Thursday, 14 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 14 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १५ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाचं वेळापत्रक जारी;राज्यात ३० जूनपासून प्रारंभ

·      उद्योग विभागाकडून एक लाख १४ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार; आठ हजार रोजगाराच्या संधी

·      राज्य सरकारकडून शेंगदाणा तेल तसंच मोहरीचे तेल वापराला प्राधान्य

·      केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी

·      छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन

आणि

·      मराठवाड्यात पुढचे दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

****

केंद्रीय निवडणूक आयोगानं १६ राज्यं आणि ३ केंद्र शासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक आज जाहीर केलं. त्यानुसार महाराष्ट्रात ३० जून ते २९ जुलै दरम्यान बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर ३ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि ७ ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. १ ऑक्टोबरपर्यंत वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या ९ कोटी ८६ लाख ६४ हजार ४१३ मतदारांची नोंद आहे.

****

मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून राज्यातल्या ८ हजार ७६७ पदांना मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामधे ५० टक्के सवलत, संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी, राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम २०२५ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता, नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी दहा लाख रुपये अनुदान, आदी निर्णयांवर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं.

****

उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेडसमवेत १ लाख १४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार आज झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पामुळे राज्यात तब्बल ८ हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. या सामंजस्य करारामुळे मुंबई महानगर प्रदेशात इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्कआणि एआय कॉम्प्युटहबउभारला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर आधारित असेल. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा ८ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

****

पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाप्रमाणे राज्य सरकार पुढचे सहा महिने मोठे शासकीय कार्यक्रम आयोजित करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. आज मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

आयात केलेल्या खाद्य तेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून शासकीय उपहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला प्राधान्य दिलं जाणार आहे.

कोणत्याही कारणांसाठी वाहन फेऱ्यांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये पीएनजीचा वापर बंधनकारक आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा तसंच सजावटीचे दिवे, फ्लेक्स, बॅनर, यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरु नये असंही सरकारनं म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे, ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. मात्र युरोपियन युनिअन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता साखरेची निर्यात केली जाऊ शकते. सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे.

****

राज्य विधानपरिषदेवर निवडून आलेल्या १० नवनिर्वाचित सदस्यांनी आज सदनाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती राम शिंदे यांनी त्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू, भाजपाच्या डॉ. प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झिशान सिद्दीकी यांचा समावेश आहे.

****

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सीईटीतील पीसीबी समुहाच्या पेपरमधील प्रश्नांवर आणि उत्तरांवर आक्षेप नोंदवण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. गेल्या २१ ते २९ एप्रिल दरम्यान ही परीक्षा झाली होती. ई-मेलद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त प्रश्न आणि उत्तरांसंबंधीचे निवेदन, तक्रारी विचारात घेतल्या जाणार असल्याचं कक्षातर्फे कळवण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.

छत्रपती संभाजीनगर इथं जयंतीनिमित्त शहरातील टीव्ही सेंटर परिसरात संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विविध सामाजिक, धार्मिक आणि युवक संघटनांच्या वतीने कार्यक्रम सादर करण्यात आले.

पैठण इथं आमदार विलास भुमरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची प्रेरणा आणि संस्कार रुजवण्याच्या उद्देशाने २० हजार वह्यांपासून छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य रेखाचित्र साकारण्यात आलं.

****

राज्य राखीव पोलीस बल -एसआरपीएफ शिपाई भरतीची लेखी परीक्षा येत्या १७ मे रोजी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विविध केंद्रांवर सकाळी ११ वाजता परीक्षा होणार आहे, उमेदवारांनी सकाळी ७ वाजेपर्यंत आपापल्या केद्रांवर उपस्थित राहण्याचं एसआरपीएफकडून सूचित करण्यात आलं आहे.

****

समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत लातूर जिल्हा परिषदेच्या १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं वितरित करण्याच्या उपक्रमाचा आज शुभारंभ झाला. पाठ्यपुस्तक वितरित करणाऱ्या वाहनाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे उपस्थित होत्या.

****

छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्यासाठी जीवन प्राधिकरणामार्फत उभारण्यात आलेली ९०० मिलिमीटरची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी दिले आहेत. पाणी वितरण व्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पाणी येण्याच्या वेळेत वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी वीज महावितरण प्रशासनाशी समन्वय साधण्याची सूचनाही महापौरांनी केली.

****

शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेती समृद्ध करण्यावर भर द्यावा, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. नायगाव तालुक्यातील लालवंडी इथं सगरोळी कृषी विज्ञान केंद्र आणि हवामान अनुकूल शाश्वत विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रसंगी ते बोलत होते. या प्रात्यक्षिकानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या 'खरीप हंगाम पूर्व गाव मोहिमे'ला भेट दिली.

****

जनगणना प्रगणक प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याप्रकरणी धुळ्यातील तीन शिक्षिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनगणना कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या तिन्ही शिक्षिकांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.

****

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह राज्यातील अकृषी विद्यापीठं आणि संलग्न महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज काळया फिती लाऊन काम केलं. हे आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे.

****

थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

****

हवामान

मराठवाड्यात नांदेड, लातूर, धारशिव मध्ये पुढचे दोन दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा आला. मात्र, आंबा उत्पादकांना याचा फटका बसला आहे.

राज्यात आज अकोला इथं सर्वाधिक ४५ पूर्णांक नऊ दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४३ पूर्णांक चार, परभणी ४२ पूर्णांक नऊ तर धाराशिव इथं ४१ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...