Friday, 2 October 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 02 October 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ ऑक्‍टोबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश आज त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करत आहे. यानिमित्त देशभरात आणि परदेशातील भारतीय दूतावासांमार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या राजघाट येथील स्मारकावर सर्वधर्म प्रार्थना सभा घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील 'राजघाट' इथल्या महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. विकसित भारत'च्या ध्येयासाठी बापूंचे विचार सदैव मार्गदर्शक ठरले असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि गृहमंत्री अमित शाह यांनी माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विजय घाटावरील त्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. तसंच संविधान सदन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि सर्वपक्षीय नेत्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली.

****

'विशेष सखोल पुनरीक्षण' कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर, मतदार यादीत समाविष्ट न झालेल्या आणि पहिल्यांदाच पात्र ठरणाऱ्या तरुण मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश निवडणूक आयोगानं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. 'बूथ लेव्हल ऑफिसर्स'नी मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ओळख पटलेल्या मतदारांच्या घरी जाऊन भेटी द्याव्यात आणि संबंधित व्यक्ती पात्र आढळल्यास 'फॉर्म ६' द्वारे त्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यास मदत करावी. तसंच ही प्रक्रिया एका महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत.

****

साठेबाजी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी साखर साठवण्याचा कालावधी १५ दिवसांपर्यंत कमी केला असून, त्याची मर्यादा एक हजार क्विंटल निश्चित केली आहे. हा निर्णय १५ सप्टेंबरपासून लागू झाला असून, नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

****

महाराष्ट्राला जागतिक गुंतवणुकीचं प्रमुख केंद्र बनवण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र हे व्यासपीठ कार्यरत राहाणार असून, गुंतवणूकदारांच्या प्रत्येक गरजांची पूर्तता करण्यासाठी राज्यशासन एकसंघ पद्धतीनं काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल मुख्यंमंत्र्यांच्या हस्ते ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र व्यासपीठाचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ६७ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कौशल्य, मंत्री मंगलप्रभात लोढा, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तिसऱ्या यादीत परभणी जिल्ह्यातील २६ हजार ६३५ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २६४ कोटी ८५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ७९ हजार २१८ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ६७२ कोटी ९१ लाख रूपये जमा झाले आहेत.

****

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव इथं समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. शेगावाहून वर्ध्याकडे जाणाऱ्या पिकअप व्हॅनला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड जिल्हा रुग्णालय परिसरात आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानात रुग्णालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख डॉक्टर सुधीर राऊत यांच्यासह डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.

****

हिंगोली जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन -ग्रामीण टप्पा - २ अंतर्गत काल विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. एक दिन, एक घंटा, एक साथ या देशव्यापी श्रमदान मोहिमेत जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन, धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळ असलेल्या नरसी इथं श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर परिसर आणि कयाधू नदी घाट किनाऱ्यावर विशेष स्वच्छता करण्यात आली.

****

नांदेड जिल्हा परिषदेच्या स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत एक दिवस, एक तास, एक साथ या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात महाविद्यालयीन तरुण, शालेय विद्यार्थी, महिला, महिला बचत गट आणि स्वयंसेवी संस्था तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

****

जपानमध्ये सुरू असलेल्या २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या रिकर्व्ह सांघिक तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. अंतिम सामन्यात, अंकिता भाकत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांच्या भारतीय संघाने दक्षिण कोरियावर ५-३ असा विजय मिळवला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारातील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. 

****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 02 October 2026

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०२ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      यूपीएससीची शतकपूर्ती;निवड प्रक्रिया अद्ययावत करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त

·      दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त इतर १९ तालुक्यांत सर्वेक्षण करण्याचे राज्य सरकारचे निर्देश

·      दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर

·      राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती, सध्याच्या काळात महात्मा गांधींचा संदेश अधिक समर्पक झाल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

आणि

·      आशियाई क्रीडा स्पर्धेत ६६ पदकांसह भारत पदकतालिकेत ८व्या स्थानावर

****

केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपली निवड प्रक्रिया भविष्यातल्या आवश्यकतांनुसार अद्ययावत करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोग - यूपीएससीच्या शताब्दी सोहळ्याला ते संबोधित करत होते. गेल्या शंभर वर्षांच्या प्रवासात या संस्थेवरील लोकांचा विश्वास दृढ राहिल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. फक्त खुर्चीच्या आकर्षणामुळे नव्हे, तर लोकसेवेच्या भावनेने प्रेरित असलेल्या तरुणांना सार्वजनिक सेवेत आणण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ते म्हणाले,

बाईट -  पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

दुर्गम भागातल्या नागरिकांचं रोजगारासाठी होणारं पलायन थांबवण्यासाठी गावातच रोजगार मिळवून देणं आवश्यक असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत संसदीय संकुल विकास परियोजनेच्या कार्यक्रमात बोलत होते. या पलायनामुळे मुख्यत: भावी पिढीच्या शिक्षणावर तसंच आरोग्यावर परिणाम होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. हे थांबवण्यासाठी संसदीय संकुल विकास परियोजना महत्त्वाचा निर्णय असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

राज्यात दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त इतर १९ तालुक्यांत सर्वेक्षण करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत, यामध्ये नांदेड जिल्ह्यातले मुदखेड, मुखेड आणि अर्धापूर, नाशिक तसंच चंद्रपूर जिल्ह्यातले प्रत्येकी तीन तालुके, गोंदिया जिल्ह्यातले चार, भंडारा आणि सांगली जिल्ह्यातले प्रत्येकी दोन तसंच सातारा आणि वर्धा जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यातील प्रमुख पाच पिकांचं २० टक्के सर्वेक्षण तसंच ग्राउंड ट्रथिंग करून अधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे यांनी दिले. धरणातील पाणीसाठा आणि पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात आलेल्या आरक्षणाचा नियमित आढावा घेऊन पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात, अशा सूचना अधिकाऱ्यांनी काल झालेल्या बैठकीत दिल्या.

****

राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आपल्या अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी, या उत्सवांमधून बचत झालेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पदाधिकारी, सार्वजनिक मंडळं आणि नागरिकांना केलं आहे.

****

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक दिलासा देण्यासाठी पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे वितरित करावेत, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुंडे यांनी काल मुंबई इथं फडणवीस यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन दिलं. यावेळी पिण्याचं पाणी, जनावरांचा चारा, जलसंधारणाची कामं तसच शेतकरी आणि शेतमजुरांसाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली.

****

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं सुभेदारी शासकीय विश्रामगृहात दुपारी एक वाजता महसूल मंत्री नागरिकांची निवेदनं स्वीकारणार आहेत. त्यानंतर ते करमाड परिसरात पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून जालना जिल्ह्याकडे रवाना होतील. जालना इथं प्रथम शासकीय विश्रामगृहात नागरिकांची निवेदनं स्वीकारून, सायंकाळी ते भोकरदन तालुक्यात दगडवाडी इथं दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी करतील. या पाहणीनंतर महसूल मंत्री बावनकुळे खामगावमार्गे अकोल्याकडे प्रयाण करणार आहेत.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश आज त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करत आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला गांधीजींनी दिलेली अहिंसात्मक सत्याग्रहाची दिशा तसंच शास्त्रीजींनी पंतप्रधान पदाच्या आपल्या छोट्याशा कार्यकाळात सैन्य दलात तसंच कृषी क्षेत्रात गाजवलेलं कर्तृत्व यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. जगाच्या अनेक भागांमध्ये युद्ध आणि संघर्षाचे वातावरण असताना महात्मा गांधींचा शांतता आणि अहिंसेचा संदेश अधिक समर्पक झाला असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. बँकिंग क्षेत्रातील सुधारणा याच प्रयत्नांचा भाग आहे. ज्येष्ठ पत्रकार अजय कुलकर्णी यांनी या सुधारणांबाबत माहिती दिली.

बाईट – अजय  कुलकर्णी

****

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत हॉकीमध्ये भारताच्या पुरुष संघाने पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानंही अंतिम सामन्यात आपलं स्थान यापूर्वीच निश्चित केलं आहे.

याच स्पर्धेत क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा अंतिम फेरीतला सामना उद्या पाकिस्तानशी होणार आहे.

दरम्यान, भारतानं काल नौकायन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनु फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरिसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्यपदक मिळवलं. हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा यांनी महिलांच्या 'स्किफ' प्रकारात कांस्यपदक जिंकले. तीरंदाजीत पुरुष गटाच्या कपांउंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू याने कांस्यपदक पटकावलं. स्क्वॉशमध्येही महिलांच्या संघाला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. कुस्तीमध्ये ग्रीको रोमन प्रकारात नितेश सिवाच याने रौप्यपदक पटकावलं.

या स्पर्धेत, काल झालेल्या स्क्वॉशमधील उपांत्य फेरीत मलेशियाकडून १-२ अशा फरकाने पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताच्या पुरुष स्क्वॉश संघाने कांस्यपदक जिंकले. किक व्हॉलीबॉल या खेळात पुरुषांच्या क्वाड्रंट प्रकारात भारतानं व्हिएतनामचा २-० असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताचं अजून एक पदक निश्चित झालं आहे. या स्पर्धेत भारताच्या पदकांची एकूण संख्या ६६ झाली असून त्यात १० सुवर्ण, २३ रौप्य आणि ३३ कांस्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत ८व्या स्थानावर आहे.

****

रायगड जिल्ह्यात दिवेआगार इथं काल आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, पुणे जिल्ह्यात आळंदीच्या विनर्स अ‍ॅकडमीच्या विद्यार्थ्यांची सहल पर्यटनासाठी आली होती. यापैकी काही विद्यार्थी पोहण्यासाठी समुद्रात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात ओढले गेले. स्थानिकांच्या मदतीने सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. अकरावी तसंच बारावीचे हे विद्यार्थी १६ ते १७ वर्ष वयोगटातले असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत, या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचं, म्हटलं आहे. तर, दिवेआगर दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात पांगरा शिंदे गावात काल रात्री पावणे दहाच्या सुमारास भूगर्भातून आवाज येत जमीन हादरली. या धक्क्याची अधिकृत नोंद झाली नसल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

****

Thursday, 1 October 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 October 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ ऑक्टोबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      यूपीएससीची शतकपूर्ती;निवड प्रक्रिया अद्ययावत करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त

·      दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी सण-उत्सव साधेपणानं साजरे करावे-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन

·      खामगाव एमआयडीसीतून अडीच लाख किलो सुटं सोयाबीन तेल जप्त

·      स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत नांदेड जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आणि

·      आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताचे महिला आणि पुरुष हॉकी संघ अंतिम फेरीत दाखल-इतरही अनेक क्रीडा प्रकारात पदकनिश्चिती

****

केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपली निवड प्रक्रिया भविष्यातल्या आवश्यकतांनुसार अद्ययावत करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आज नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोग - यूपीएससीच्या शताब्दी सोहळ्याला ते संबोधित करत होते. गेल्या शंभर वर्षांच्या प्रवासात या संस्थेवरील लोकांचा विश्वास दृढ राहिल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. फक्त खुर्चीच्या आकर्षणामुळे नव्हे, तर लोकसेवेच्या भावनेने प्रेरित असलेल्या तरुणांना सार्वजनिक सेवेत आणण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ते म्हणाले –

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

दुर्गम भागातल्या नागरिकांचं रोजगारासाठी होणारं पलायन थांबवण्यासाठी गावातच रोजगार मिळवून देणं आवश्यक असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत संसदीय संकुल विकास परियोजनेच्या कार्यक्रमात बोलत होते. या पलायनामुळे मुख्यत: भावी पिढीच्या शिक्षणावर तसंच आरोग्यावर परिणाम होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. हे थांबवण्यासाठी संसदीय संकुल विकास परियोजना महत्त्वाचा निर्णय असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आपल्या अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी, या उत्सवांमधून बचत झालेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पदाधिकारी, सार्वजनिक मंडळं आणि नागरिकांना केलं आहे.

