Saturday, 23 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक;लातूर इथं दोन डॉक्टरांची सीबीआयकडून कसून चौकशी

·      नाशिक इथल्या टीसीएस प्रकरणी १५०० पानांचं दोषारोपपत्र दाखल

·      येत्या ३० जूनपासून राज्यात एसआयआर मोहीम-राजकीय पक्षांकडून एक लाखावर सहायकांची नियुक्ती

·      जनगणना २०२७ अंतर्गत घरगणना मोहिमेत जालना जिल्हा राज्यात अव्वल

आणि

·      मराठवाड्यात धाराशिव तसंच लातूर जिल्ह्यांना आज उष्णतेचा यलो अलर्ट

****

नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने पुण्यातून मनिषा हवालदार या महिलेला अटक केली. पुण्यात भौतिकशास्त्र विषयाची प्राध्यापक असलेल्या या महिलेला राष्ट्रीय परीक्षा परिषदेने तज्ज्ञ म्हणून परीक्षा मंडळावर नियुक्त केलं होतं, मात्र तिने नीटपूर्वी भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न यापूर्वी अटक केलेल्या मनिषा मांढरे या महिलेला दिल्याचं निष्पन्न झालं आहे. सीबीआयने आतापर्यंत नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगरसह दिल्ली, गुरुग्राम आणि जयपूर इथून आतापर्यंत ११ जणांना अटक केली असून, अनेक ठिकाणी शोधमोहीमही राबवली जात आहे.

दरम्यान, सीबीआयने लातूर इथल्या दोन डॉक्टरांची कसून चौकशी केली. डॉ. मनोज देशमुख आणि डॉ. विनोद स्वामी अशी त्यांची नावं असून, या दोन्ही डॉक्टरांनी आपल्या पाल्यांसाठी या प्रकरणातला मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या पी. व्ही. कुलकर्णीकडून प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा संशय आहे.

****

नाशिक इथल्या टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी १५०० पानांचे पहिलं दोषारोपपत्र काल नाशिकच्या न्यायालयात दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रात निदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तार या तिघांसह छत्रपती संभाजीनगर इथला एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याचाही उल्लेख करण्यात आला आहे. पटेल याने निदा खानला आपल्या घरी आश्रय दिला होता.

****

राज्यसभेच्या, दहा राज्यांमधल्या २४ जागांसाठी १८ जूनला निवडणूक होणार असून त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे. राज्यसभेच्या दोन जागांसाठीची पोटनिवडणूकही याच दिवशी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते सी. व्ही. षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या दोन जागा रिक्त झाल्या आहेत.

****

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर-जालना, बीड-लातूर- धाराशिव, नांदेड-हिंगोली-परभणी या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत निवडणुकीची रणनीती, संघटनबांधणी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

****

कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील परिवर्तनाचं सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात टेक वीक २०२६ ची घोषणा केल्यानंतर ते बोलत होते. मुंबई टेक वीकसारख्या उपक्रमांमुळे एआय मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि देशातील एआय नवोन्मेषाचे महाराष्ट्र हे अग्रगण्य केंद्र होईल, असंही फडणवीस म्हणाले. टेक वीक हा कार्यक्रम २९ आणि ३० मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे.

****

नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल-डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये, असं आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल-डिझेलची सुमारे २० टक्के अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राष्ट्रीय जनगणनेअंतर्गत राज्यातील घर यादी आणि गृह गणनेचं काम पूर्ण झाल्यानंतर, येत्या ३० जूनपासून मतदारयाद्या विशेष फेरतपासणी अर्थात एसआयआर मोहिमेला सुरुवात होणार आहे, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना त्यांचे बूथ लेव्हल असिस्टंट नेमण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार, विविध राजकीय पक्षांनी राज्यभरात एकूण १ लाख १३ हजार सहायकांची नियुक्ती केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त ५१ हजार युवकांना नियुक्ती-पत्र प्रदान करणार आहेत. हा १९ वा रोजगार मेळा देशभरातल्या ४७ ठिकाणी आयोजित केला जाणार आहे.

दरम्यान, आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेत येत्या ३१ मे रोजी पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा १३४ वा भाग आहे.

****

जनगणना २०२७ अंतर्गत घरगणना मोहिमेत जालना जिल्ह्याने राज्यात अव्वल क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या कामात जिल्ह्याने ९४ पूर्णांक ५९ शतांश टक्के प्रगती नोंदवली आहे. जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे घरगणना मोहिमेला वेग मिळाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतल्या नियमबाह्य बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे. शासन नियमांनुसार ३१ डिसेंबर २०२० पूर्वीचीच विनापरवाना बांधकामं नियमित केली जाणार आहेत. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर इथं, गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेबाबत मार्गदर्शनपर चर्चासत्रात ते बोलत होते. उद्योजकांनी आपली बांधकामं दिलेल्या मुदतीत नियमित करून घ्यावीत, असं आवाहन श्रीकांत यांनी केलं.

****

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने विभागीय स्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. विभागीय कृषि सहसंचालक सुनिल वानखेडे यांनी ही माहिती दिली. कृषि निविष्ठांसंदर्भात गैरप्रकार आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे. विभाग स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून, 94 21 23 32 70 या क्रमांकावर शेतकरी आपल्या तक्रारी नोंदवू शकणार आहेत.

****

शेतीकामासाठी पेट्रोल आणि डिझेलची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंपधारकांना अधिकृत बॅरल अथवा कॅनमधून इंधन पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरचं आरसी बुक तसंच 'ॲग्रीस्टॅक आयडी' तपासून नोंद करणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याकडे ॲग्रीस्टॅक आयडी नसल्यास आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, नाव आणि स्वाक्षरीची नोंद घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यात काल नॅशनल सीड कॉर्पोरेशन सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर, ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून दिले. भारतीय किसान संघ धाराशिवचे अध्यक्ष नितीन घुले वाशी यांच्या हस्ते या वाटपाचा काल शुभारंभ करण्यात आला. सुमारे २५ शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आलं.

****

सुशिक्षित बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची एक संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने परभणी जिल्हयातल्या मानवत इथं काल जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि के. के. एम. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास १५७ उमेदवार उपस्थितीत होते, त्यापैकी २० उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

****

नांदेड शहरातील नालेसफाईचं काम कोणत्याही परिस्थितीत ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिले आहेत. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पुरामुळे २ हजार ७७३ घरे बाधित होतात. या सर्व घरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

****

सैन्यभरतीसाठी येत्या एक ते बारा जूनदरम्यान सामायिक प्रवेश पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. विविध २२ संवर्गातल्या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरात २०६ शहरांमध्ये ४०३ परीक्षा केंद्रं निर्धारित करण्यात आले आहेत. परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट जॉईन इंडियन आर्मी डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथल्या छावणी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंटस् आणि पंजाब किंग्ज संघात सामना होणार आहे. लखनौ इथं सायंकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

****

हवामान

राज्यात काल ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४७ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४४ अंश, छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक आठ, तर धाराशिव इथं ४० पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातही धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना आज उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण, ढोरकीन, पिंपळवाडी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...