Sunday, 5 July 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      विकसित भारत जीरामजी योजनेअंतर्गत राज्यांना २५ हजार कोटी रुपयांचा निधी वितरीत

·      मुंबईअहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पा भूमिगत बोगद्याच्या खोदकामाला प्रारंभ

·      सुप्रसिद्ध पंडवानी गायिका, ज्येष्ठ लोककलाकार पद्मविभूषण तीजन बाई यांचं निधन

·      जालन्यात संत श्रेष्ठ श्री मुक्ताबाई यांच्या पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात

आणि

·      राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

****

विकसित भारत रोजगार आणि आजीविका ग्रामीण मिशन-व्हीबीजी राम जी अधिनियम, २०२५ यशस्वीपणे लागू झाल्याबद्दल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या मोहिमेअंतर्गत राज्यांना २५ हजार कोटी रुपयांच्या सहाय्याला मंजुरी देऊन निधी वितरित केला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं यशस्वीपणे VB-G RAM G योजनेत रूपांतर झाल्याचं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान

 

केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून, राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा, असं आवाहन चौहान यांनी केलं. व्ही बी जी राम जी कायदा एक जुलैपासून लागू झाला आहे.

****

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली, आज नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियम इथं ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत, दिल्लीत नऊ हजारांहून अधिक नागरिकांनी सामुदायिक धावणे आणि सायकल फेरीत सहभाग घेतला. मांडविया यांनी यावेळी बोलताना, २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला. कोणत्याही देशाला विकसित राष्ट्र म्हणून ओळख मिळण्यासाठी त्या देशातल्या नागरिकांचं आरोग्य उत्तम असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

****

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११ व्या स्थापना दिनानिमित्त आज पुण्यात आयोजित कार्यक्रमात भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण तसंच इनोव्हेशन महाकुंभाच्या दुसऱ्या टप्प्याचं चं उद्घाटन आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते झालं. भारतरत्न महर्षी कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेलं कार्य हे सामाजिक परिवर्तनाचं नव्हे तर राष्ट्रनिर्मितीचं कार्य होतं, स्त्री शिक्षणाच्या या महान परंपरेला पुढे नेत एसएनडीटी महिला विद्यापीठानं शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात देशासाठी आदर्श कार्य केल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. ‘इनोव्हेशन महाकुंभ २.हे संशोधनाचं उद्योगांमध्ये, कल्पनांचे उपयुक्त उपायांमध्ये आणि तरुणांच्या संकल्पनांचे स्टार्टअपमध्ये रूपांतर घडवणारं प्रभावी व्यासपीठ असल्याचं सांगत, विकसित भारत २०४७ साकार करण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील विकास अपरिहार्य असल्याचं राज्यपालांनी यावेळी नमूद केलं.

****

मुंबईअहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आज महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला. विक्रोळी मध्ये भारतातल्या सर्वात मोठ्या रेल्वे टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्यानं भूमिगत बोगद्याच्या खोदकामाला प्रारंभ झाला. १३ पूर्णांक सहा मीटर व्यास आणि सुमारे तीन हजार १०० टन वजनाचं हे अत्याधुनिक 'मिक्सशील्ड' टनेल बोरिंग मशीन विक्रोळी ते बीकेसी दरम्यान सुमारे सहा किलोमीटर लांबीचा बोगदा खोदणार आहे. हा बोगदा दाट लोकवस्ती, रस्ते, मिठी नदी आणि अन्य महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या खालून जाणार आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे बोगदा खोदणं आणि काँक्रीट रिंग बसवणं ही दोन्ही कामं एकाच वेळी होणार असून, त्यामुळे सुरक्षितता आणि कामाचा वेग वाढणार आहे. मुंबईअहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील २१ किलोमीटरच्या भूमिगत बोगद्याच्या उभारणीत हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.

****

छत्तीसगडच्या सुप्रसिद्ध पंडवानी गायिका आणि ज्येष्ठ लोककलाकार पद्मविभूषण तीजन बाई यांचं आज रायपूर इथं निधन झालं, त्या ७० वर्षाच्या होत्या. दमदार आवाज, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि वैशिष्ट्यपूर्ण कथाकथन शैलीच्या बळावर तीजन बाईंनी पंडवानी या पारंपरिक लोककलेला देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून दिली. त्यांनी आपल्या अद्वितीय सादरीकरणातून महाभारताच्या कथा रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवल्या. भारतीय लोककलेतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित नागरी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीजन बाई यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

****

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनाने आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमदं, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

****

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या संत श्रेष्ठ श्री मुक्ताबाई यांच्या पालखीचा प्रथमच आयोजित रिंगण सोहळा आज जालना इथं उत्साहात पार पडला. वारकरी परंपरेनुसार रिंगणातील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिस विभागाने आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तीमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात सुमारे ३० ते ३५ हजार वारकरी यात सहभागी झाले. पुष्पवृष्टी, टाळ-मृदंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. १३ संचालकांसाठी काल मतदान झालं होतं. बँकेच्या २१ संचालकांपैकी आठ सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण २१ सदस्यांपैकी दोन मंत्री, एक खासदार, पाच आमदार या संचालक मंडळावर निवडून आले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर शहर विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यांच्या रुंदीकरणाला गती देण्यासाठी महानगरपालिका यंदाच्या पावसाळ्यात टीडीआरफ प्रक्रिया राबवणार आहे. याअंतर्गत, नगर भूमापन कार्यालयाकडे रीतसर शुल्क भरणा केलेल्या चंपा चौक ते जालना रोड या रस्त्यासाठी पावसाळ्यातच जॉइंट टोटल स्टेशन सर्व्हे केला जाईल. हा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर तातडीने पुढील भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया हाती घेतली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.

****

बीड जिल्ह्यात येत्या ३१ जुलै पर्यंत ‘स्टॉप डायरिया अभियानराबवण्यात येत आहे. याअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांनी केलं आहे.

****

अयोध्येत श्री राम मंदिरात देणगीत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज राज्यभरात श्री राम रक्षा घंटानाद आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं सुपारी हनुमान मंदिरासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

****

महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून जवळपास सहा कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुबईवरून आलेल्या या महिलेची झडती घेतली. तिच्याकडे चार किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळून आलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे.

****

नांदेड –मुबंई आणि नांदेड – टनकपूर या दोन रेल्वे गाड्या उद्यापासून सुरु होत आहेत. दोन्ही गाड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

****

राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला असून, अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला.

नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

अति पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्यांची पाणीपातळी सातत्याने वाढत असून, खेडमधल्या जगबुडी नदीचं पाणी शहरा शिरण्यास सुरुवात झाली आहे. खेड तालुक्यातल्या नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. आज मंडणगड तालुक्यात तुळशी घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. पावसामुळे दापोलीतही काही ठिकाणी पाणी साचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

रायगड जिल्ह्यात सारसई इथं आज कर्जतपेण मार्गावरील एसटी बस पाताळगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकली होती. बसमधल्या आठ प्रवाशांची पोलिसांनी सुखरूप सुटका केली.

पालघर, रायगड, गडचिरोली, बुलडाणा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्येही आज पाऊस सुरु आहे.

दरम्यान, राज्यात पुढचे दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...