Thursday, 14 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 14 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

·      कुंभमेळ्यातल्या आखाड्यांना प्रत्येकी पाच कोटी रुपये निधी मुख्यमंत्र्यांकडून जाहीर; सिंहस्थाच्या बोधचिन्हाचं अनावरण

·      नीट पेपरफुटी प्रकरणी पुणे तसंच अहिल्यानगरातून प्रत्येकी एकास अटक

·      छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

आणि

·      मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

****

केंद्रीय मंत्रिमंडळाने १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. सूर्यफुलासाठी प्रति क्विंटल दरात सर्वाधिक ६२२ रुपये तर त्याखालोखाल कापसासाठी प्रति क्विंटल ५५७ रुपये आणि तिळासाठी प्रति क्विंटल ५०० रुपयांची वाढ देण्यात आली आहे. 'ग्रेड ए' धानासाठी किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल २ हजार ४६१ रुपये, संकरित ज्वारीसाठी ४ हजार २३ रुपये, बाजरीसाठी २ हजार ९०० रुपये आणि तुरीसाठी प्रति क्विंटल ८ हजार ४५० रुपये किमान आधारभूत किंमत असेल.

या हंगामात अंदाजे ८२४ लाख मेट्रिक टनांहून अधिक शेतमालाची खरेदी केली जाईल आणि त्यापोटी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अंदाजे दोन लाख ६० हजार कोटी रुपये दिले जातील, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणीसुधारणेला आणि आधुनिकीकरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचं स्वागत करत, पंतप्रधानांचे आभार मानले. मुंबईत माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले…

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यांसाठीच्या वाहनांच्या ताफ्यात कपात केली आहे. ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित असून सुरक्षा दलातली इतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आपला वाहन ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्याची सूचना केली आहे. काल याबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी, मंत्री तसंच अधिकाऱ्यांनी कोणतेही विदेश दौरे करु नयेत, मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा नियमित विमानसेवेचा वापर करावा, मेट्रोसह सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा, आदी सूचना केल्या.

****

नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या आखाड्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा पाच कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. मुंबईत काल सिंहस्थ कुंभमेळा कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आखाड्यांसाठी विविध सुविधांची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं काल फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सद्वारे होणारी फसवणूक रोखण्याकरता दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

****

नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी पोलिसांनी काल पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीनंतर या महिलेला केंद्रीय अन्‍वेषण विभाग –सीबीआईच्या ताब्यात देण्यात आलं.

अहिल्यानगर जिल्ह्यातून धनंजय लोखंडे या तरुणालाही सीबीआयनं काल ताब्यात घेतलं. अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात त्याची कसून चौकशी सुरु असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या प्रकरणातील नाशिक मधला आरोपी शुभम खैरनार याला केंद्रीय गुप्तचर विभागाने ताब्यात घेतलं आहे. शुभमच्या भावाची तसंच मित्रांचीही चौकशी करण्यात येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

दहशतवादी विरोघी पथक-एटीएसने काल छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड जिल्ह्यात काही तरुणांची चौकशी केल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही चौकशी केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क सहा टक्क्यांवरुन १५ टक्के केलं आहे. प्लॅटिनमवर १५ पूर्णांक ४ दशांश टक्के आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.

****

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त परभणी इथं संभाजी सेनेतर्फे आमदार डॉ राहुल पाटील यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने ५१ गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना बि-बियाणे आणि शंभू गाथा पुस्तकांचं वाटप करण्यात येणार आहे. यासह पोवाडे गायन आणि इतर आयोजनातून संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएससीचे १२ वी परीक्षेचे निकाल काल जाहीर झाले. यंदा सुमारे ८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलींमध्ये उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ८८ टक्के तर मुलांमध्ये हे प्रमाण ८२ टक्के आहे.

****

राज्य मंडळाची इयत्ता १० वी तसंच १२ वीची पुरवणी परीक्षा येत्या १६ जूनपासून सुरू होत आहे. यासाठीचं सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. १२ वीचे अर्ज भरण्याची नियमित मुदत उद्या संपत असून, २० मे पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांना २१ मे पर्यंत नियमित शुल्कासह तर २५ मे पर्यंत विलंब शुल्कासह आवेदन पत्र भरता येणार आहेत.

****

राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा योजना – ईएसआयसी रुग्णालय उभारण्याचा मानस असल्याचं, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं. ते काल कोल्हापूर इथं यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्राला या योजनेत देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्व विभागांनी मिशन मोडमध्ये काम करण्याचे निर्देश आबिटकर यांनी दिले.

****

परभणी तालुक्यातल्या सुलतानपूर आणि पूर्णा तालुक्यातल्या सातेगावने शंभर टक्के स्व-गणना पूर्ण केली आहे. प्रशासनाने गावपातळीवर नियोजनबद्ध जनजागृती करत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला. दरम्यान, उद्यापासून जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होत आहे.

****

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी काल एक बैठक घेतली. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करावे आणि त्याची माहिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे द्यावी, असं गौडा यांनी यावेळी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या शिवना परिसरात दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. गौरव आणि गोपाल साबळे अशी त्यांची नावं असून, काल वडिलांसोबत मेंढ्या राखण्यासाठी गेले असतांना ही दुर्घटना घडली.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह राज्यातली अकृषी विद्यापीठं आणि संलग्न महाविद्यालयांमधल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठाचे सर्व कर्मचारी आज काळया फिती लाऊन काम करणार आहेत. आजपासून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन राज्यव्यापी करण्याचा इशारा विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिला आहे.

****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकूण ८८४ कोटी ७२ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या सर्व ९३ महसूल मंडळे अनुदानासाठी पात्र ठरली आहेत. ६ लाख ३४ हजार ६२३ शेतकरी अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

****

परभणी आणि लातूर जिल्ह्यात पीक विमा तक्रारी प्रकरणी सुधारित प्रस्ताव केंद्राला पाठवून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते.

****

हवामान

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक ४५ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं ४४ अंश, छत्रपती संभाजीनगर इथं ४३ पूर्णांक सहा, परभणी ४३ पूर्णांक एक तर धाराशिव इथं ४० पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

दरम्यान, बीड तसंच धाराशिव जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक झाडं उन्मळून पडली. पाटोदा तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...