Monday, 6 July 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 06 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ जुलै २०२ सकाळी.०० वाजता

****

राज्यात मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून शाळा-महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईत मानखुर्दच्या जनता नगर परिसरात मुसळधार पावसामुळे तीन मजली कच्च्या चाळीतली दोन ते तीन घरं अचानक कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य सरकारने मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

**

मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगदा क्रमांक दोन च्या बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ दरड कोसळल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई-पुणे महामार्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

दरम्यान, कर्जत-लोणावळा दरम्यान रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसानंतरच्या पाण्याच्या प्रवाहामुळे कर्जत-खोपोली दरम्यान रुळांखालची खडी वाहून गेल्याने रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आढावा घेतला असून, रेल्वे सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

नांदेड–पनवेल– नांदेड एक्सप्रेसचा मार्ग बदलून ही गाडी दौंड - मनमाड - इगतपुरी – कल्याण मार्गे धावेल. तर मुंबई - नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेत दोन तासांचा बदल करण्यात आला आहे. ही गाडी दुपारी सव्वा वाजता सुटण्याऐवजी आता दुपारी सव्वा तीन वाजता सुटेल.

**

पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातल्या पाटण गावात आज पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घरातलं संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

**

रायगड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. अंबा, कुंडलिका, सावित्री आणि पाताळगंगा या चारही नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पूर आणि दरडीच्या धोक्यामुळे जिल्ह्यात सात तालुक्यांमधली ११ गावं आणि वाड्यांमधल्या ५६९ नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.

**

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू असला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झालं असून, शेतीची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यातल्या लहान-मोठ्या एकूण १७३ धरणांमध्ये सध्या केवळ १७ पूर्णांक २५ टक्के इतकाच मर्यादित उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातल्या तब्बल ८१ लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून, ७९ प्रकल्प मृत साठ्यात गेले आहेत. मुख्य जलस्रोत आटल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

****

भारतीय जनसंघाचे संस्थापक, पहिले अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन केलं. सशक्त, स्वावलंबी आणि एकात्म भारताचं त्यांचे स्वप्न आजही राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पाला नवी ऊर्जा देत असल्याचं, पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. जयंतीनिमित्त कोलकाता इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

****

दुधात  मोठ्या प्रमाणावर भेसळ करणाऱ्या मोठ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि एफडीए च्या पथकाने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला. या कारवाईत अनेक मोठी नावं समोर आली असून, मंचर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सांगली आणि भिवंडी या सहा जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही छापेमारी करण्यात आली. याप्रकरणी २६ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, १३ जणांना अटक करण्यात आली आहे. वास न येणारा शाम्पू, दुधाची पावडर आणि केमिकल पाण्यात मिसळून ही भेसळ केली जात होती.

****

नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातल्या रामपूर-पुतळेवाडी परिसरात परवाना नसलेला तब्बल १७ लाख ३७ हजार ५२९ रुपयांचा दुग्धजन्य पावडरचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी संशयित प्रशांत काळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अन्न आणि औषध विभागाच्या तपासणीत संशयिताच्या ताब्यात मिल्क पावडरची ६० पोती, व्हे पर्मिएट पावडरची ५८ पोती, डेअरी पर्मिएट पावडरची १६९ पोती आणि लॅक्टोज रिच डी-प्रोटिनाइज्ड व्हे पर्मिएट पावडरची ४९ पोती असा मोठा साठा आढळून आला.

****

जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात रोहिणा पुलाजवळ काल सकाळी खासगी बसचा टायर फुटून बस उलटल्यामुळे तीन लहान मुलांसह एकाच कुटुंबातले ११ जण जखमी झाले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ मदतकार्य करून जखमींना परतूर, मंठा आणि वाटूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 06 July 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...