Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 17 April
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १७ एप्रिल
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठीची निवडणूक आज होणार आहे.
केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, नामनिर्देशित सदस्य हरिवंश
यांच्या नावाची शिफारस करतील. याव्यतिरिक्त, केंद्रीय
मंत्री निर्मला सीतारामन आणि जयंत चौधरी, भाजपचे अध्यक्ष तथा
राज्यसभा खासदार नितीन नवीन, जनता दल युनायटेडचे खासदार
संजय कुमार झा हे देखील राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी हरिवंश यांच्या नावाची
शिफारस करतील असं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे
****
माजी पंतप्रधान दिवंगत चंद्रशेखर यांच्या जयंतीनिमित्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना आज
आदरांजली अर्पण केली. धैर्य, ठाम निष्ठा आणि लोकशाही
मूल्यांप्रती असलेली सखोल बांधिलकी या गुणांनी संपन्न असे एक लोकनेते म्हणून
चंदशेखर कायम देशाच्या स्मरणात असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमावरील
संदेशात म्हटलं आहे. चंद्रशेखर यांचं यंदा शंभरावं जयंती वर्ष साजरं होत आहे
****
२०२७ च्या जनगणनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातल्या गृहगणनेला
कालपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. अंदमान - निकोबार, गोवा, कर्नाटक,
लक्षद्वीप, मिझोराम, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये तसंच नवी दिल्ली महानगरपालिका आणि दिल्ली
कटक मंडळ या भागात महिनाभर ही मोहीम राबवली जाईल. या काळात प्रगणक घरोघरी जाऊन
माहिती संकलित करतील.
****
संशोधन संस्कृतीला चालना देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी
देण्याची गरज ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त
केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या तीन
जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकांकडून संशोधन प्रस्ताव सादर करण्यासाठी
काकोडकर यांच्या उपस्थितीत काल मुंबई विद्यापीठात एक बैठक घेण्यात आली,त्यावेळी ते बोलत होते.
विद्यापीठांनी केवळ सैद्धांतिक ज्ञानापुरते मर्यादित न
राहता,
स्थानिक समस्यांवर उपाय शोधणारे आणि समाजाला थेट लाभ देणारे
संशोधन पुढे आणणे आवश्यक असल्याचं मत काकोडकर यांनी नमूद केलं.
****
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कोणत्याही ठिकाणी बालविवाह
आढळल्यास तात्काळ गुन्हा नोंदवावा, असे स्पष्ट निर्देश
धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी नागरिकांना दिले आहेत. अक्षय
तृतीया हा शुभ मुहूर्त मानला जात असल्यामुळे या दिवशी राज्यात मोठ्या प्रमाणावर
सामुहिक तसंच वैयक्तिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. मात्र, याच दिवशी बालविवाह होण्याची शक्यता असल्याचे लक्षात घेता, पोलीस विभाग, बाल संरक्षण समिती आणि जिल्हा
प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
****
“ऑपरेशन यात्री सुरक्षा” अंतर्गत परभणी रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या
मालमत्तेच्या चोरी करणाऱ्या एकाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं. तपासणीदरम्यान
त्याच्याकडे एक स्पोर्ट्स बॅग आढळून आली, ज्यामध्ये ६३ हजार
४०० रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे एकूण पाच चोरीचे मोबाईल फोन होते. आरोपी
हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण
इथला असून,
त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लातूर इथं १०० खाटांच्या
नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचं बांधकाम करण्यात येणार असून, या नवीन वास्तूचा भूमिपूजन समारंभ उद्या शनिवारी सायंकाळी ५ वाजता आयोजित
करण्यात आला आहे. नांदेड रोडवरील कृषि महाविद्यालय परिसरात हा कार्यक्रम होणार आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल पंजाब
किंग्जने मुंबई इंडियन्सचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत मुंबईच्या
संघाने निर्धारित षटकात सहा बाद १९५ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेल्या
पंजाबच्या संघाने तीन गडी गमावत १६व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं.
या स्पर्धेत आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि कोलकाता
नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला
सुरुवात होईल.
****
राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे.
येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात
तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment