▼

Friday, 31 July 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.07.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी;खेलो इंडिया योजनेच्या विस्तारालाही मान्यता

·      अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून वास्तविकतेचं भान होत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      बीड-पुणे रेल्वे सेवा १७ सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यासाठी प्रयत्नशील-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही

·      छत्रपती संभाजीनगर इथं दुध डेअरीवर कारवाई-भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त-परवाने निलंबित

आणि

·      हिंगोली जिल्ह्यात ३० पैकी २७ मंडळांमध्ये अतिवृष्टी;छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट

****

प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी सुमारे पाच हजार ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यातून तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प विकासित केले जाणार आहेत.

‘खेलो इंडिया’ योजनेचा विस्तार करण्यास तसंच राष्ट्रीय क्रीडा महासंघांना दिल्या जाणाऱ्या सहाय्यात वाढ करण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. यासाठी २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीत एकूण ३६ हजार ४४१ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

****

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे आजही बाधित झालं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीने सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी केली. विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

राज्यसभेचं कामकाजही गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित झालं.

दरम्यान, राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं.

महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच एमएसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली.

****

दुबई तसंच सिंगापूरच्या धर्तीवर राज्यात ‘लॅण्ड टायटलिंग कायदा’ लागू करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणे इथं एका कार्यक्रमात बोलतांना ही माहिती दिली.

या कायद्यानुसार मालमत्ताधारकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळेल तसंच प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ दिलं जाईल. याशिवाय, ‘आधी मोजणी, नंतरच नोंदणी’ हा नियम लागू करण्यात येणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.

****

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून वास्तविकतेचं भान होत असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत, चिरागनगर घाटकोपर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ‘लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था’ तसंच स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. अण्णाभाऊंच्या साहित्याबाबत बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना शहा यांच्या हस्ते उद्या १ ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

****

महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असून, मनोज जरांगे यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही. वेळ पडली तर, त्यांची भेट घेऊन समाधान करू, अशी स्पष्ट भूमिका जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्‍यक्ष डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाच्या दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, मंत्री विखे पाटील आज माध्यमांशी बोलत होते. राज्यात प्रथमच स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीयांप्रमाणे शैक्षणिक सवलती तसंच सोयीसुविधा देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी सुरू असल्याकडे विखे पाटील यांनी यावेळी लक्ष वेधलं.

****

अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात असून १७ सप्टेंबरपर्यंत बीड-पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं, उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. त्या आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या -

बाईट - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

२०२६-२७ या वर्षासाठी बीड जिल्ह्याच्या ६२३ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून विविध विकासकामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं पालकमंत्री पवार यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकेचं लोकार्पणही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या सुविधेमुळे आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं अन्न आणि औषध प्रशासनाने चिकलठाणा परिसरात एका दूध डेअरीवर छापा टाकून तीन लाख १२ हजार ३८० रुपयांचा भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. यामध्ये साडे नऊशे किलो तूप, क्रीम आणि रिफाइंड सोयाबीन तेलाचा समावेश आहे. शहरातील लक्ष्मी डेअरीच्या तीन विक्री केंद्रांवरही कारवाई करण्यात आली असून, दूध डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करून उत्पादन संच बंद करण्यात आले आहेत. तसंच जप्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे. या योजनेत पहिल्या यादीत जिल्ह्यातील ४७ हजार ८८६ शेतकऱ्यांचा समावेश असून लवकरच दुसरी यादी प्रसिद्ध होणार असून त्यात सुमारे ५१ हजार शेतकऱ्यांची नावं समाविष्ट असतील असं जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितलं.

****

ठाणे जिल्ह्यात भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातल्या गंगाराम वाडी परिसरात काल रात्री चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

हिंगोली जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस कोसळला. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, ३० पैकी तब्बल २७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्यामुळे कयाधू नदीला पहिल्यांदाच पूर आला आहे. शेतशिवारांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचंही प्रचंड नुकसान झालं आहे. आज सकाळपासूनही हिंगोली जिल्हाभरात पावसाची संततधार सुरूच आहे.

***

छत्रपती संभाजीनगर इथंही पावसाची संततधार सुरू आहे.

राज्यात उत्तर महाराष्ट्र तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आज जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अहिल्यानगर, पुणे आणि मराठवाड्यात बीड तसंच जालना जिल्ह्याला आणि संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पैठणच्या जायकवाडी धरणातील जलसाठा ७५ टक्क्यांहून अधिक झाला आहे.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’ २०२६ मध्ये १०० पैकी ९२ पूर्णांक ५ गुण मिळवत देशात १२ वा क्रमांक पटकावला आहे. ‘ग्रीन मेंटर्स’ या संस्थेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशातील आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आय टी, केंद्रीय विद्यापीठं तसंच अन्य प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थांचा सहभाग आहे.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 31 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.

****

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणांतल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, राज्यातल्या तीन हजार २९ धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा ६५ पूर्णांक २४ टक्क्यांवर पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ३८ पूर्णांक ९६ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे.

****

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे. गेल्या २४ तासात ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या २४ हजार २३४ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत असून, धरणाची पाणीपातळी ७४ पूर्णांक ३१ टक्क्यांवर पोहोचली आहे.

जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागातही रात्रभरापासून पावसाची संततधार सुरू आहे.

हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. पहिल्यांदाच या पावसाळ्यात कयाधू नदीला पूर आला असून, कळमनुरी-बोल्डा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

लातूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागांत काल रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ४३ पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातल्या सहा महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.

**

धुळे जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी सतर्क राहावं आणि कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेगाव शहरात भिंत कोसळून एला महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात अनेक रस्ते, शाळा आणि घरांमध्ये पाणी शिरलं आहे.

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात दहेली गावाजवळील अडाण नदीत एक चारचाकी वाहून गेली. या कार मधले अविनाश खंडारे झाडाचा आधार घेऊन बचावले मात्र त्यांची पत्नी आणि दोन मुलींचा शोध लागलेला नाही. पालकमंत्री संजय राठोड यांनी ताबडतोब मदत कार्य सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवर असलेल्या हतनुर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणातून तापी नदीपात्रामध्ये एक लाख ८५ हजार ८२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे.

****

ठाणे जिल्ह्यात भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातल्या गंगाराम वाडी परिसरात चार मजली इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, बचावकार्य सुरु आहे.

****

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेली पोलिस कारवाई आणि इतर मुद्यांवरुन विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज सोमवार तीन ऑगस्ट पर्यंत तहकूब झालं.

राज्यसभेत आजचं कामकाज सुरू झाल्यावर अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे सादर केली. ग्रामीण विकास आणि पंचायती राजविषयक संसदीय स्थायी समितीचा अहवालही यावेळी सादर करण्यात आला. त्यानंतर, सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी शून्यकाळ सुरु करताच अनेक सदस्यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. मात्र, आपल्या मागण्यांवर ठाम राहत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यास सुरुवात केली. या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित झालं.

लोकसभेतही कामकाज सुरु झाल्यावर नीट प्रकरणावरुन विरोधकांनी घोषणाबाजी करत गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन देण्याची मागणी लाऊन धरली. या गदारोळातच जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक २०२६ सदनानं पारित केलं. त्यानंतरही घोषणाबाजी सुरुच राहील्यानं लोकसभेचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत स्थगित झालं.

****

महिला आणि बालकांसाठीच्या महत्वपूर्ण मदतवाहिनीसाठी नागरिकांनी मिशन शक्ती ॲप डाउनलोड करावं असं आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं आहे. या ॲपच्या माध्यमातून महिला तसंच बालकांसाठी असलेल्या अनेक आपत्कालीन तसंच सहाय्यक सेवा आणि सुविधा जलद आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज बीड इथल्या ऐतिहासिक कनकालेश्वर मंदिर परिसरात विविध विकासकामांचं भूमिपूजन झालं. यावेळी त्यांनी कनकालेश्वराचं दर्शन घेऊन विधीवत पूजा केली आणि जिल्ह्याच्या प्रगती तसंच समृद्धीसाठी प्रार्थना केली. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांनी बीड जिल्हा रुग्णालयात भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 31 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जुलै २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे. फुलंब्री, कन्नड, सोयगाव, पैठण याठिकाणीही जोरदार पाऊस झाला. पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या ५७ हजार ४६३ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत असून, धरणाची पाणीपातळी सुमारे ७२ टक्क्यांवर पोहोचली आहे.

जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागातही रात्रभरापासून पावसाची संततधार सुरूच आहे.

हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पहिल्यांदाच या पावसाळ्यात कयाधू नदीला पूर आला आहे. कळमनुरी तालुक्यातल्या सोडेगाव इथल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे कळमनुरी-बोल्डा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

लातूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागांत काल रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. ज्या ठिकाणी अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत, त्या भागातही पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हवामान विभागाने आजही लातूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांनी आणि संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

नांदेड जिल्ह्यात किनवट आणि माहूर इथं मुसळधार पाऊस झाला. पैनगंगा नदीवर किनवट तालुक्यात असलेला सहस्त्रकुंड धबधबा यावर्षी पहिल्यांदाच प्रवाहित झाला आहे.

****

ठाणे जिल्ह्यात भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातल्या गंगाराम वाडी परिसरात चार मजली इमारत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून तीन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं असून, अजूनही काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

****

कोल्हापुरात धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा उघडला असून, एक हजार ४२८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातले अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

वाशिम जिल्ह्यातही मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. या मोसमात पहिल्यांदाच पावसाने सातत्य राखल्याने पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळालं आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात सर्वत्र काल सायंकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. तापी नदीवरील हतनूर आणि गिरणा नदीवरील धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाल्यांना आलेला महापूर, वीज पुरवठा खंडित होणं, आणि घरांमध्ये साचलेलं पाणी यामुळे या परिसरात जनजीवन विस्कळीत झालं आहे.

****

उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बीड इथं जिल्हा रुग्णालयात भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध विभागांच्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि संबंधित विभागांशी चर्चा करून प्रलंबित कामांबाबत सूचना दिल्या. नागरिकांच्या अडचणीही त्यांनी ऐकून घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना केल्या.

****

राज्यातल्या मालमत्तेच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर लवकरच ‘लॅण्ड टायटलिंग ॲक्ट’ लागू करण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचं त्यांनी काल ठाणे इथं सांगितलं. या नव्या व्यवस्थेमुळे प्रत्येक मालमत्ताधारकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळून सर्व तपशील उपलब्ध होईल, तसंच शहरांतल्या प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ दिलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

****

जागतिक मानव तस्करीविरोधी दिनानिमित्त जालना जिल्ह्यात मानव तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी विशेष अभियान राबवण्यात येत आहे. ‘सजग नागरिक, सुरक्षित समाज’ हा संदेश देत या जनजागृती व्हॅनला आज हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही व्हॅन जिल्ह्यात विविध ठिकाणी फिरून मानव तस्करीविरोधात जनजागृती करणार आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातल्या रेणापूर प्रकल्पाची उंची वाढवणं आणि भूसंपादनाच्या कामासाठी राज्य सरकारने १० कोटी ८५ लाख रुपये निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कामासाठी हा निधी देण्यात येणार आहे.

****

ग्लासगो इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत भारोत्तोलनात पुरुषांच्या ११० किलो वजनी गटात लवप्रीत सिंगने रौप्य पदक जिंकलं. तर महिलांच्या थाळीफेक मध्ये सीमा कलीरामना हिने कांस्य पदक पटकावलं.

पुरुषांच्या भालाफेकमध्ये निरज चोप्रासह रोहित यादव आणि यशवीर सिंह अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. तिहेरी उडी प्रकारात प्रवीण चित्रवेल आणि सेल्वा प्रभू, पुरुषांच्या डेकॅथलॉन मध्ये तेजस्विन शंकर अंतिम फेरीत खेळणार आहेत.

या स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, दहा रौप्य आणि चार कांस्य पदकांसह एकूण १७ पदकं जिंकली आहेत.

