Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 May
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मे २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
भारताच्या विकासयात्रेत
सहभागासाठी जग उत्सुक;
१९ व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन
·
जे देश स्वतःची
शस्त्रास्त्रं तयार करतात तेच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होतात – संरक्षण मंत्री
राजनाथ सिंग;
शिर्डी इथं संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं लोकार्पण
·
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात
पुन्हा एकदा वाढ
·
छत्रपती संभाजीनगरला
जूनच्या पहिल्या आठवड्यात ४० एमएलडी पाणी देण्याची प्रशासनाकडून ग्वाही
·
नवी मुंबईत पलावा सिटीतून
२१ नायजेरियन नागरिकांना अटक
आणि
·
नांदेडमध्ये मोठ्या
प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
****
भारताच्या विकासयात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल १९ व्या रोजगार मेळाव्याला
दूरदृष्य संवाद पद्धतीने संबोधित करत होते. नावीन्यता, निर्मिती
आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या देशांना जग मान देतं आणि भारत या तिन्ही
क्षेत्रांमध्ये वेगाने प्रगती करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. अलीकडच्या पाच
दिवसांच्या परदेश दौऱ्यात जगातल्या मोठ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली
आणि सर्वांनाच भारतातले युवक आणि तंत्रज्ञान प्रगतीबद्दल विशेष आकर्षण असल्याचं
त्यांनी सांगितलं.
हा रोजगार मेळावा देशभरातल्या ४७ ठिकाणी भरवण्यात आला होता.
५१ हजार युवकांना यावेळी नियुक्तीपत्रं देण्यात आली. याआधीच्या १८ रोजगार
मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे १२ लाख युवकांना विविध सरकारी
विभागांमधे नियुक्ती मिळाली आहे.
दरम्यान, नवनियुक्त युवकांनी आपल्याला मिळालेल्या
जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन, केंद्रीय रस्ते
वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते काल नागपूर इथं रोजगार
मेळाव्यात बोलत होते. यावेळी ३०८ जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.
****
जे देश स्वतःची शस्त्रास्त्रं तयार करतात तेच खऱ्या अर्थाने
आत्मनिर्भर होतात,
असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी जवळ सावळी विहिर इथं उभारण्यात आलेल्या संरक्षण
उत्पादन प्रकल्पाचं लोकार्पण काल राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी
ते बोलत होते. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार
होता, आता पुढील २५-३० वर्षांत भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल, असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प देशाच्या
सुरक्षाव्यवस्थेला अधिक सक्षम करेल आणि रोजगारनिर्मितीलाही चालना देईल, असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बाईट – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे
उत्पादन, दारुगोळा पार्क,
ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची
निर्मिती केली जाणार आहे. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस,
उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यावेळी उपस्थित होते.
हा दिवस देशासाठी ऐतिहासिक असल्याचं सांगत, मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्रात
पुणे, नाशिक,
अहिल्यानगर आणि नागपूर इथं संरक्षण मार्गिका विकसित होणार
असल्याची माहिती दिली.
तत्पुर्वी, राजनाथ सिंह यांनी शिर्डी इथं श्री
साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
****
सार्वजिनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि
डिझेलच्या दरात काल पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर ८७ पैशांनी, तर
डिझेल प्रति लीटर ९१ पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर १०८ रुपये
४९ पैसे प्रति लीटर,
तर डिझेलचा दर ९५ रुपये २ पैसे प्रति लीटर झाला आहे.
पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरु झाल्यानंतर इंधन तेल
पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत, परिणामी
गेल्या १० दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे.
****
देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑईल
या कंपनीनं दिली आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण
झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं
आहे. या महिन्याच्या १ ते २२ तारखेपर्यंत पेट्रोल विक्रीत १४ टक्के तर डिझेल
विक्रीत १८ टक्के वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.
****
शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा
यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या
सूचना केल्याचं ते म्हणाले.
