Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 19 April 2026
Time 11.00 to
11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ एप्रिल
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
भारताचे उपराष्ट्रपती सी. पी.
राधाकृष्णन आपल्या दोन दिवसीय श्रीलंका दौऱ्यासाठी आज कोलंबो इथं दाखल झाले आहेत. भारतीय
उपराष्ट्रपतींचा हा श्रीलंकेतील पहिलाच अधिकृत द्विपक्षीय दौरा आहे.
या दौऱ्यामुळं भारत- श्रीलंका
यांच्यातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध अधिक बळकट होतील, तसंच दोन्ही देशांतील लोकांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळणार आहे.
****
अक्षय्य तृतीयेचा सण आज सर्वत्र
उत्साहात साजरा केला जात आहे. वैशाख शुद्ध तृतीयेची ही तिथी म्हणजे हिंदु धर्मियांच्या
साडेतीन मुहुर्तांपैकी एक असं याचं महत्व आहे. कधीही नाश न होणारं चिरंतन सुख आणि समृध्दीचं प्रतीक म्हणून हा दिवस साजरा
होतो. या दिवशी नवीन कामांचा शुभारंभ केला जातो. सोने खरेदी, गृह खरेदी, वाहन खरेदीकडेही नागरिकांचा कल असतो. या आखाजी अर्थात
अक्षय तृतीयेनिमित्त बाजारपेठ आंबे, डांगर आणि मातीच्या घागरींनी
सजली आहे. आपल्या पित्रांच्या पुजनासाठी आखाजीला घागर भरुन आंब्याचा रस, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्यातील
प्रमुख शहरांच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान
अक्षय्य तृतीयेच्या या शुभमुहूर्तावर राज्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळेही होतात.
याच दिवशी बालविवाह रोखण्यासाठी राज्य प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. महिला आणि
बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी काल या संदर्भात राज्यातल्या विविध
यंत्रणांची दूरस्थ माध्यमातून बैठक घेतली. ग्रामीण पातळीपासून जिल्हास्तरापर्यंत विविध
यंत्रणांनी बालविवाह रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
****
आज भगवान परशुराम तसंच महात्मा
बसवेश्वर यांची जयांतीही साजरी होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांसह
विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आकाशवाणी चौकात महात्मा
बसवेश्र्वर जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे.
****
पवित्र चार धाम तिर्थ यात्रेचा
आज शुभारंभ होत आहे. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री आणि यमुनोत्री मंदीरांचे दरवाजे दर्शनासाठी
आज खुले होत आहेत. गंगोत्रीला थोड्याच वेळेत दुपारी सव्वा बारा वाजत आणि यमुनोत्रीला
आज दुपारी बारा वाजुन पसतीस मिनिटांनी दरवाजे उघडतील.
****
येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल तर काही ठिकाणी
हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
राष्ट्रीय महिला आयोगाच्या
अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाच्या चार सदस्यीय तथ्यशोध समितीनं
नाशिकच्या टीसीएस कंपनीमधील कथित धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या
चौकशीसाठी काल नाशिकमध्ये तपासाला सुरुवात केली. असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
तर, अमरावतीच्या परतवाडा येथील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. तपासाचा
अहवाल दर ५ दिवसांनी सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत
एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक करत आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज
दोन सामने होणर आहेत.
पहिला सामना दुपारी साडेतीनला
कोलकाता नाईट रायडर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात कोलकाता इथं होईल. तर, दुसरा सामना
सायंकाळी साडेसात वाजता नविन चंदीगढ इथं पंजाब किंग्ज आणि लखनऊ सपर जायंटस यांच्यात
होणार आहे. काल झालेल्या सामन्यात सनरायर्स हैदराबादनं चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवला. तर,दिल्ली कॅपिटलनं रॉयल चॅलेजर्स बंगरुळूवर मात केली.
****
पनवेलजवळील पाडेघर येथे 'जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड' या मालवाहू
कंपनीच्या रसायनांच्या गोदामाला काल भीषण आग लागली. आगीचा भडका आणि स्फोटांच्या आवाजा मुळं परिसरात घबराट पसरल्यानंतर काही
काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ही कंपनी NH-4B महामार्गालगत
९७ एकर परिसरात पसरलेली असून जेएनपीटी पासून ११ किमी अंतरावर आहे. आगीत जीवित हानी
झालेली नसून दूर्घटनेचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसल्याचं आमच्या प्रतिनिधीनं
कळवलं आहे.
****
वाशीम जिल्हा परिषद कृषी विकास
अधिकारी अभिजीत देवगिरकर यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा 'राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार' जाहीर झाला
आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या "खत उपलब्धता पोर्टल" या संकेतस्थळाचं नाविन्यपूर्ण 'वाशीम मॉडेल' विकसित करून, संपूर्ण महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये ते यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल त्यांना
गौरवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परवा २१ एप्रिल रोजी नागरी सेवा दिवसाच्या औचित्याने मुंबईत समारंभपूर्वक
त्यांना हा पुरस्कार प्रदान होणार आहे.
****
No comments:
Post a Comment