आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Wednesday, 13 August 2025
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 13
August 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आजपासून पुढचे तीन दिवस आपल्या
घरावर तिरंगा ध्वज फडकावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
यांनी त्यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकावून या अभियानात सहभाग घेतला. हे अभियान आता
लोकचळवळ बनली असून, ज्यामुळे देशात एकतेचा
संदेश प्रसारित होत असल्याचं शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं.
या अभियानांतर्गत अनेक केंद्रीय मंत्री आणि राजकीय नेते
आपल्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवून या देशभक्ती मोहिमेत सहभागी झाले. क्रीडा राज्यमंत्री
रक्षा खडसे यांनीही दिल्लीत शासकीय निवासस्थानी तिरंगा फडकवून स्वातंत्र्य सैनिकांना
आदरांजली अर्पण केली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊ इथं झालेल्या
तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते.
दरम्यान, हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत इतरही अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
ठिकठिकाणी निघालेल्या तिरंगा फेऱ्यांमध्ये नागरीक उत्स्फुर्त सहभाग नोंदवत आहेत.
****
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने भारतीय सांख्यिकी संस्थेसोबत
डेटा-आधारित नावीन्यपूर्ण संशोधनासाठी पाच वर्षांचा करार केला आहे. प्राधिकरणाच्या
उपमहासंचालक तनुश्री देब बर्मा आणि भारतीय सांख्यिकी संस्थेच्या बंगळूरू केंद्र प्रमुख
बी. एस. दया सागर यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या कराराद्वारे आधार संबंधित व्यवहारांना
अधिक बळकटी दिली जाईल, तसंच त्यांची सुरक्षा
आणि विश्वासार्हता वाढवली जाईल.
****
भारताने तत्काळ भू-मार्गाने बांगलादेशातून ज्यूट उत्पादनं
आणि दोरखंड यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाच्या अधिसूचनेनुसार, ज्यूट कापड, दोर, दोरखंड आणि पिशव्या यांसारख्या वस्तू आता केवळ महाराष्ट्रातल्या
न्हावा शेवा बंदरातूनच भारतात येऊ शकतील. हा निर्णय गुणवत्ता नियंत्रण आणि देशांतर्गत
उद्योगांचं संरक्षण करण्यासाठी घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यातल्या आपत्तीग्रस्त
धाराली-हर्षिल भागात बेपत्ता लोकांसाठी शोध मोहीम अद्यापही सुरूच आहे. आतापर्यंत एक
हजार ३०८ लोकांना वाचवण्यात आलं आहे. उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाने बेपत्ता असलेल्या
६८ लोकांची यादी देखील जारी केली असून, त्यात नेपाळी वंशाच्या २५ व्यक्तींचा समावेश आहे
****
राज्यातल्या ६० साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची सुमारे
३८७ कोटी रुपयांची देणी थकवली आहेत. आगामी गाळप हंगाम जवळ आला असताना गेल्या हंगामातली
ही रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. सोलापूर जिल्ह्यातल्या नऊ कारखान्यांनी
सुमारे एफआरपी चे ८१ कोटी रुपये थकवले असून, ही संख्या सर्वाधिक आहे. त्याखालोखाल अहिल्यानगर आणि कोल्हापूर
जिल्ह्याचा क्रमांक लागतो, असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
अमेरिकेतल्या नेब्रास्का विद्यापीठ आणि भुवनेश्वर इथल्या
भारतीय तंत्रज्ञान संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी अहिल्यानगर जिल्ह्यात हिवरे बाजार पाणलोट
क्षेत्राला भेट देऊन प्रकल्प कार्यपद्धतीचा अभ्यास केला. भेटीदरम्यान मृद आणि जलसंधारण
अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक तथा विभाग प्रमुख डॉ. सचिन कुमार नांदगुडे यांनी
सध्या सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण पाणलोट क्षेत्रातल्या कार्बन स्थिरीकरण प्रकल्पात
वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार
यांची भेट घेऊन नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन, पाणलोट क्षेत्र विकास आणि ग्रामविकासात हिवरे बाजारच्या क्रांतिकारक
कार्यावर चर्चा झाली.
****
हिंगोली जिल्ह्यात वाशिम - हिंगोली मार्गावर एका मालवाहू
पिकअप वाहनाला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक देउन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
झाला. आज सकाळी हा अपघात झाला. अनिल आणि मोहन ठाकरे अशी मृतांची नावं असून, ते अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरचे रहीवाशी होते.
****
ठाणे जिल्ह्यात भिवंडी बायपासवर ठाणे पोलिसांनी मोठ्या
प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे
पोलिसांनी सापळा रचून तनवीर अहमद आणि महेश हिंदूराव देसाई यांना रंगेहाथ अटक केली.
त्यांच्याकडून सुमारे ३२ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
****
‘माझं लातूर, हरीत लातूर’ मोहीमेअंतर्गत लातूर
शहरातल्या गंजगोलाई परिसरात येत्या रविवारी ‘लातूर हरितोत्सव’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात
येणार आहे. यानिमित्ताने महात्मा गांधी चौक ते गंजगोलाई दरम्यान वृक्ष दिंडी काढण्यात
येणार असून, रोपवाटिकांचे स्टॉल्सही लावण्यात
येणार आहेत.
****
माजी सैनिकांच्या पाल्यांना सैनिक कल्याण विभागाकडून विविध
क्षेत्रातल्या कार्यासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. आयआयटी, आयआयएम, एम्स अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी
केलेल्या क्रीडापटूंना पारितोषकं देण्यात येणार आहे. इच्छुकांनी छत्रपती संभाजीनगर
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन सैनिक कल्याण विभागानं केलं
आहे.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...