Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 April 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ एप्रिल २०२६
सायंकाळी ६.१०
****
· पश्चिम आशियातल्या युद्धविरामाचं भारताकडून स्वागत - सर्व भारतीयांना लवकरात लवकर
इराण सोडण्याचा सल्ला
· खरीप हंगामासाठी डीएपीवरील अनुदानात वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
· काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी केंद्रीय मंत्री मोहसीना किडवई यांचं निधन
· शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा भाजप प्रवेश
आणि
· भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाला प्रारंभ
****
पश्चिम आशियातल्या युद्धविरामाचं भारताकडून स्वागत करण्यात आलं
आहे. दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर अमेरिका आणि ईराणने सहमती दर्शवल्यामुळे पश्चिम
आशियात शांतता पुनर्स्थापित होईल, आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून
जलवाहतुक तसंच जागतिक व्यापार सुरळीत होईल, असा
विश्वास परराष्ट्र मंत्रालयाने वर्तवला आहे. हा संघर्ष कायमस्वरूपी थांबावा, अशी अपेक्षाही भारताने व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर
जयस्वाल यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले -
बाईट - रणधीर जयस्वाल
इराणमध्ये असलेल्या सर्व भारतीयांनी लवकरात लवकर इराण सोडण्याचा
सल्ला परराष्ट्र मंत्रालयानं दिला आहे. भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहून आणि त्यांनी
सांगितलेल्या मार्गांचा वापर करूनच बाहेर पडावं, असं
मंत्रालयानं म्हटलं आहे. दूतावासाशी चर्चा केल्याशिवाय कोणत्याही आंतरराष्ट्रीय भूसीमेकडे
जाण्याचा प्रयत्न करू नका, असंही मंत्रालयानं जारी केलेल्या
मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगितलं आहे.
मदतीसाठी भारतीय दूतावासानं ९८-९१-२८-१०-९१-१५, आणि ९८-९९-३२-१७-९३-५९ हे मोबाईल क्रमांक जारी केले असून परराष्ट्र मंत्रालयाच्या
ईमेलवर संपर्क साधता येईल असं म्हटलं आहे.
****
खरीप हंगामासाठी डीएपीवरील अनुदानात वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय
मंत्रिमंडळाने घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी
मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. ते म्हणाले -
बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
राजस्थानातला हा तेल शुद्धीकरण प्रकल्प येत्या जुलै महिन्यात
कार्यान्वीत होणार आहे. या प्रककल्पामुळे दहा हजार प्रत्यक्ष रोजगार तर मोठ्या प्रमाणावर
अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे देशाची तेल शुद्धीकरण क्षमता
नऊ दशलक्ष मेट्रिक टनानं वाढणार आहे.
****
रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पतधोरण आढावा समितीच्या ३ दिवसीय बैठकीत झालेले निर्णय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी
आज जाहीर केले. त्यानुसार रेपो दर सव्वा ५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय पतधोरण
आढावा समितीनं एकमतानं घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
****
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसीना
किडवई यांचं आज नोएडा इथल्या रुग्णालयात
निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. उत्तर प्रदेशातल्या मेरठ मतदारसंघाचं त्यांनी
सलग ३ वेळा प्रतिनिधित्व केलं. २००४ ते २०१६ या काळात त्या छत्तीसगढ मधून राज्यसभेवर
निवडून गेल्या होत्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी ग्रामविकास, आरोग्य आणि कुटुंबकल्याण, परिवहन, नगरविकास अशा विविध खात्यांचं मंत्रिपद सांभाळलं होतं. काँग्रेसच्या अखिल भारतीय
कार्यकारिणीच्या त्या सदस्य
म्हणून त्या कार्यरत होत्या.
****
व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी आणि महाराष्ट्र राज्य
यांच्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. ही कंपनी महाराष्ट्रात शाश्वत
नागरी विकास,
औद्योगिक व पर्यटन वृद्धी, नवीकरणीय
ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात सुमारे साडे आठ अब्ज अमेरिकन डॉलर्सची
गुंतवणूक करणार आहे. विन ग्रुप कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यात शाश्वत विकास, हरित ऊर्जा,
आधुनिक पायाभूत सुविधा आणि गतिशील वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
या कराराअंतर्गत विन ग्रुपकडून पुढील दोन वर्षांत मुंबई महानगर
प्रदेशासह राज्यातील इतर निवडक ठिकाणी ५ हजार एकर क्षेत्रावर विविध प्रकल्प उभारले
जाणार असून,
या माध्यमातून सुमारे २४ हजार ७०० थेट रोजगार निर्माण होण्याची
अपेक्षा आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र
पवार पक्षाचे नेते आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, त्यांचे पुत्र राजे अखिलेश सिंह, राजे विरेंद्रसिंह घाटगे, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष
जयंत रावण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपा
प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या
सर्वांचं पक्षात स्वागत केलं.
