Sunday, 31 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 31 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांचा संवाद हा देशात वेगवेगळ्या व्यक्ती, संस्थांकडून केलेल्या जाणाऱ्या प्रयत्नांमधून मिळणारी प्रेरणा या आशयाशी निगडित होता. मोदी म्हणाले की, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असे काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देते. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्यांची जाणीव होते, तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की, देश आपल्या लोकांच्या सामर्थ्याने पुढे जात आहे.

****

पंतप्रधानांनी आजच्या या १३४ वा भागात सर्वप्रथम दोन धावपटूंशी संवाद साधला आणि त्यांचे मनोगतही जाणून घेतले. काही दिवसांपूर्वी झारखंडमधील रांची येथे राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये गुरिंदरवीर सिंह और अनिमेष कुजूर या दोन धावपटूंनी १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत लागोपाठ तीनवेळा एकमेकांचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला. या दोघांशी सुमारे दहा मिनिटे संवाद साधत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा गौरव केला.

****

यावेळी पंतप्रधानांनी आपल्या नेदरलँड दौऱ्याचा उल्लेख केला. या दौऱ्यात तमिळनाडूमधील चोल राजवंशाच्या काळातील जुने ऐतिहासिक ताम्रपट नेदरलँडकडून भारताकडे सुपूर्द करण्यात आले. देशासाठी ही अतिशय अभिमानाची बाब असल्याचा मोदी यांनी नमूद केलं. या ताम्रपटांविषयी अधिक माहिती देताना पंतप्रधान म्हणाले की, यामध्ये २१ मोठे आणि तीन छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील, राजा राजराजा चोल यांनी दिलेले वचन पूर्ण करण्याशी संबंधित ही बाब आहे. यामध्ये अनाईमंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल राजवंशाच्या कामगिरीचेही वर्णन आहे. त्यातून चोल साम्राज्याची सागरी शक्ती दिसून येते. तसेच, आग्नेय आशियातील देशांशी असलेल्या त्यांच्या संबंधांविषयीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा देशवासियांना अभिमान आहे. भारताचा हा अनमोल वारसा जपण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचा मोदी यांनी नमूद केलं.

छत्तीसगडमध्ये सापडलेल्या तीन दुर्मिळ ताम्रपटांबद्दलही मोदी यांनी यावेळी चर्चा केली.

****

आपल्या या 'मन की बात' उपक्रमात पंतप्रधान मोदी यांनी आज एका गंगा डॉल्फिनला वाचविण्याच्या यशस्वी प्रयत्नावर तयार करण्यात आलेला, आणि सध्या देशभर चर्चेत असेलेला व्हिडिओ नागरिकांनी अवश्य बघावा असे आवाहन केले. 'डॉल्फिन रेस्कू अँब्युलन्स'च्या मदतीने तब्बल १३ तासांच्या प्रयत्नानंतर या डॉल्फिनचा जीव वाचवून त्याला राप्ती नदीत सुखरूप सोडण्यात आले होते.

याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी तमिळनाडूतील नागरकोईल इथल्या शिक्षिका गिरिजा अम्मा यांचा देशभक्ती शिकविणारा प्रसंगही कथन केला. गिरीजा अम्मा यांनी आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना देशातील जवानांसाठी दररोज एक रुपया याप्रमाणे वर्षाचे ३६५ रुपये देण्याचे आवाहन केले. या प्रयत्नातून त्यांच्या संस्थेने तब्बल ४० लाख रुपये जमा करून सैन्याच्या मदतीसाठी दिले. अशा प्रेरक प्रसंगात सर्वांनीच सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले.

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातही यानिमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला. उपजिल्हाधिकारी संजय बागडे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

नवनियुक्त संरक्षण दल प्रमुख लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी आज पदभार स्विकारला. सकाळी नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्स इथं जनरल सुब्रमणी यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण केला.

****

जपान इथं सुरू असलेल्या आशिया कप २०२६ स्पर्धेत भारताच्या १८ वर्षांखालील महिला हॉकी संघाने कोरियावर ३-१ अशा गोल फरकाने विजय मिळवला. नौशीन नाझ, श्रुती कुमारी आणि सामनावीर किरण एक्का यांनी प्रत्येकी एक गोल केला. या विजयासह भारत सहा गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा पुढचा सामना दोन जून रोजी सिंगापूरविरुद्ध होणार आहे.

****

आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सम्राट राणा यांनी काल झालेल्या १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावले. अंतिम सामन्यात, चीनच्या याओ कियानशुन आणि हू काई यांनी भारतीय जोडीचा ०-३ असा पराभव केला. या स्पर्धेत भारत दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 31 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...