्रित मुद्दे आणि सक्षमीकरण उपक्रमांवरील आकाशवाणीच्या कार्यशाळेत त्या आज बोलत होत्या. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित कायद्यांबद्दलच्या अज्ञानामुळे महिला न्याय मिळवण्यापासून वंचित राहत असल्याची खंत रहाटकर यांनी यावेळी व्यक्त केली.

****

बीड जिल्ह्यातल्या रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याप्रकरणी चार वैद्यकीय व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आयुष्यमान भारत मिशनअंतर्गत उपचार घेतलेल्या रुग्णांकडून १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ७३ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी निकाली काढलेल्या ६९ तक्रारींमध्ये जिल्ह्यातल्या चार रुग्णालय चालक डॉक्टरांवर रुग्णांकडून औषध आणि इंजेक्शन साठी अतिरिक्त पैसे वसूल केल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. अशा प्रकारच्या घटना आढळून आल्यास, फौजदारी कारवाई करण्याचे आदेश राज्याचे आयुष्यमान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी दिले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुरू असलेली कामे समन्वय आणि गतिशीलतेने पूर्ण करण्याचे निर्देश रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिले. गोगावले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी विभागाच्या विविध विकास कामांचा आज आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. भूसंपादनासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचे पूर्ण प्रस्ताव वेळेत सादर करावे, तीन महिन्याच्या आत मनेरगाची काम पूर्ण करून केंद्र शासनाने दिलेले उद्दिष्ट साध्य करण्याचं आवाहन गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केलं. ते म्हणाले -

बाईट - रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

****

दिशा अभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लातूर जिल्ह्यातल्या चार शाळांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. या निवडीचे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या हस्ते संबंधित मुख्याध्यापकांना प्रदान करण्यात आले. संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह, जीवन विकास प्रतिष्ठान मतिमंद विद्यालय, पांडुरंग निवासी मतिमंद विद्यालय आणि चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील संत गाडगेबाबा निवासी मतिमंद विद्यालय या शाळांचा समावेश आहे.

****

सात एप्रिल हा दिवस, जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. राज्याचे निवृत्त आरोग्य सेवा सह संचालक डॉ एकनाथ माले यांनी नागरिकांना आरोग्य राखण्याचा सल्ला दिला आहे. डॉ माले यांची मुलाखत परवा सकाळी पावणे अकरा वाजता प्रसारित होणाऱ्या आमच्या प्रासंगिक या सदरात आपल्याला ऐकता येणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात शासकीय कार्यालयांत कामावर असताना तंबाखू आणि गुटखा सेवन करणाऱ्या अकरा कर्मचाऱ्यांवर जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षानं दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत एक हजार ८८० रुपयांचा दंड वसूल केला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...