****

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 31 جولائی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

 Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 31 July-2026
Time: 09:00-09:10 am
آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر
علاقائی خبریں
تاریخ: ۱۳/جولائی ۶۲۰۲ء؁
وقت: ۰۱:۹-۰۰:۹
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
پیش ہیں خاص خبروں کی سرخیاں:
٭ عام امتحانات میں بدعنوانی کی روک تھام سے متعلق ترمیمی بل پارلیمنٹ میں منظور؛ حکومت ایک قابلِ اعتماد تعلیمی نظام کیلئے مؤثر اقدامات کر رہی ہے: وزیرِ اعظم کا بیان۔
٭ وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے منشیات کے خلاف اجتماعی جنگ کی ضرورت پر دیا زور۔
٭ سوویں کُل ہند مراٹھی ادبی کانفرنس کیلئے پانچ کروڑ روپئے کے فنڈ کا اعلان۔
اور۔۔۔٭ مراٹھواڑہ سمیت ریاست بھر میں موسلا دھار بارش۔
***** ***** *****
اب خبریں تفصیل سے...
عام امتحانات میں بدعنوانی کی روک تھام سے متعلق ترمیمی بل پارلیمنٹ سے منظور ہو گیا ہے۔ یہ بل، جو پرسوں لوک سبھا میں منظور ہوا تھا، کل راجیہ سبھا میں بھی منظور کر لیا گیا۔ وزیرِ اعظم نریندر مودی نے کہا ہے کہ حکومت ایک قابلِ اعتماد تعلیمی نظام قائم کرنے کیلئے مسلسل اقدامات کر رہی ہے۔ بل کی منظوری کے بعد کل سوشل میڈیا پر جاری اپنے ویڈیو پیغام میں انہوں نے کہا کہ پارلیمنٹ نے ایسا قانون منظور کیا ہے جو امتحانی نظام کو مزید مضبوط، شفاف اور قابلِ اعتماد بنائے گا۔وزیرِ اعظم نے کہا کہ گزشتہ کئی دہائیوں سے ہر ریاستی اور مرکزی حکومت کو پرچہ لیک ہونے کے مسئلے کا سامنا کرنا پڑا ہے، جس سے طلبہ کے مستقبل پر منفی اثرات مرتب ہوئے ہیں۔ اسی کو مدِنظر رکھتے ہوئے ریاستی اور مرکزی حکومتوں کے لیے تعلیمی اور امتحانی نظام میں اصلاحات ناگزیر ہو گئی تھیں۔وزیر اعظم نے کہا:
Byte: Prime Minister Narendra Modi
مرکزی وزیر جتیندر سنگھ نے یہ بل راجیہ سبھا میں پیش کیا اور بحث کا جواب دیا۔ اس بل میں پرچہ لیک، جعلی ویب سائٹس، جعلی ایڈمٹ کارڈز، کمپیوٹر نیٹ ورک سے چھیڑ چھاڑ، جوابی پرچوں میں رد و بدل اور غیر قانونی مدد سمیت 16 اقسام کی بدعنوانیوں کو شامل کیا گیا ہے۔ یہ قانون یو پی ایس سی، ایس ایس سی، ریلوے اور بینکنگ بھرتی کے امتحانات کیلئے بھی نافذہوگا۔
اسی بیچ، حزبِ اختلاف کے قائد ملکارجن کھڑگے نے اس بل پر تنقید کرتے ہوئے کہا کہ شفاف اور پرچہ لیک سے پاک امتحانات کیلئے جن سخت دفعات کی ضرورت تھی، وہ اس بل میں موجود نہیں ہیں اور حکومت نے صرف سطحی تبدیلیاں کی ہیں۔ انہوں نے جنتر منتر پر احتجاج کرنے والوں کے خلاف حکومت کی کارروائی پر بھی تنقید کی اور مطالبہ کیا کہ اس معاملے کی تحقیقات کی جائے اور وزیرِ داخلہ امیت شاہ اخلاقی ذمہ داری قبول کرتے ہوئے استعفیٰ دیں۔
***** ***** *****
قومی گیت وندے ماترم سے متعلق قومی وقار کی توہین کی روک تھام کا ترمیمی بل بھی پارلیمنٹ میں منظور ہو گیا ہے۔ راجیہ سبھا میں منظور ہونے کے بعد یہ بل کل لوک سبھا میں بھی منظور کر لیا گیا۔
***** ***** *****
وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے منشیات کے خلاف اجتماعی جنگ چھیڑنے کی ضرورت پر زور دیا ہے۔ وہ کل ممبئی میں ”منشیات سے پاک ممبئی“ مہم کی افتتاحی تقریب سے خطاب کر رہے تھے۔ انہوں نے کہا کہ اس جنگ کو جیتنے کیلئے نوجوان نسل کا عزم نہایت ضروری ہے۔ انہوں نے کہا کہ ”نشے سے پاک بھارت“ کیلئے ”نشے سے پاک مہاراشٹر“ اور ”نشے سے پاک ممبئی“ بنانا بے حد اہم ہے، اور اس مقصدکیلئے آج کی نوجوان نسل اہم کردار ادا کرے گی۔ اس موقع پر شرکاء کو منشیات کے خلاف حلف بھی دلایا گیا۔
***** ***** *****
نائب وزیرِ اعلیٰ او ربیڑ ضلع کی رابطہ وزیر سنیترا پوار بیڑ ضلع کے دو روزہ دورے پر ہیں۔ ان کی صدارت میں کل ضلع منصوبہ بندی کمیٹی کے اجلاس میں مختلف اہم محکموں کا جائزہ لیا گیا۔انہوں نے یقین دلایا کہ بیڑ کے ریلوے منصوبوں کیلئے ریاستی حکومت کی جانب سے مطلوبہ فنڈ بروقت فراہم کیا جائے گا۔ انہوں نے متعلقہ افسران کو ہدایت دی کہ کھام گاؤں میں ریلوے انڈر بریج کا کام 15 اگست سے پہلے مکمل کیا جائے اور منصوبے کا اگلا مرحلہ 17 ستمبر تک مکمل کرکے اس کا افتتاح کیا جائے۔ موصوفہ نے ضلع پریشد کے اسکولوں میں طلباء کے تعلیمی معیار پر خصوصی توجہ دینے، قدیم اسکولی عمارتوں کی مرمت اور”امید مال“ کا کام فوری مکمل کرنے کی بھی ہدایت دی۔ اس کے علاوہ بیڑ میں منعقد ہونے والے”کھاشابا جادھو“ ریاستی سطح کے کشتی مقابلوں کی تیاریوں کا جائزہ لیتے ہوئے کھیل محکمہ کو ہدایت دی کہ مقابلوں کا انتظام منظم انداز میں کیا جائے۔
***** ***** *****
مراٹھی زبان کے محکمے نے سوویں کل ہند مراٹھی ادبی کانفرنس کیلئے پانچ کروڑ روپے فراہم کرنے کا فیصلہ کیا ہے۔ مراٹھی زبان کے وزیر ادئے سامنت نے کل پونے میں ایک صحافتی کانفرنس کے دوران یہ اعلان کیا۔وزیر موصوف نے بتایا کہ اس مناسبت سے منعقد ہونے والے 99 ناندی ادبی سمیلنوں کیلئے بھی پانچ کروڑ روپے مختص کیے جائیں گے۔ اس کے علاوہ ریاست کی 13 یونیورسٹیوں میں منعقد ہونے والے طلباء کے ادبی سمیلنوں کیلئے فی یونیورسٹی 25 لاکھ روپے کے حساب سے مجموعی طور پر چار کروڑ روپے کے فنڈ کا اعلان بھی کیا گیا۔
***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر سے نشر کی جارہی ہیں۔
***** ***** *****
خواتین کو چاہیے کہ وہ مینوپاز اور PCODجیسی نسوانی بے ضابطگیوں سے متعلق مسائل کو نظر انداز نہ کریں بلکہ بروقت طبی معائنہ کروا کر ماہر ڈاکٹروں سے مشورہ لیں۔ صحت ِ عامہ و خاندانی بہبود کی ریاستی وزیر میگھنا بورڈیکر نے یہ اپیل کی۔ وہ کل چھترپتی سمبھاجی نگر میں اسی موضوع پر منعقدہ ریاستی سطح کی تربیتی ورکشاپ کی افتتاحی تقریب سے خطاب کر رہی تھیں۔ انہوں نے کہا کہ محکمہ صحت کو اس بارے میں وسیع پیمانے پر عوامی بیداری پیدا کرنی چاہیے اور ضروری طبی خدمات ہر خاتون تک پہنچانی چاہئیں۔
***** ***** *****
بیڑ ضلع کے پرلی میں ”چھترپتی شیواجی مہاراج محصول سمادھان کیمپ“ مہم کے تحت مختلف سرکاری اسکیموں کے مستحقین میں کل رکنِ اسمبلی دھننجے منڈے کے ہاتھوں فوائد تقسیم کیے گئے۔
دھاراشیو ضلع کے پرنڈا تعلقہ میں کل یکم اگست کو ”چھترپتی شیواجی مہاراج محصول سمادھان کیمپ“ کا انعقاد کیا جائے گا۔ منتظمین نے شہریوں سے اپیل کی ہے کہ وہ بڑی تعداد میں اس کیمپ میں شرکت کریں۔