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
कर्करोग विरोधी लढाईत शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी कर्करोग
रुग्णालयं,
कर्करोग तज्ज्ञ, सेवाभावी संस्था यांचा
सहभाग महत्वाचा असल्याचं,
आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत
आरोग्यसेवा आयुक्तालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. कर्करोग तपासणीसाठी
राज्यातल्या आठ परिमंडळात प्रत्येकी एक कर्करोग निदान व्हॅनद्वारे तपासणी सुरू
असून, आतापर्यंत तीन कोटीपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
कर्करुग्णांच्या उपचारासाठी राज्यात २७ ठिकाणी डे केअर युनिट सुरू करण्यात येत
असल्याची माहितीही अबिटकर यांनी दिली.
****
सिंधी समाजाचे संत साई साधराम यांच्या पार्थिव देहावर काल
पाकिस्तानात सिंध प्रांतात अंत्यसंस्कार करण्यात आले. जळगाव इथल्या संत बाबा
हरदासराम समाज मंदिर इथं या प्रसंगाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. मोठ्या संख्येने
उपस्थित सिंधी बांधवांनी अंतिम दर्शन घेत संत साई साधराम यांना श्रद्धांजली अर्पण
केली.
****
छत्रपती संभाजीनगरला जूनच्या पहिल्या आठवड्यात ४०
एमएलडीपर्यंत पाणी मिळेल,
असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा
पलांडे यांनी सांगितलं आहे. त्या काल छत्रपती संभाजीनगर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत
होत्या. नव्या दोन हजार ७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेतून शहराला वाढीव पाणी
देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत, असंही
त्यांनी सांगितलं. वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनीची चाचणी घेण्यात
आली, अशी माहिती त्यांनी दिली.
****
ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवत पलावा
सिटी परिसरातून २१ नायजेरियन नागरिकांना अटक केली. यापैकी दोन सराईत गुन्हेगार
आहेत. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली
पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिस गेल्या
अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होते.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वीच्या
विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्याची मुदत आजपर्यंत वाढवली आहे. ही
मुदत काल संपणार होती. सीबीएसईच्या संकेतस्थळावर गेल्या काही दिवसांपासून विविध
समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला.
****
नांदेड शहरात देना बँक परिसरातल्या एका दुकानातून स्थानिक
गुन्हे शाखेने तब्बल १४ लाख चार हजार रुपयांचे ७०३ धारदार शस्त्र जप्त केले. याआधी
सात मे रोजीही नांदेड शहरातून पोलिसांनी चार हजाराहून अधिक शस्त्र जप्त केले होते.
याप्रकरणी दुकान मालक रणजीतसिंग रामसिंग सरदार याच्या विरुद्ध वजीराबाद पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या नागरीकांसाठी प्रशासनाने व्हॉट्स अॅ्प
चॅटबॉट सेवा कार्यान्वित केली आहे. ९८ २३ ०६ ५९ ७३ या व्हॉट्सअॅ्प क्रमांकावर
नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवा आणि उपक्रमांची माहिती घरबसल्या
सहज उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी या क्रमांकावर ‘हाय’ असा संदेश पाठवून, उपलब्ध
सेवांचा लाभ घ्यावा,
असं आवाहन प्रशासनाच्या वतीने
करण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या खरात आडगाव इथं एका
बोअरवेलच्या खोदकामाच्या ठिकाणी दोन मजुरांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह
मिळाला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या अपघातात १६
वर्षांचा एक मुलगाही जखमी झाला आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या १७
व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचं काल कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या दोन दिवसीय संमेलनाचे अध्यक्ष पुणे विद्यापीठाचे
मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदीप सांगळे हे आहेत.
****
जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह
गारांचा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार
वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. सुमारे अर्धा ते
पाऊण तास झालेल्या जोरदार पावसामुळे परिसरातल्या नाल्यांना पूर आला होता.
****
दरम्यान, राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात
ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४७ पूर्णांक दोन दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
मराठवाड्यात परभणी ४१ पूर्णांक तीन, छत्रपती संभाजीनगर इथं ४१
पूर्णांक चार,
बीड इथं ४० पूर्णांक पाच तर धाराशिव इथं ३८ पूर्णांक सहा
दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा
जिल्ह्यांना पुढचे दोन दिवस उष्णतेचा रेड अलर्ट, नागपूर, यवतमाळ
आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर भंडारा, गडचिरोली आणि
गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment