Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 25
May 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मे २०२६ दुपारी १.०० वा.
****
सर्वोच्च न्यायालयानं आज नीट परीक्षेतील वारंवार होणाऱ्या
त्रुटींवर नाराजी व्यक्त केली आहे. पेपरफुटीच्या आधीच्या घटनांतून राष्ट्रीय परीक्षा
संस्था अर्थात NTA नं कोणताही धडा घेतलेला नाही, ही दुर्दैवी बाब असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा
आणि आलोक अराधे यांच्या पीठानं केंद्र सरकार, NTA आणि CBI ला नोटीस बजावत याप्रकरणी स्पष्टीकरण मागवलं आहे. तसंच, NTAच्या कामकाजातील सुधारणांबाबत माजी इस्रो प्रमुख के. राधाकृष्णन समितीच्या शिफारशींची
अंमलबजावणी कशी झाली, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. २२ लाखांहून
अधिक विद्यार्थ्यांवर पेपरफुटीचा परिणाम झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
****
दरम्यान, NTA नं या महिन्याच्या २८ तारखेला नियोजित
असलेली विद्यापीठ सामायिक प्रवेश परीक्षा पुढं ढकलली आहे. सरकारनं बकरी ईदची सुट्टी
२८ तारखेला जाहीर केली, त्यामुळं हा बदल केला आहे. या परीक्षेच्या
उमेदवारांसाठी सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती एनटीएनं दिली.
****
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी प्रति लिटर
अडीच रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसातली ही चौथी दरवाढ आहे.
त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर दोन रुपये ६१ पैसे तर डिझेलच्या दरात दोन रुपये
७१ पैसे वाढ करण्यात आली आहे. काँग्रेसनं या दरवाढीवर टीका केली आहे. गेल्या १० दिवसांत
इंधन दरवाढ तब्बल साडेसात रुपयांनी झाली. हा थेट सामान्य माणसाच्या खिशावर टाकलेला
दरोडा आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी
नागपूर इथं केली.
****
'आयुष्मान भारत डिजिटल मिशन'नं एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला
आहे. आता १०० कोटींहून अधिक आरोग्य नोंदी 'आयुष्मान भारत आरोग्य खाते' ‘आभा‘ शी जोडल्या गेल्या आहेत. जोडल्या गेलेल्या नोंदींची
संख्या गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमधील ५० कोटींवरून अवघ्या १५ महिन्यांत दुप्पट होऊन
१०० कोटींहून अधिक झाली झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
****
१९ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी माध्यम
प्रतिनिधी नोंदणी सुरु झाली आहे. मुंबई इथं १५ ते २१ जून दरम्यान या चित्रपट महोत्सवाचं
आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या
या द्विवार्षिक महोत्सवात प्रामुख्यानं माहितीपट, लघुकथापट आणि ॲनिमेशन अशा 'नॉन-फीचर' फिल्मचा समावेश असतो.'सर्वोत्कृष्ट माहितीपटा'साठी १० लाख रुपयांचा 'सुवर्ण शंख पुरस्कार' दिला जातो.
****
अंबेनळी घाटातील ८०० फुट दरीत चारचाकी कोसळून झालेल्यास
अपघातात आठ जणांचा मृत्यूस झाला. मृतांमध्ये एकजण रत्नागिरी जिल्ह्यातील असून बाकीचे
७ जण सातारा जिल्ह्यातील आहेत. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात
आज पहाटे हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेप्रती शोक व्यक्त
केला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अहिल्यानगर-कल्याण
महामार्गावर डिंगोरे इथं काल रात्री एसटी बस आणि दुचाकी यांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला.
****
वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव इथल्या माने रुग्णालयात बेकायदेशीर
गर्भलिंग तपासणी प्रकरणी रुग्णालयाचे संचालक माजी सरपंच डॉ. विवेक माने यांच्यासह पाच
जणांवर गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. या रुग्णालयात बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान होत असल्याची गुप्त
माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं तातडीनं सापळा रचून ही कारवाई केली.
****
छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीतीचे सभापती
आणि उपसभापती यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न
बाजार समितीत परवाना नूतनीकरणाबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या एका व्यापाऱ्याला मारहाण, शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार या व्यापाऱ्यानं केल्यानंतर
कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलांतर्गत येणाऱ्या हर्सुल
पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारवायांमध्ये हस्तगत करण्यात आलेली आणि बेवारस स्थितीत
मिळून आलेली दुचाकी आणि चारचाकी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात जमा आहेत. या जप्त करण्यात
आलेल्या बेवारस वाहनांची कायदेशीर रितीनं विल्हेवाट करायची आहे, त्यामुळं वाहन मालकांचा शोध सुरू केला आहे. ज्या व्यक्तींचे ही वाहनं असतील, त्यांनी सात दिवसांच्या आत हर्सुल पोलीस ठाण्यात हजर राहून आपला मालकी हक्क सिद्ध
करावा, असं आवाहन पोलीस विभागानं केलं आहे.
****
पुढील दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस, मराठवाड्यात बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची
शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर येत्या २६ तारखेपर्यंत अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट, तर अकोला, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment