Wednesday, 20 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 20 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० मे २०२ दुपारी १.०० वा.

****

अखिल भारतीय औषध विक्रेता संघाने विविध मागण्यांसाठी आज एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी औषध आणि अन्न प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या असून, सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरीकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं, आणि बनावट औषध विक्रीला आळा घालण, अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून, यासाठी केंद्र सरकारने कायदे करावे, अशी मागणीही संघटनेनं केली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं या बंदला प्रतिसाद मिळत आहे. शहरातल्या औषधी भवनासमोर सर्व औषधी एजन्सी चालक, वितरकांनी विविध मागण्या करत आंदोलन केलं.

****

बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, शेगाव, जळगाव जामोद शहरांमध्ये केमिस्ट असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी मूक मोर्चा काढण्यात आला. बुलडाणा इथं उपविभागीय कार्यालयाबाहेर औषध विक्रेत्यांनी आंदोलन केलं आणि आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला दिलं.

****

अकोला शहरासह जिल्ह्यातले अडीच हजारांहून अधिक औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही निवडक औषधी दुकानं सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी जिल्ह्यातले सर्व औषध विक्रेते दवा बाजार इथं जमले होते. तिथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, या आंदोलनाविरोधात अकोला शहरातले नागरिक शेखर पूर्णये यांनी अन्न आणि औषध प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या बंदमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होण्याची शक्यता असल्याने आंदोलनावर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या अधिकृत दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल इटलीची राजधानी रोम इथं पोहोचले. रोम विमानतळावर इटलीचे उपपंतप्रधान तथा परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांनी त्यांचं स्वागत केलं. भारतीय सुमदायाकडूनही पंतप्रधानांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदी यांच्या सन्मानार्थ एका विशेष स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. या औपचारिक भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी रोमच्या ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध 'कोलोसियम' स्मारकाला भेट दिली. पंतप्रधान आज पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जियो माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील.

****

भारतीय रेल्वेने आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कचं सुमारे ९९ टक्के विद्युतीकरण पूर्ण करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या वर्षी मार्चपर्यंत ६९ हजार ८७३ किलोमीटरहून अधिक ब्रॉडगेज रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण झाले होतं. या कामगिरीमुळे भारताने युरोपियन युनियन, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्ससह अनेक प्रमुख देशांना मागे टाकलं आहे.

****

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ देण्यात येणारे पुरस्कार काल जाहिर झाले. ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १४ जून रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

****

लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या जल जीवन मिशनसह पाणी पुरवठा योजनांच्या अन्य कामांचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी काल आढावा घेतला. या योजनांच्या कामांसह पाणी पुरवठा योजनांच्या स्रोतांचं बळकटीकरण, पुनर्भरण आदी उपक्रमांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसंच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जलस्रोतांची नियमित तपासणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

****

पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातल्या बापूगाव मधील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १२ जणांवर काल एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी बापूगवहून धानीवरी इथं साखरपुड्यासाठी जात असलेल्या टेम्पोचा मुंबई-अहमदाबाद महामर्गावर भीषण अपघात झाला, यात १४ जणांचा मृत्यू झाला.

****

३२ वं  अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन येत्या २९ आणि ३० मे रोजी धाराशिव इथं होणार आहे. आमदार कैलास पाटील संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संमेलनाच्या उद्घाटक आहेत. ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांना मरणोत्तर “साहित्य जीवनगौरव पुरस्कार” संमेलनात प्रदान केला जाणार आहे, चंदनशिव यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दरवर्षी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या साहित्यिकाला देण्याचा निर्णय संमेलनाच्या आढावा बैठकीत घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात येत्या २६ मे  पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत लागू राहणार आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो, अशा परिस्थितीत पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून दरवर्षी प्रशासनातर्फे सुरक्षेच्या दृष्टीने या उपाययोजना केल्या जातात.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...