Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 09 May 2026
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ मे २०२६ दुपारी १.०० वा.
****
पश्चिम बंगालचे नववे मुख्यमंत्री
म्हणून ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकाता इथं ‘ब्रिगेड परेड
ग्राउंड’वर हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांसोबतच, पाच कॅबिनेट मंत्र्यांनाही राज्यपाल आर. एन.
रवी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या मंत्रिमंडळात दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशीथ प्रामाणिक आणि खुदीराम टुडू यांचा समावेश आहे. या प्रसंगी पंतप्रधान
नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण
मंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अनेक केंद्रीय मंत्री
आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपची प्रथमच
सत्ता प्रस्थापित झाली आहे.
****
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या
एकशे पासष्ठाव्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना आदरांजली
वाहिली आहे. गुरुदेव, एक महान विचारवंत, कलाकार आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांच्या कलाकृतींतून भारतीय संस्कृतीची समृद्धता
आणि मानवी मूल्ये स्पष्टपणे अधोरेखित होतात, ज्यांचा प्रभाव भावी
पिढ्यांवर कायम राहील असं, उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं
आहे.
टागोर हे भारताच्या सांस्कृतिक आत्म्याचा
शाश्वत आवाज होते. त्यांची कालातीत शिकवण आणि विचार लोकांना सदैव मार्गदर्शन करत राहतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
व्यक्त केला.
****
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराणा
प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत देशवासीयांना त्यांच्या अदम्य साहस आणि राष्ट्रभक्तीपासून
प्रेरणा घेण्याचा संदेश दिला. महाराणा प्रताप हे शौर्य, पराक्रम
आणि स्वाभिमानाचे अमर प्रतीक आहेत. त्यांनी मातृभूमीच्या सन्मान, गौरव आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केलं असल्याचं
पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, महान स्वातंत्र्यसेनानी गोपाळ कृष्ण गोखले,
आणि महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी त्यांना अभिवादन केलं. तसंच, थोर समाजसुधारक कर्मवीर भाऊराव
पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्तही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
केलं.
****
मुंबई विद्यापीठाच्या विना अनुदानित
विभागांतील शिक्षकीय पदांमधील विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक
प्राध्यापक आणि संचालक पदांसाठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत ११ मे पर्यंत वाढ करण्यात
आली आहे. विद्यापीठाने यासंदर्भात अधिकृत सूचना प्रसिद्ध केली आहे. याशिवाय,
ऑनलाईन अर्जाची छापील प्रत तसंच शैक्षणिक, अध्यापन
आणि संशोधन पात्रतेचे तीन संच विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातील आवक विभागात सादर करण्याची
अंतिम मुदत १५ मे पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. सर्व संबंधित उमेदवारांनी सुधारित
वेळापत्रकाची नोंद घेऊन विहित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन मुंबई विद्यापीठ प्रशासनाने केलं आहे.
****
पुणे जिल्ह्यातील नसरापूर आणि म्हाळुंगे
इथं अत्याचाराला बळी पडलेल्या दोन बालकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या ‘मनोधैर्य’
योजनेअंतर्गत प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे. या संदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे
अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली
विशेष बैठक पार पडली. बैठकीत दोन्ही प्रकरणांतील कागदपत्रांची सविस्तर कायदेशीर तपासणी
करण्यात आली. त्यानंतर पीडितांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात
आला. “अशा दुर्दैवी घटनांमुळे झालेल्या मानसिक आणि शारीरिक वेदना आर्थिक मदतीने भरून
निघू शकत नाहीत. मात्र, पीडित
बालक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी ही मदत महत्त्वाची ठरू शकते.” जिल्हा
विधी सेवा प्राधिकरण पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी
कायम कटिबद्ध असल्याचं न्यायमूर्ती महाजन यांनी बैठकीत स्पष्ट केलं.
****
लातूर जिल्ह्यात ३५ खासगी विहिरी
आणि विंधन विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. यात औसा तालुक्यात ११, अहमदपूर १०, उदगीर
तालुक्यातल्या आठ विहिरींचा समावेश आहे तसंच रेणापूर आणि चाकूर तालुक्यात प्रत्येकी
एका गावासाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जळकोट तालुक्यात टँकर भरण्यासाठी
तीन आणि इतर दोन अशा एकूण पाच विहिरी प्रशासनाच्या ताब्यात घेतल्या आहेत. पाणीटंचाईच्या
पार्श्वभूमीवर नागरिकांना नियमित आणि सुरक्षित पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासन
आवश्यक ठिकाणी तातडीने उपाययोजना करत आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत, आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टाइटन्स
यांच्यात जयपूर इथं सामना होईल. हा सामना सायंकाळी साडे सात वाजता खेळवला जाईल.
****
No comments:
Post a Comment