Wednesday, 15 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 15 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

महिला आरक्षण विधेयक समतोल असून प्रत्येक राज्याच्या, समुदायाच्या आणि प्रदेशाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी समर्थ असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकातल्या दुरुस्त्यांवर चर्चा करण्यासाठी आणि पारित करण्यासाठी उद्यापासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरु होणार असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट – संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू

 

या विधेयकामुळे महिलांना संसद आणि राज्य विधानसभांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण लागू होणार आहे. लोकसभेत हे विधेयक उद्या मांडल जाईल, त्यावर अठरा तास चर्चा अपेक्षित आहे, तर राज्यसभेत दहा तासांची चर्चा ठेवण्यात आल्याचं रिजिजू यांनी सांगितलं.

दरम्यान, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला.

****

आरोग्य क्षेत्र हा केवळ एक व्यवसाय नसून, तो मानवतेची सेवा करण्याचा मार्ग असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नागपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था – एम्सचा दुसरा दीक्षांत समारंभ आज राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. थोड्याच कालावधीत नागपूर एम्सने आरोग्य, शिक्षण आणि संशोधनात प्रगती साधल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. आरोग्यविषयक केंद्र सरकारच्या योजनांचा त्यांनी उल्लेख केला.

या सोहळ्यात २१० विद्यार्थ्यांना पदवी आणि सुवर्ण पदकं प्रदान करण्यात आली. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रपती आज प्रत्यक्ष कर अकादमीत भारतीय महसूल सेवेच्या ७८ व्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्या राष्ट्रपती वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार असून, त्यानंतर त्या सेवाग्राम इथल्या गांधी आश्रमाला भेट देतील.

****

नागरीकांना सक्षम करणं आणि कोणीही मागे राहणार नाही, याची खात्री करणं हा प्रशासनाचा खरा उद्देश असल्याचं उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या ७२ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. समाजातला कोणताही घटक किंवा देशातला कोणताही प्रदेश विकासापासून वंचित राहू नये, यावर त्यांनी भर दिला. कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक शक्तिशाली तांत्रिक साधन असून, सर्वसमावेशक, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज असा 'विकसित भारत' घडवण्यात ते एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरेल, असं ते म्हणाले. विकसित भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता ही धोरणे आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून कार्य करेल आणि सार्वजनिक सेवांच्या वितरणात सुधारणा घडवून आणेल, असं उपराष्ट्रपतींनी नमूद केलं.

****

बिहारचे चोवीसावे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते सम्राट चौधरी यांनी आज शपथ घेतली आहे. पाटणा इथं आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांनी उपमुख्यमंत्री पदाची शफथ घेतली. संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, भाजप नेते जे पी नड्डा यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, ही जबाबदारी म्हणजे लोकसेवेची एक पवित्र संधी असून, बिहारच्या जनतेसाठी समर्पितपणे काम करण्याचं आश्वासन सम्राट चौधरी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिलं.

****

अमरनाथ यात्रेसाठी आजपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे. देशभरातल्या ५५४ बँक शाखांमध्ये नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. अमरनाथ यात्रा तीन जुलैपासून सुरू होऊन रक्षाबंधनाच्या दिवशी २८ ऑगस्टला समाप्त होणार आहे. श्री अमरनाथ तीर्थक्षेत्र मंडळाकडून भाविकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर परिसरात उद्यापासून येत्या अठरा तारखेपर्यंत होणाऱ्या सायकलिंग स्पर्धेमुळे झाल्टा फाटा ते SRPF कॅम्प या रस्त्यावरची वाहतूक वळवण्यात येणार आहे, या काळात बीडकडून येणारी वाहनं हॉटेल पालखी जवळून वळवण्यात येतील, असं छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसांनी कळवलं आहे.

****

पंरप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा १३३वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांना आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य, या नि:शुल्क क्रमांकावर, माय जीओव्ही ओपन फोरम किंवा नमो ॲप वर नोंदवता येणार आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 15 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...