***** ***** *****
رمائی رہائشی اسکیم کے تحت مکانات کی تعمیر کیلئے پہلی قسط کی رقم دوگنی کر دی جائے گی۔ یہ اعلان کل چھترپتی سمبھاجی نگر میں سماجی انصاف و خصوصی امداد کے ریاستی وزیر سنجے شرساٹ نے کیا۔ اب پہلی قسط 25 ہزار روپے کے بجائے 50 ہزار روپے ہوگی۔ اس موقع پردیگر پسماندہ بہوجن بہبودکے وزیر اتل ساوے سمیت کئی معزز شخصیات موجود تھیں۔
***** ***** *****
پنیہ شلوک اہلیہ دیوی ہولکر کسان قرض معافی اسکیم 2026 کے تحت بیڑ ضلع کے اہل کسان فوری طور پر اپنے آدھار کارڈکی آن لائن توثیق مکمل کریں۔ یہ اپیل ضلع کلکٹر ویویک جانسن نے کی ہے۔ ضلع بیڑ کے 11 تعلقوں کے مجموعی طور پر 97 ہزار 194 کسان قرض معافی کیلئے اہل قراردیئے گئے ہیں، تاہم اب تک صرف 27 ہزار 500 کسانوں نے ہی آدھار کی توثیق مکمل کی ہے۔
اس اسکیم کے تحت پربھنی ضلع کے ایک لاکھ 60 ہزار 769 کسانوں کی معلومات پورٹل پر اپ لوڈ کی گئی ہیں۔ پہلی فہرست میں شامل 79 ہزار 855 اہل کسانوں کو تقریباً 582 کروڑ روپے کی قرض معافی کا فائدہ ملے گا۔
***** ***** *****
مراٹھواڑہ کے متعدد علاقوں میں کل موسلا دھار بارش ہوئی۔چھترپتی سمبھاجی نگر شہر اور ضلع کے کئی علاقوں میں کل سے مسلسل بارش جاری ہے۔پھلمبری، کنڑ، سوئیگاؤں اور پیٹھن میں بھی شدید بارش ہوئی۔ سوئیگاؤں تعلقہ میں سونا ندی میں سیلاب آ گیا ہے اور ویتال واڑی ڈیم مکمل بھر چکا ہے۔ سلوڑ تعلقہ میں بھی نالے اور برساتی چشمے لبریز ہو کر بہہ رہے ہیں، جبکہ کیلنا ندی میں اس موسم کا پہلا بڑا سیلاب آیا ہے۔
جالنہ شہر سمیت ضلع کے بیشتر علاقوں میں رات بھر سے مسلسل بارش ہو رہی ہے۔ شہر کے نشیبی علاقوں میں پانی جمع ہونے سے شہریوں کو مشکلات کا سامنا کرنا پڑ رہا ہے۔
وہیں ناندید شہر میں نیتاجی سبھاش چندر بوس کالج کے روبرو سڑک دھنس جانے کے باعث ایک کار گڑھے میں گر گئی۔ خوش قسمتی سے اس کار میں کوئی موجود نہیں تھا۔ ضلع کے کنوٹ اور ماہور میں بھی موسلا دھار بارش ہوئی۔ پین گنگا ندی پر واقع سہستر کنڈ آبشار اس برس پہلی بار پوری شدت سے بہنا شروع ہوا ہے۔ پربھنی شہر میں میونسپل کارپوریشن نے آفات سے نمٹنے کے نظام کو الرٹ کر رکھا ہے۔ شہر کے بعض علاقوں میں درخت گرنے سے کچھ گاڑیوں کو نقصان پہنچا اور ٹریفک بھی متاثر ہوئی۔ دھاراشیو ضلع میں بھی گذشتہ رات سے مسلسل بارش جاری ہے۔ اس بارش سے خریف کی فصلوں کو نئی زندگی ملی ہے، تاہم ضلع میں آبی ذخائر میں خاطر خواہ اضافہ ہونے کیلئے مزید بارش کی ضرورت ہے۔
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
اور آخر میں اس بلیٹن کی خاص خبریں ایک بار پھر...
٭ عام امتحانات میں بدعنوانی کی روک تھام سے متعلق ترمیمی بل پارلیمنٹ میں منظور؛ حکومت ایک قابلِ اعتماد تعلیمی نظام کیلئے مؤثر اقدامات کر رہی ہے: وزیرِ اعظم کا بیان۔
٭ وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے منشیات کے خلاف اجتماعی جنگ کی ضرورت پر دیا زور۔
٭ سوویں کُل ہند مراٹھی ادبی کانفرنس کیلئے پانچ کروڑ روپئے کے فنڈ کا اعلان۔
اور۔۔۔٭ مراٹھواڑہ سمیت ریاست بھر میں موسلا دھار بارش۔
***** ***** *****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक संसदेत मंजूर, विश्वासार्ह शिक्षण प्रणालीसाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      अंमली पदार्थांविरोधात सामुहिक युद्धाची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त

·      शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पाच कोटी रुपयांचा निधी जाहीर

आणि

·      मराठवाड्यासह राज्यात सर्वदूर पाऊस

****

सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक संसदेनं मंजूर केलं आहे. लोकसभेत परवा मंजूर झालेलं हे विधेयक काल राज्यसभेतही संमत झालं. एक विश्वासार्ह शिक्षण प्रणाली स्थापित करण्यासाठी सरकार सातत्याने पावलं उचलत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर काल सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी, संसदेनं परीक्षा प्रणाली अधिक मजबूत, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवणारं विधेयक मंजूर केल्याचं नमूद केलं. गेल्या अनेक दशकांपासून प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारला पेपरफुटीच्या समस्येचा सामना करावा लागला आहे, ज्याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. हे लक्षात घेऊन, राज्य आणि केंद्र सरकार या दोघांसाठीही शिक्षण आणि परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करणं आवश्यक झाल्याचं ते म्हणाले:

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडलं आणि चर्चेला उत्तर दिलं. या विधेयकात पेपरफुटीसह बनावट संकेतस्थळं, बनावट प्रवेशपत्रं, संगणक नेटवर्कशी छेडछाड, उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार आणि बेकायदेशीर मदत अशा १६ प्रकारच्या गैरप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यूपीएससी, एसएससी, रेल्वे आणि बँकिंग भरती परीक्षांनाही हा कायदा लागू होणार आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विधेयकावर टीका केली. पारदर्शक आणि पेपरफुटीमुक्त परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या कठोर तरतुदी या विधेयकात नसून, सरकारने केवळ वरवरचे बदल केले असल्याचं ते म्हणाले. सरकारने जंतरमंतरवरच्या आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर टीका करतांना खरगे यांनी, या आंदोलकांवर झालेल्या कारवाईप्रकरणी चौकशी करावी, गृहमंत्री अमित शहा यांनी त्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

**

राष्ट्रीय गीत वंदे मातरम संदर्भातलं राष्ट्रगौरव अवमान निवारण सुधारणा विधेयकही संसदेनं संमत केलं आहे. राज्यसभेनं मंजूर केलेलं हे विधेयक काल लोकसभेत पारित करण्यात आलं.

****

अंमली पदार्थांच्या विरोधात सामुहिक युद्ध पुकारण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. काल मुंबईत अंमली पदार्थमुक्त मुंबई अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हे युद्ध जिंकण्यासाठी तरुण पिढीचा निग्रह अतिशय आवश्यक असल्याचं, ते म्हणाले. नशामुक्त भारतासाठी नशामुक्त महाराष्ट्र, नशामुक्त मुंबई करणं अतिशय महत्त्वाचं असून, आजची युवा पिढी यात अतिशय मोलाचं योगदान देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अंमली पदार्थविरोधी शपथही उपस्थितांना यावेळी देण्यात आली.

