Friday, 29 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 29 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक मे २०२ दुपारी १.०० वा.

****

एल निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९० टक्के असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी आज नवी दिल्ली इथं मान्सून २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज जाहिर करताना ही माहिती दिली. एल निनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून, जुलै-ऑगस्टमध्येही त्याचा परिणाम जाणवू शकतो. ईशान्य आणि पूर्व भारतात तुलनेने चांगला पाऊस अपेक्षित असला तरी मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील, असं मोहापात्रा यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. मान्सूनच्या काळात एल निनोची स्थिती निर्माण होण्याची तीव्र शक्यताही त्यांनी वर्तवली.

****

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २०२६-२७ या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गाची एकत्रित लांबी एक हजार ६९२ किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग ५२ छत्रपती संभाजीनगर ते करोडी या मार्गांचा समावेश आहे.

****

राज्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून १२ लाख ५१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

****

बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या, पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी-यूजी या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेने काल जाहीर केलं. या परीक्षा आता ३१ मे, तसंच सहा आणि सात जून रोजी घेतल्या जातील. ३१ मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत; ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील, अशी माहिती संस्थेनं दिली आहे.

****

जायकवाडी धरणाचं पाणी मिळावं, या मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला. शेतीला हक्काचं पाणी मिळावं, यासाठी लोकलढा आंदोलनच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सतत लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू आहे. गोदावरी-सिंदफणा नदीजोड प्रकल्प गतीने व्हावा, यासाठी सर्वेक्षण करावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशीला मोराळे, राजेंद्र आमटे यांच्यासह अनेकांनी या मोर्चात सहभाग घेतला.

****

बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळीला कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने रंगेहात पकडलं. या कारवाईत एकूण आठ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातही प्रतिबंधीत एचटीबीटी कापूस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करुन जवळपास ६ लाख रक्कमेचे बियाणे कृषी विभागाने जप्त केले. जिल्ह्यात तळोदा रस्ता, अक्कलकुवा तालुक्यातल्या वाण्याविहीर, प्रकाशा तसंच समशेरपूर गावात ही प्रतिबंधीत एचटीबीटी विरोधात कारवाई करण्यात आली.

****

नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातल्या कनसाई ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सविता सांबरसिंग पावरा यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. १३ मे रोजी त्यांच्यावर सदस्यांनी अविश्वास पारीत केल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गावाची विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती. या सभेला उपस्थित असलेल्या एक हजार ४५३ ग्रामस्थांपैकी ९०४ ग्रामस्थांनी ठरावाच्या बाजुने, तर ५४९ ग्रामस्थांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं.

****

भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातल्या खुटसावर इथं उष्णतेमुळे एप्रिल महिन्यापासून जवळपास ३ हजार कोंबड्या मरण पावल्या आहेत. गतवर्षी दिवसाकाठी १५ ते २० कोंबड्यांचा मृत्यू होत असे, पण यंदा वातावरणात मोठा बदल झाला असून, ५० ते १०० कोंबड्या रोज मृत्यूमुखी पडत असल्याचं चित्र आहे, त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक संकटात सापडले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

व्हिएतनाममधील दा नांग येथे झालेल्या २३ वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या पुरुष फ्रीस्टाइल आणि महिला कुस्ती संघांनी सांघिक विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. पुरुष फ्रीस्टाइल संघानं ४ सुवर्ण पदकांसह एकूण ९ पदकं जिंकली. तर महिला कुस्ती संघानं ६ सुवर्ण पदकांसह एकूण १० पदकांची कमाई करत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कुस्तीपटूंचं अभिनंदन करत, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...