****
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या
ज्ञानभारतम् या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला
गेल्या १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे. सर्वेक्षणासाठी ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत
ग्यान भारतम हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आलं असून त्याद्वारे हस्तलिखितांचं क्षेत्रीय
मूल्यांकन,
पडताळणी तसंच दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. यानिमित्ताने
नागरिकांकडे जर काही हस्तलिखितं असतील तर त्याची माहिती ज्ञानभारतम् या मोबाईल ॲपवर
अपलोड करावी असं आवाहन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी केलं आहे.
****
महिलांचं शोषण आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेल्या
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात
सुनावणी पार पडली. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपी अशोक खरात याला दूरदृश्य प्रणालीद्वारे
न्यायालयात हजर करण्यात आलं. सुनावणीदरम्यान न्यायालयाने अशोक खरात याला दुसऱ्या गुन्ह्यात
१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसंच, आरोपीला
उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे आदेशही न्यायाधीशांनी दिले.
दरम्यान, दुसऱ्या गुन्ह्यात कोठडी मिळाल्यामुळे
अशोक खरात याला मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात येणार आहे.
****
नांदेड इथे आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता
सप्ताहाचं आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत आयोजित या समता सप्ताहाद्वारे येत्या
१४ तारखेपर्यंतच्या कालावधीत समाज कल्याण विभागाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत
पोहचवण्यासाठी जनजागृती कार्य करण्यात येणार असल्याचं समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे
यांनी यावेळी सांगितलं.
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातही
सामाजिक समता सप्ताहाचं उद्घाटन आज करण्यात आलं. फुले-आंबेडकर विचार केवळ अभ्यासापुरते
न ठेवता दैनंदिन जीवनात आचरणात आणणं गरजेचं असल्याचं कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यावेळी
म्हणाले.
महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती
महोत्सवानिमित्त या सामाजिक
समता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावी वर्गातील विद्यार्थ्यांची
पटपडताळणी ११,
१५ आणि २२ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात एकूण दीडशे पथकांच्या माध्यमातून ही पटपडताळणी केली जाणार आहे. जिल्ह्यात
जिल्हा परिषदेच्या २ हजार ८४ प्राथमिक शाळा तर अनुदानित प्राथमिक शाळांची संख्या २९२
एवढी आहे. या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या सुमारे २ लाख विद्यार्थी संख्येची पट पडताळणी
करण्यात येणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातही सर्व शाळांमधील इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवी
आणि इयत्ता नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांची पट पडताळणी येत्या ११ ते २२ एप्रिल
या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे
यांनी ही माहिती दिली आहे.
या पटपडताळणीच्या अनुषंगाने इयत्ता नववीची मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा अनुक्रमे ११ एप्रिल १५ एप्रिल आणि
२२ एप्रिल या तारखांना घेण्याच्या सूचनाही राज्यशासनाने दिल्या आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा पंचायत समितीच्या शिक्षण विभागात आज
सकाळी आग लागली. यात पिरॉडिक असेसमेंट टेस्ट म्हणजे पॅट परीक्षेच्या १ हजार प्रश्नपत्रिका
खाक झाल्या. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने येत्या ११ तारखेला
मराठी या विषयाची परीक्षा नियोजित आहे. याबाबत पुणे प्राथमिक शिक्षण परिषदेशी संपर्क
साधण्यात आला असून येत्या दोन दिवसात प्रश्नपत्रिका मिळण्याची शक्यता, गटशिक्षणाधिकारी मोहम्मद तौसिफ यांनी व्यक्त केली आहे.
****
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने बीड शहर
पोलीस स्थानकाच्या वतीने आज मोफत रोगनिदान आणि उपचार शिबीर घेण्यात आलं. या उपक्रमामुळे
पोलीस आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी होण्यास मदत होईल, असं
मत अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी यावेळी व्यक्त केलं. या उपक्रमामध्ये
एकूण ७२ गरजूंनी लाभ घेतला असून, या शिबीरात केवळ तपासणीच नव्हे
तर मोफत औषधांचंही वाटपही करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांच्या जमिनींसंबंधित विविध
तक्रारींची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं आहे, नागरिकांनी १० एप्रिलपर्यंत तक्रार अर्ज सादर करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र
पापळकर यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment