Saturday, 25 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 25 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

देशातल्या सर्व वित्तीय नियमकांनी केवायसीची प्रक्रिया नागरिकांसाठी सुलभ व्हावी यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न करावेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सेबीच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या. नागरिकांना वारंवार केवायसी करावे लागू नये, यासाठी प्रयत्न करावेत असंही सीतारामन म्हणाल्या. देशातल्या शेअर बाजार, शेअर दलाल किंवा संबंधितावर सायबर हल्ला झाला तर झालेलं नुकसान भरून यायला दीर्घकाळ जाऊ शकतो, सायबर हल्ले, कृत्रिम बुद्धीमत्तेमुळेळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सेबीने बळकट यंत्रणा निर्माण करावी, असं आवाहन त्यांनी केलं. गुंतवणूकदारांमध्ये जनजागृती करण्यासाठीच्या सेबीच्या जागरूक अभियानाची सुरुवात अर्थमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. देशभरातले सर्व शेअर बाजार, म्युच्युअल फंड संघटना आणि इतर संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून हे जनजागृती अभियान राबवले जाणार आहे.

****

सरकारच्या सक्रियतेमुळे देशात सर्व खतांची उपलब्धता स्थिर, सुव्यवस्थित आणि गरजेपेक्षा जास्त आहे, असं रसायन आणि खत मंत्रालयानं म्हटलं आहे. खतांच्या तुटवड्याबाबत अलीकडे केले जाणारे दावे तथ्यांवर आधारित नाहीत, असंही मंत्रालयाने म्हटलं आहे. ऑक्टोबर २०२५ ते या वर्षाच्या मार्चपर्यंतच्या रबी हंगामाच्या आकडेवारीनुसार, युरियाची उपलब्धता २५७ पूर्णांक ५९ लाख मेट्रिक टन होती, तर गरज १९ पूर्णांक ६ लाख मेट्रिक टन होती. तसंच, डीएपीची उपलब्धता ७५ पूर्णांक ४० लाख मेट्रिक टन होती, तर गरज ५३ पूर्णांक ४३ लाख मेट्रिक टन होती. चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीतही १८ पूर्णांक १७ लाख मेट्रिक टन युरियाच्या गरजेच्या तुलनेत ६९ पूर्णांक ३३ लाख मेट्रिक टन युरिया उपलब्ध आहे, आणि ५ पूर्णांक ९० लाख मेट्रिक टन डीएपीच्या गरजेच्या तुलनेत २२ पूर्णांक ७८ लाख मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे, असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

अकोला जिल्ह्यात २५ ते २७ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. त्यानुसार नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जिल्ह्याचे तापमान ४५ अंशांपर्यंत गेल्याच्या पार्श्वभूमीवर, वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता, विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी मदत कक्ष सुरू करण्याची मागणी गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे. गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे सर्व परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना ग्लुकोज आणि ओआरएस पावडरचे मोफत वितरण करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. या उपक्रमाला विविध शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांचाही पाठिंबा मिळत आहे.

****

राज्यातील वृद्ध कलावंतांना मानधन मिळण्यासाठी आवश्यक असलेली आधार पडताळणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून वृद्ध कलावंतांचं मानधन तत्काळ द्यावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.  राज्यातील विविध जिल्ह्यांतील आपले सरकार सेवा केंद्रे, आधार सेवा आणि वृद्ध कलावंत मानधन यासंदर्भातील विषयांचा सविस्तर आढावा शेलार यांनी घेतला.

****

राज्य शासनाची मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी योजना आहे. या योजनेशी संबंधित यत्रणांनी जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद, रस्ते, योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

****

जनगणनेसंदर्भातील कोणतीही अडचण सोडविण्यासाठी सरकारनं नागरिकांसाठी

१८५५ हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. जनगणना सुविहितपणे पार पडावी यासाठी सरकारनं ही व्यवस्था केली आहे.

****

पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर, कोणत्याही मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याची आवश्यकता नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यातील सर्व ४४ हजार ३७६ केंद्रांवर गुरुवारी शांततेत मतदान पार पडलं. तमिळनाडूमधेही सर्व ७५ हजार ६४ केंद्रांवर मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली असून, कुठेही फेरमतदान घेण्याची आवश्यकता नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

****

सध्याच्या हंगामासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीमधील खरेदीत केंद्राकडून १५ टक्के वाढ केली जाणार आहे. त्यानुसार ३४ पूर्णांक ५० दशलक्ष टन एवढा गहू सरकारकडून खरेदी केला जाणार आहे. गेल्यावर्षी हीच खरेदी ३० दशलक्ष टन एवढी होती. केंद्रीय खाद्य सचिव संजीव चोप्रा यांनी ही माहिती दिली. याशिवाय विविध राज्यांकडून खरेदी करण्याच्या उद्दिष्टांतही वाढ करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे यंदा गव्हाचं उत्पादन काहीसं कमी होण्याची शक्यता असल्याचंही चोप्रा यांनी सांगितल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 25 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...