Thursday, 16 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 16 April 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता

****

नारीशक्ती वंदन अधिनियमातील महत्त्वाच्या घटनात्मक सुधारणेवर चर्चा करण्यासाठी आजपासून संसदेचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन सुरु झालं. या विधेयकावर लोकसभेत अठरा तास, तर राज्यसभेत दहा तास चर्चा होणार आहे. या विधेयकात लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण प्रस्तावित आहे. त्याचबरोबर लोकसभेच्या जागा ८५९ पर्यंत वाढवण्याची तरतूद असून, मतदारसंघ पुनर्रचनेद्वारे या जागा वाढवण्यात येणार आहे. ही पुनर्रचना २०११ च्या जनगणनेच्या आधारे केली जाणार आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकांपासून महिला आरक्षण लागू करण्याचा सरकारचा मानस आहे. लोकसभेत आज हे विधेयक मांडण्यात येणार आहे.

**

संसदेच्या या विशेष सत्रात देश महिला सशक्तिकरणाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचललं जात असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या आशयाचा एक संस्कृत श्लोक त्यांनी सामाजिक माध्यमावर सामायिक केला. देशातल्या महिलांचा सन्मान करणं, म्हणजेच राष्ट्राचा सन्मान करणं असून, याच भावनेसोबत देश पुढे जात असल्याचं पंतप्रधानांनी यात म्हटलं आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते सुवर्णपदकं प्रदान केली जाणार असून, एकूण आठ विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांत उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे.

****

देशात आता नक्षलवादी हिंसाचाराने ग्रस्त एकही जिल्हा उरलेला नसल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. व्यापक नक्षलविरोधी मोहिमेनंतर प्रथमच गृहमंत्रालयाने नऊ राज्यांना अधिकृत पत्र पाठवत ही माहिती दिली. ३१ मार्चपर्यंत नक्षलवादमुक्त भारताचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं, त्यानुसार उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सध्या केवळ झारखंड मधला सिंगभूम जिल्हा काही प्रमाणात संवेदनशील असला तरी तिथेही नक्षलवादी हिंसाचारावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं. नऊ राज्यांमधले ३७ जिल्हे पूर्णपणे नक्षलवादमुक्त झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तरीही या भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था कायम ठेवून विकासकामांना गती देण्यावर भर दिला जाणार आहे. १९६७ साली पश्चिम बंगालमधल्या नक्षलबारी इथून सुरू झालेल्या नक्षलवादामुळे गेल्या पाच दशकांत १७ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे.

****

गृह मंत्रालयाकडून जनगणना २०२७ चा पहिला टप्पा असलेल्या घरनोंदणी आणि गृहगणना साठी क्षेत्रीय कार्याला आजपासून सुरुवात होत आहे. ही मोहीम अंदमान आणि निकोबार बेट, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, मिझोराम, ओडिशा आणि सिक्कीम यांसारख्या अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवली जाईल. पुढील ३० दिवसांमध्ये, प्रशिक्षित गणक माहिती गोळा करण्यासाठी घरोघरी भेटी देतील, जो जनगणना प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

****

विचारांची आणि मनाची स्वातंत्रता हीच खरी लोकशाही असल्याचं मत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केलं. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रातर्फे, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात ते काल बोलत होते.

****

लातूर इथल्या ममदापूर पाटी या ठिकाणी महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आज होत आहे. या अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांचे लाभ देण्यात येणार आहे.

****

राज्य शासनाच्या चला जाणुया नदीला; या अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातल्या नंदिनी नदीच्या संवर्धनासाठी नदी पात्रातील गाळ आणि माती काढण्याच्या कामाचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. या कामामुळे नदीचं पुनरुज्जीवन होण्यास मदत होणार असून, पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढल्यानं नदी बारमाही होण्यास चालना मिळेल.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या एकल महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी प्रशासनाने पाऊल उचललं आहे. जिल्ह्यातल्या ३१ हजार एकल महिलांना बचत गटांशी जोडून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'मिशन मोड'वर काम करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.

****

१५ व्या युरोपियन गर्ल्स गणित ऑलिम्पियाडमध्ये मुंबईच्या श्रेया मुंदडा हिनं सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत केरळच्या संजना चाको हिला रौप्य पदक, तर तामिळनाडूच्या शिवानी कुमार हिला कांस्य पदक मिळालं. फ्रान्समधल्या बोर्डो इथं ९ ते १५ एप्रिल दरम्यान झालेल्या या स्पर्धेत ६७ देशातल्या २६० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

****

बुद्धीबळपटू आर वैशालीनं फिडे महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेत विजय मिळवत जागतिक अजिंक्यपद लढतीसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. १५ वर्षांनंतर जागतिक किताबासाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धीबळपटू ठरली आहे.

****

राज्यात पुढचे दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यात तापमानात लक्षणीय वाढ झाल्यामुळे अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...