Wednesday, 15 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १५ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      वैद्यकीय सेवा क्षेत्रात नैतिक मूल्यांचे स्थान सर्वतोपरी-राष्ट्रपतींचं प्रतिपादन

·      शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्यावं-पंतप्रधानांचं आवाहन

·      नारी शक्ती वंदन अधिनियमावर चर्चेसाठी उद्यापासून संसदेचं विशेष अधिवेशन

·      सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर-सुमारे ९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

आणि

·      अमरावती लैंगिक छळ प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना

****

वैद्यकीय सेवा क्षेत्रात नैतिक मूल्यांचे स्थान सर्वतोपरी असून, तो मानवतेची सेवा करण्याचा मार्ग असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नागपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था – एम्सचा दुसरा दीक्षांत समारंभ आज राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिज्ञासा, संशोधन आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती आत्मसात करण्याचं आवाहन त्यांनी स्नातकांना केलं. नागपूर एम्सने थोड्याच कालावधीत आरोग्य, शिक्षण आणि संशोधनात प्रगती साधल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. आयुषमान भारतसह केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक योजनांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. त्या म्हणाल्या-

बाईट – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 

दरम्यान, या सोहळ्यात २१० विद्यार्थ्यांना पदवी आणि सुवर्ण पदकं प्रदान करण्यात आली. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रपती आज प्रत्यक्ष कर अकादमीत भारतीय महसूल सेवेच्या ७८ व्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रपती वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला उद्या उपस्थित राहणार असून, त्यानंतर त्या सेवाग्राम इथल्या गांधी आश्रमाला भेट देणार आहेत.

****

जलसंवर्धन, नैसर्गिक शेती ते तंदुरूस्ती आणि सेवा अशा नऊ क्षेत्रांच्या विकासासाठी नागरिकांनी समर्पण भावनेतून प्रामाणिकपणे काम करावं म्हणजे विकसित भारत ही संकल्पना सत्यात उतरेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले. कर्नाटकात नागमंगला इथं आदिचुनचनगिरी महासंस्थान मठातल्या मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्यावं, तसंच नागरिकांनी आपल्या भोजनातून तेलाचं प्रमाण किमान दहा टक्के कमी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं, ते म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकातल्या दुरुस्त्यांवर चर्चा करण्यासाठी उद्यापासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरु होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली. महिला आरक्षण विधेयक समतोल असून प्रत्येक राज्याच्या, समुदायाच्या आणि प्रदेशाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी समर्थ असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. सर्वांनी एकमताने हे विधेयक संमत करण्याचं आवाहन रिजीजू यांनी केलं.ते म्हणाले,

बाईट – संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू

या विधेयकामुळे महिलांना संसद आणि राज्य विधानसभांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण लागू होणार आहे. लोकसभेत हे विधेयक उद्या मांडल जाईल, त्यावर अठरा तास चर्चा अपेक्षित आहे, तर राज्यसभेत दहा तासांची चर्चा ठेवण्यात आल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. दरम्यान, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे.

****

बिहारचे चोवीसावे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते सम्राट चौधरी यांनी आज शपथ घेतली. पाटणा इथं राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी चौधरी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ही जबाबदारी म्हणजे लोकसेवेची एक पवित्र संधी असून, बिहारच्या जनतेसाठी समर्पितपणे काम करण्याचं आश्वासन सम्राट चौधरी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिलं आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईचा दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलींचं प्रमाण सुमारे ९५ टक्के तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण सुमारे ९२ टक्के असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या cbse.gov.in, results.cbse.nic.in, cbse results.nic.in. या संकेतस्थळांसह डिजिलॉकर आणि उमंग ॲपवरही पाहता येणार आहे.

****

कुख्यात गुंड अबू सालेमची सुटकेची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करताना दिलेल्या अटींनुसार भारतात २५ वर्षांचा तुरुंगवास पूर्ण झाल्याचा दावा सालेमनं आपल्या अर्जात केला होता. तर सालेमनं आतापर्यंत केवळ १९ वर्ष तुरुंगात घालवली असून त्याच्या मुदतपूर्व सुटकेचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही, असं सरकारकडून सांगण्यात आलं.

****

अमरावती इथं अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT अर्थात विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. १० पोलिस अधिकारी आणि ३६ कर्मचारी अचलपूरच्या सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्त्वाखाली या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. परतवाडा भागात घडलेल्या याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद अयाझ याच्यासह एकूण ४ जणांना अटक केली आहे. त्यांनी सुमारे १८० अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचं आक्षेपार्ह चित्रीकरण केलं, त्याच्या आधारे या मुलींना ब्लॅकमेल करून वेश्याव्यवसायात ढकललं असा आरोप आहे. दरम्यान, अचलपूर नगरपरिषदेनं आरोपीच्या घराचं अवैध बांधकाम आज जमीनदोस्त केलं. या घटनेच्या निषेधार्थ आज अचलपूर-परतवाडा शहरातली बाजारपेठ बंद ठेवण्याच्या निर्णयाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

****

एसटी महामंडळाचा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत एसटी महामंडळाच्या आढावा बैठकीत बोलत होते. महामंडळाचं दैनंदिन सरासरी उत्पन्न साडे ३१ कोटी रुपये असताना, खर्च ३३ कोटी रुपये इतका असून दररोज सुमारे दीड कोटी रुपयांचा तोटा होत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. लवकरच व्यापक सुधारणा आराखडा राबवण्यात येणार असल्याचंही मंत्री सरनाईक यांनी सांगितलं.

****

बाळासाहेब ठाकरे नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यात आज अपघात होऊन सहा जण जखमी झाले. केळीगव्हाण शिवारात आयशर आणि खासगी ट्रॅव्हल्स बस यांच्यात झालेल्या धडकेनंतर जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये दोन बालकांचाही समावेश आहे. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रोड सायकलिंग स्पर्धेला प्रारंभ झाला. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज-एआययू आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या चार दिवसीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज धुळे-सोलापूर महामार्गावर झाल्टा फाटा इथं मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेला उत्साहात सुरूवात करण्यात आली.

****

परभणी इथल्या बाल विद्या मंदिर शाळेच्या १९८५ च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांकडून वाहतूक पोलिसांना हेल्मेट, रुमाल, शेले आणि मोजे वाटपाचा उपक्रम आज राबवण्यात आला. पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्याकडून या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलं.

****

हवामान

राज्यातल्या काही जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागानं उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी तापमान वाढीचा यलो अलर्ट जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत उद्या उष्णतेच्या लाटेची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

शासकीय जमिनींवरील एक जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींनी डिसेंबर २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत,सं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा.जी सी. यांनी केलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 15 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...