Friday, 22 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 22 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या दहा राज्यांमधल्या २४ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंह यांच्यासह अनेक सदस्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक मधल्या प्रत्येकी चार, राजस्थान आणि मध्य प्रदेश मधल्या प्रत्येकी तीन, झारखंड मधल्या दोन, तर मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम मधल्या प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना एक जून रोजी जारी केली जाईल. मतदान आणि मतमोजणी १८ जून रोजी होईल.

दरम्यान, आयोगाने महाराष्ट्र आणि तामिळनाडू मधल्या राज्यसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार आणि ऑल इंडिया अण्णा द्रमुकचे खासदार सी. व्ही. षण्मुगम हे नुकतेच राज्य विधानसभेवर निवडून आल्यामुळे याजागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी देखील १८ जून रोजी मतदान होणार आहे.

****

आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमांच्या सुरक्षेकडे केवळ एक स्वतंत्र कार्य म्हणून न पाहता, एक व्यापक प्रादेशिक जबाबदारी म्हणून पाहिले गेले पाहिजे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सीमा सुरक्षा दलाच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. अनेक प्रकारच्या त्रुटी आणि आव्हानं असूनही, या दलाने सातत्याने देशाची प्रतिष्ठा जपली असल्याचं ते म्हणाले. राज्य पोलीस, केंद्रीय सशस्त्र दले, गुप्तचर संस्था आणि स्थानिक प्रशासन यांनी चांगला समन्वय राखण्याचं आवाहन शहा यांनी यावेळी केलं.

****

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आज साजरा होत आहे. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि सर्व सजीवांसाठी शाश्वत भविष्य घडवण्यासाठी एकत्र येण्याचा संकल्प यानिमित्त करण्यात येत आहे. जागतिक परिणामासाठी स्थानिक पातळीवर कृती करा, ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. नागरिकांनी प्रत्येक जीवांच्या सामायिक भविष्यासाठी मदत करावी, असं आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. जैवविविधतेचा ऱ्हास थांबवण्यासाठी प्रत्येकाला कृती करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. समृद्ध जैवविविधता हे शाश्वत विकासाच्या अनेक आव्हानांवरील उत्तर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

****

आधुनिक भारताचे जनक, स्त्री सक्षमीकरणाचे पुरस्कर्ते, ब्राह्मो समाज संस्थापक 'राजा राम मोहन रॉय' यांना आज जयंतीदिनी अभिवादन करण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राजा राममोहन रॉय यांना आदरांजली वाहिली. सतीप्रथेसारख्या अमानवी रूढी, अंधश्रद्धा आणि सामाजिक कुप्रथांविरुद्ध लढा देत त्यांनी आधुनिक भारताच्या पायाभरणीला बळ दिलं. त्यांची प्रगतिशील विचारसरणी, समाजसुधारणेसाठीचं समर्पण आणि दूरदृष्टी देशवासियांना सदैव प्रेरणा देत राहील, असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्हयात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातलं महत्त्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमिताने उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आल आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल.

****

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नांदेड महापालिकेत आज आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत नांदेडमधील धोकादायक होर्डिंग आणि इमारतीवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिले. शहरात नालेसफाईची कामं ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पुरामुळे दोन हजार ७७३ घरे बाधित होतात, या सर्व घरांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

****

राज्य शासनातर्फे युवकांना संयुक्त संरक्षण सेवा-सीडीएस या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे. सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये भरतीसाठी ही परिक्षा घेण्यात येते. १५ जून २०२६ ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत नाशिक इथल्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात हा अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात ३ जून रोजी मुलाखतीस हजर राहण्याचं आवाहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आलं आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...