****

उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीड जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समिती सभागृहात विविध महत्त्वपूर्ण विभागांची आढावा बैठक पार पडली. बीडमधल्या रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. खामगाव इथल्या आरयूबीचं काम १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे, तसंच प्रकल्पाचा पुढील टप्पा १७ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून उद्घाटन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विशेष भर देण्यासोबतच जुन्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती आणि उमेद मॉलचं काम तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय बीडमध्ये आयोजित होणाऱ्या खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन स्पर्धेचं नियोजन शिस्तबद्ध पद्धतीनं करण्याच्या सूचना पवार यांनी क्रीडा विभागाला दिल्या.

****

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यानिमित्त होणाऱ्या ९९ नांदी साहित्य संमेलनांसाठी देखील पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. विद्यापीठांमध्ये होणाऱ्या १३ विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी २५ लाख रुपये याप्रमाणे राज्यातल्या तेरा विद्यापीठांना मिळून चार कोटी रुपये निधी सामंत यांनी जाहीर केला.

****

महिलांनी रजोनिवृत्ती तसंच पीसीओडीसंदर्भातल्या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल याच विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. आरोग्य यंत्रणेने याबाबत व्यापक जनजागृती करून आवश्यक आरोग्यसेवा प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवावी, असं आवाहन बोर्डीकर यांनी केलं.

****

बीड जिल्ह्यात परळी इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना काल आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते लाभांचं वितरण करण्यात आलं.

धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात उद्या एक ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या बोरी इथल्या अनुराधा चौधरी यांनी उमेद अभियानातून मोठी प्रगती साधली आहे. याबाबत आपला अनुभव सांगताना त्या म्हणाल्या:

बाईट - अनुराधा चौधरी

****

रमाई आवास योजनेत घरबांधणीसाठी पहिल्या टप्प्यात मिळणारा हप्ता दुप्पट करण्यात येणार आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ही घोषणा केली. हा पहिला हप्ता आता २५ हजार रुपयांवरून ५० हजार रुपये करण्यात येणार आहे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यात ११ तालुक्यांतल्या एकूण ९७ हजार १९४ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरलं आहेत. मात्र, आतापर्यंत केवळ २७ हजार ५०० शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण झालं आहे.

**

या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या एक लाख ६० हजार ७६९ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पहिल्या यादीत ७९ हजार ८५५ पात्र शेतकऱ्यांना सुमारे ५८२ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

****

मराठवाड्यातल्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार सुरु आहे. फुलंब्री, कन्नड, सोयगाव, पैठण याठिकाणीही जोरदार पाऊस झाला. सोयगाव तालुक्यात सोना नदीला पूर आला असून, वेताळवाडी धरण पूर्ण भरलं आहे. सिल्लोड तालुक्यातही ओढे, नाले दुथडी भरुन वाहत असून, केळणा नदीला या हंगामातला पहिला मोठा पूर आला आहे.

जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात रात्रभरापासून पावसाची संततधार सुरूच आहे. जालना शहरातल्या काही सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

नांदेड शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासमोरील रस्ता खचल्यामुळे एक कार त्या खड्ड्यात कोसळली. सुदैवाने कारमध्ये कोणी नव्हतं. जिल्ह्यात किनवट आणि माहूर इथं मुसळधार पाऊस झाला. पैनगंगा नदीवर किनवट तालुक्यात असलेला सहस्त्रकुंड धबधबा यावर्षी पहिल्यांदाच प्रवाहित झाला आहे.

परभणी शहरात महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली आहे. शहरात काही भागात झाडं पडल्याने काही वाहनांचं नुकसान झालं, तसंच वाहतुक विस्कळीत झाली होती.

धाराशिव जिल्ह्यातही रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. खरीप हंगामातल्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळालं असून, जिल्ह्यातला पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, हवामान विभागाने आज नाशिक आणि पुण्यात पावसाचा रेड अलर्ट, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच बीड जिल्ह्याला यलो अलर्ट दिला असून परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या ५७ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत असून, धरणाची पाणीपातळी सुमारे ७२ टक्क्यांवर पोहोचली आहे.

****