Wednesday, 27 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 27 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

देशभरात अनेक भागात तापमानात वाढ झाली असून, वाढत्या उन्हात नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अशा तीव्र उन्हामध्ये शरिरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवावी, बाहेर जातांना पाणी सोबत ठेवावं असा सल्ला त्यांनी, सामाजिक माध्यमांवरील संदेशात दिला आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणं टाळावं आणि शक्य तितकी विश्रांती घ्यावी, प्राणी आणि पक्ष्यांसाठी घराबाहेर, बाल्कनी, गच्ची, दुकानं किंवा कार्यालयाबाहेर पाण्याने भरलेलं एक लहान भांडं ठेवावं, असंही त्यांनी सांगितलं. या कडक उन्हात लहान मुले, वृद्ध आणि उन्हात काम करणाऱ्या लोकांना सर्वाधिक त्रास होतो. वेळेवर लक्ष न दिल्यास, या स्थितीचं रूपांतर उष्माघातासारख्या गंभीर समस्येत होऊ शकतं. अशा वेळी सतर्कता आणि काळजी एखाद्याचा जीव वाचवू शकते, असं त्यांनी म्हटलं आहे. या काळात संवेदनशीलता आणि मदतीची भावना महत्त्वाची असल्याचं नमूद करत, पंतप्रधानांनी, तहानलेल्या व्यक्तींना पाणी देण्याचं आवाहनही केलं.

****

निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरिक्षण – एसआयआर प्रक्रियेला अवैध ठरवता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५० च्या कलम ३२४ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार निवडणूक आयोगाला एसआयआर आयोजित करण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे. बिहारमध्ये एसआयआर आयोजित करण्यासाठी निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी जूनमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या रिट याचिकांवर सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठाने, हा निकाल दिला. निवडणूक आयोगाने अवलंबलेली प्रक्रिया लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५० आणि मतदार नोंदणी नियम, १९६० यांच्या विरुद्ध आहे, तसंच, या प्रक्रियेमुळे मतदार यादीत आधीच असलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाची गृहीत मान्यता रद्द होईल, हे युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावले. एसआयआर प्रक्रियेचा उद्देश मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांचे उद्दिष्ट साध्य करणं आहे असं मत न्यायालयानं व्यक्त केलं.

****

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत झालेल्या खुल्या चर्चेत न्यूयॉर्क इथले भारताचे राजदूत पी. हरीश, यांनी पाकिस्तानच्या वक्तव्यांना ठाम प्रत्युत्तर दिलं. भारताने स्पष्ट केलं की, स्वातंत्र्यानंतरपासूनच पाकिस्तानकडून सीमापार आक्रमण, दहशतवाद आणि भारतविरोधी कारवायांचा सामना करावा लागत आहे. भारताला सीमापार दहशतवादाविरुद्ध स्वतःचं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असून, दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, असंही त्यांनी ठामपणे नमूद केलं. धार्मिक अतिरेकी विचारसरणी, हिंसक कट्टरता आणि भारतविरोधी प्रचाराला पाकिस्तानकडून सातत्याने पाठबळ दिलं जात असल्याचंही भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये स्पष्ट केलं.

****

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली वाहिली.

****

नीट युजी पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग – सीबीआयनं आज आणखी दोन जणांना अटक केली. लातूर इथले डॉ. मनोज शिरुरे याला आज चौकशीनंतर ताब्यात घेण्यात आलं. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून रसायनशास्त्र पेपरमधले प्रश्न जाणून घेतल्याचा शिरुरे याच्यावर आरोप आहे. पुण्यातल्या डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी इथले रसायनशास्त्र विषयाचे शिक्षक तेजस शहा याला देखील सीबीआयने आज अटक केली. त्याने आरोपी मनिषा हवालदार हिच्याकडून प्रश्नपत्रिका मिळवली होती. याप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे.

****

२१ जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज खजुराहो इथं ही माहिती दिली. “आरोग्यदायी वृद्धत्वासाठी योग” ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगत त्यांनी, निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, ‘योग संगम’ पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी-शर्ट डिझाइनचंही अनावरण करण्यात आलं.

****

वेरूळ इथल्या घृष्णेश्वर मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी विविध सार्वजनिक सुविधांच्या दुमजली बांधकामाला राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. काल याबाबतचे अधिकृत मंजुरी पत्र जारी करण्यात आलं. या विकासकामामध्ये व्यापारी संकुल, दर्शनबारी, पादचारी पू, प्रतीक्षा कक्ष, भक्तनिवास, सभामंडप, आदी कामांचा समावेश आहे.

****

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधू तसंच सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत सिंधुने इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वारदानी हिचा २१-१७, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात, सात्विक – चिराग जोडीने अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन झी यी यांचा २६-२८, २१-१५, २१-१३ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...