Saturday, 16 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्‍यात १२ रुपये ३५ पैसे प्रतिकिलो दराने कांदा खरेदी-केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा

·      प्रधानमंत्री आवास योजनेत ५ लाख घरांचं वितरण-पाच वर्षांत राज्य बेघरमुक्तीचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार

·      वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची येत्या २१ जून रोजी नीट युजी फेरपरीक्षा

·      ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ-लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार

·      थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक-चिराग जोडी उपान्त्य फेरीत दाखल

आणि

·      नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमध्ये २६ मे च्या दरम्यान येण्याचा अंदाज

****

शेतकऱ्यांच्‍या हितासाठी राज्‍यात नाफेडच्‍या माध्‍यमातून १२ रुपये ३५ पैसे किलो या दराने कांदा खरेदी सुरु करत असल्याची घोषणा, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधील ५ लाख घरांचं वितरण, चौहान यांच्या हस्ते काल साताऱ्यात करण्यात आलं, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. याठिकाणी सहा लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्‍वरुपात घराच्‍या चाव्‍या प्रदान करण्‍यात आल्‍या. यावेळी कांद्यांच्या मुद्यावर बोलतांना चौहान म्हणाले…

बाईट- केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

 

ऊस उत्‍पादकांच्‍या प्रश्‍नाबाबत पुढील आठवड्यात दिल्‍लीत बैठक आयोजित करणार असल्‍याचंही चौहान यांनी यावेळी सांगितलं. व्ही. बी जी राम जी योजना एक जुलैपासून कार्यान्वीत होणार असल्याचं ग्रामविकास मंत्री चौहान यांनी सांगितलं. राज्‍यातील १ कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्‍यासाठी सक्रिय राहणार असल्‍याची माहिती चौहान यांनी दिली. ते म्हणाले…

बाईट- केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभुराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गेल्या वर्षभरात ५ लाख घर बांधून पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. येत्या ५ वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले…

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात  कोकण, नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर, अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीणमध्ये विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी, पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजने नांदेड पहिल्या, अमरावती दुसऱ्या आणि वर्धा जिल्हा तिसऱ्या स्थानी आहे.

****

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट युजी २०२६ ही परीक्षा येत्या २१ जून रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था– NTA कडून काल ही माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना १४ जून पर्यंत प्रवेशपत्रं दिली जातील.

एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असं, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. परीक्षार्थींना यापूर्वी भरलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल, तसंच ही परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरमधून निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यास ताब्यात घेतलं होतं, त्याला काल चौकशीअंती पुण्यात अटक करण्यात आली. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य असलेल्या कुलकर्णीने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही विद्यार्थ्यांना पुणे इथल्या आपल्या निवासस्थानी विशेष शिकवणी दिली होती. या प्रकरणातली सहआरोपी मनीषा वाघमारे हिने विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यात त्याला मदत केल्याचंही चौकशीत उघड झालं आहे. या विशेष शिकवणीत विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगण्यात आली. ३ मे रोजी घेतलेल्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी हे प्रश्न तंतोतंत जुळत असल्याचं सीबीआयने म्हटलं आहे.

**

लातूर इथल्या एका खासगी शिकवणी वर्ग चालकाची काल सीबीआयने चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. CBI च्या पथकाने त्याच्या घरातून तसंच शिकवणी वर्गातून काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याचंही आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या २१ जूनऐवजी २८ जून रोजी घेण्यात येणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत, तर दुसरा पेपर दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना १६ जूनपासून mahatet.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत.

****

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरुन सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये केलं जातं, हे योग्य नसल्याचं, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. हे प्रकार सहन करुन घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. याप्रकरणी पुढची सुनावणी ३० जुलै रोजी होणार आहे.

****

ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि लेखक डॉ.आनंद नाडकर्णी यांचं काल सकाळी मुंबईत एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

****

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे २०२६ या वर्षाचे ‘मधुमित्र’ आणि ‘मधु-सखी’ पुरस्कार लातूरचे ज्ञानेश्वर मलीले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांना जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत काल ही माहिती दिली. या पुरस्कारांचं वितरण येत्या २० तारखेला जागतिक मधमाशी दिनी छत्रपती संभाजीनगर इथे आयोजित कार्यक्रमात होणार आहे.

****

शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक, जैविक तसंच सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करावा, असं आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केलं आहे. भविष्यात रासायनिक खतांची उपलब्धता सुरळीत राहावी आणि खतांचे वाटप पारदर्शक आणि योग्य पद्धतीने व्हावं, यासाठी शेतकऱ्यांनी 'ॲग्रीस्टॅक' या प्रणालीवर आपली नोंदणी करणं अनिवार्य असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीच्या जोडीने उपान्त्य फेरीत प्रवेश केला. या जोडीने जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युईची शिमोगामीचा २१-१२ आणि २१-१३ असा पराभव केला. तर याच स्पर्धेत महिला एकेरीत उपउपान्त्य फेरीत पी व्ही सिंधूचा जपानच्या अकाने यामागुची हिने पराभव केला तर पुरुष एकेरीत उपउपान्त्य फेरीत लक्ष्य सेनचा थायलंडच्या कुन्लावुत विदीत्सर्न ने पराभव केला.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनौ सुपर जायंट्स ने चेन्नई सुपर किंग्ज चा ७ गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत आज कोलकाता इथे कोलकाता नाईट रायडर्स चा सामना गुजरात टायटन्स सोबत होणार आहे.

****

यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन २६ मे च्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. येत्या २४ तासात अंदमान समुद्र तसंच अंदमान आणि निकोबार द्वीप समुहाच्या काही भागात मान्सून पुढे सरकण्याच्या दृष्टीने अनुकुल वातावरण तयार होत आहे.

दरम्यान राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक ४५ पूर्णांक नऊ दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४३ पूर्णांक चार, परभणी ४३ पूर्णांक नऊ तर धाराशिव इथं ४१ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...