Tuesday, 26 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान, महाराष्ट्रातल्या आठ मान्यवरांचा विविध क्षेत्रातल्या कामगिरीसाठी गौरव

·      पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १५ मे पासून चौथ्यांदा वाढ

·      नीट परीक्षेतल्या त्रुटींबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त,पेपर फुटीप्रकरणी पुण्याच्या मनिषा हवालदार यांना सहा दिवसांची सीबीआय कोठडी

·      टीसीएस धर्मांतरप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची पोलीस चौकशी 

·      आणि

·      मराठवाड्यातल्या बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट 

****

यावर्षीचे पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल प्रदान केले.महाराष्ट्रातल्या आठ मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल यावेळी गौरवण्यात आलं. अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.त्यांच्या पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आला. जाहीरात क्षेत्रातले अग्रणी पीयुष पांडेय यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

परभणीच्या श्रीरंग देवबा ऊर्फ दादा लाड यांना कृषी क्षेत्रातल्या कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं.

याशिवाय समाजसेवेसाठी रामचंद्र आणि सुनिता गोडबोले, तमशा कलाकार रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग ॲथलीट प्रवीण कुमार यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पहिल्या टप्प्यातले ६६ पद्म पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.

****

पेट्रोलच्या दरात काल दोन रुपये ६१ पैसे, तर डिझेलच्या दरात दोन रुपये ७१ पैशांची वाढ झाली. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर १११ रुपये २१ पैसे प्रति लिटर तर डिझेलचे दर ९७ रुपये ८३ पैसे प्रति लिटर झाले आहेत. १५ मे पासून आजपर्यंत चार वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सात रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

****

पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होर्मूज सामुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात पाच टक्क्यापेक्षा जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात दोन आठवड्यातला नीचांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रतिबॅरल १०० डॉलरपेक्षा कमी झाला आहे.

****

नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही एनटीए नं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे, अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

****

नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनिषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने सहा दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनी यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला. अग्रेको इंडिया ही ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातल्या फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. यामुळे पुण्यात ४०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पुढील १० वर्षात एक हजार रोजगार निर्मिती होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

**

आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाला संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. गायींची तस्करी, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरील अमानुष अत्याचार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. परिवहन आयुक्त कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार,राज्यातले सीमावर्ती भाग, मुंबईसह प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर विशेष नाकाबंदी आणि वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.

****

राज्यात काल दोन वेगवेगळ्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे एक चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले आठजण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला.

दुसरा अपघात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरुन येणाऱ्या ट्रकला धडकला त्याच वेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकले. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पंचवीस जण जखमी झाले.

****

टीसीएस कंपनीतील धर्मांतराचा प्रयत्न तसंच लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय देणाऱ्या छत्रपती संभाजीनगर इथले एमआयएम नगरसेवक मतीन पटेल तसंच घरमालक हनिफ खान यांची नाशिकमधल्या गुन्हे शाखेत काल चौकशी करण्यात आली. मतीन पटेलचा मोबाइल एसआयटीने ताब्यात घेतला आहे. निदा खान हिला भाड्याने घर घ्यायचे आहे, ही माहिती नियोजन पद्धतीने लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

****

बीड जिल्ह्यात सिरसाळा इथं बुद्धरूपाचं अनावरण आणि विहार लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला भिक्खू संघ, उपासक-उपासिका आणि नागरिकांची उपस्थिती होती. महू इथले भंते डॉ. धम्मदीप महाथेरो आणि बोधगया इथले भंते प्रज्ञापिओ यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं.

****

कुपोषणमुक्त जालना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. मिशन न्यूट्रिशन जालना अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर त्या काल बोलत होत्या. जिल्ह्यात कुपोषणाचं प्रमाण कमी करून बालकांचं आरोग्य सुदृढ करणं हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे.

****

बीड जिल्ह्यात १५ मे पासून झालेल्या मुसळधार अवकाळी पाऊस आणि जोरदार चक्रीवादळाने शेतपिकं, फळबागा, कृषी संरचना आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि जल्हिाधिकारी विवेक जॉन्सन यांना पत्र लिहून, नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

****

मराठवाड्यातल्या काही भागात काल अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली.

छत्रपती संभाजीनगर शहरात काल पूर्व मौसमी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात फुलंब्री शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे.

जालना शहरासह जिल्ह्यात काल संध्याकाळी पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद, शिरजगाव, बोरवड, केदारखेडा, राजुर इथं हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

लातूर जिल्ह्यातही अनेक भागांत काल मुसळधार पाऊस झाला. निलंगा तालुक्यात जाऊ, नणंद, जेवरी, जवळगा आदी गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. औसा तालुक्यातल्या खोरोसा, लामजना, किल्लारी तसंच परिसरातल्या इतर गावांमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकरी वर्गात पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

धाराशिव शहर आणि परिसरात काल हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.

बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथल्या लऊळ परिसरात, तसंच आष्टी आणि पाटोदा तालुक्यातही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त आहे. अंबाजोगाई शहर आणि परिसरात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला.अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यातल्या दहेगाव परिसरात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उन्हळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

****

विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात काल सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरी इथं ४७ पूर्णांक २ दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची, तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

****

शेतकऱ्यांना कमी वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जनसमर्थ पोर्टलवर नोंदणी साठी बँकांनी मदत करावी असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. पिक विमा, आवास योजना, गाय गोठा अनुदान, लाडकी बहीण या योजनेच्या  शासनाकडून आलेल्या अनुदानातून कर्जाची रक्कम कपात करू नये, असंही त्यांनी बँकांना सूचित केलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...