****

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव इथल्या औद्योगिक वसाहतीत अन्न आणि औषध प्रशासनने कारवाई करत गोदामामध्ये बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेलं २ लाख ५१ हजार किलो सुटं सोयाबीन तेल जप्त केलं. या तेलाची किंमत सुमारे ३ कोटी ५१ लाख रुपये इतकी आहे. ए.एम. ऑईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे अन्न पदार्थाच्या साठवणुकीचा, उत्पादनाचा किंवा घाऊक विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. पीएम सूर्य घर योजना तसंच कुसुम योजना हा याच प्रयत्नांचा भाग आहे. आजच्या भागात या योजनांबाबत जाणून घेऊ –


देशातील स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत घरगुती छतावरील सौरऊर्जा, शेतीतील सौरपंप, मोठे सौर प्रकल्प तसेच देशांतर्गत सौर पॅनेल निर्मितीवर भर दिला आहे. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून भारताची स्थापित सौरऊर्जा क्षमता 31 ऑगस्ट 2026 रोजी 168 पूर्णांक 04 गिगावॅट एवढी झाली आहे. घरगुती वीजग्राहकांना सौरऊर्जेकडे वळवण्यासाठी केंद्र सरकारनं ‘पीएम-सूर्य घर : मोफत वीज योजना’ सुरू केली. तर, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान राबवलं जात आहे.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सौरऊर्जा क्षेत्रातील आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारनं उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना राबवली आहे. तसंच मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा निर्मितीसाठी सोलार पार्क आणि अल्ट्रा मेगा सोलार उर्जा निर्मिती योजनेला प्रोत्साहन दिलं आहे.

****

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत हॉकीमध्ये भारताच्या पुरुष संघाने पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानेही अंतिम सामन्यात आपलं स्थान यापूर्वीच निश्चित केलं आहे.

याच स्पर्धेत क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा अंतिम फेरीतला सामना पाकिस्तानशी होणार आहे.

दरम्यान, भारतानं आज नौकायन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनु फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरिसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्यपदक मिळवलं. तीरंदाजीत पुरुष गटाच्या कपांउंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू याने कांस्यपदक पटकावलं. स्क्वॉशमध्येही महिलांच्या संघाला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. कुस्तीमध्ये ग्रीको रोमन प्रकारात नितेश याने रौप्यपदक पटकावलं.

सेपकटकरॉ या खेळात पुरुषांच्या क्वाड्रंट प्रकारात भारतानं व्हिएतनामचा २-० असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताचं अजून एक पदक निश्चित झालं आहे.

या स्पर्धेत भारताच्या पदकांची एकूण संख्या ६४ वर पोहोचली असून त्यात १० सुवर्ण, २२ रौप्य आणि ३२ कांस्यपदकांचा समावेश आहे. भारत सध्या पदकतालिकेत ८व्या स्थानावर आहे.

****

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज बीड जिल्ह्यातल्या पेंडगाव परिसरातल्या शेतीपिकांची आणि नुकसानीची थेट बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन उपस्थित होते. आयुक्तांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाअभावी पिकांची स्थिती, उत्पादनातील घट आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

बीड शहरातल्या नागरिकांचा मालमत्ता कर तसंच पाणीपट्टी पूर्णपणे माफ करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. करमाफीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवाव अशा मागणी पक्षानं केली आहे.

****

नांदेड शहराचा पाणी पुरवठा तसंच उपलब्ध पाण्याच्या काटेकोर नियोजनाबाबत मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे यांनी आज महापालिकेत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत तातडीची बैठक घेतली. पावसाचं प्रमाण घटल्याने आगामी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी मनपा आणि पाटबंधारे विभागाने संयुक्तपणे काम करून पाणी बचतीचा आणि वितरणाचा योग्य आराखडा तयार करावा, असे निर्देश डोइफोडे यांनी दिले.

****

नोकरी- रोजगाराच्या निमित्ताने आपण गावाबाहेर पडलो तरी खेड्याशी नातं ठेवलं पाहिजे, असं आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यात खांडी पिंपळगाव इथं एक दिवसीय शेतकरी संवाद मेळाव्यात कुलगुरू बोलत होते. उच्चशिक्षित तरुणांनी आपल्या ज्ञानाचा स्थानिकांना लाभ मिळवून दिला पाहिजे, असंही कुलगुरू फुलारी यांनी नमूद केलं.

****

यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी, सक्तवसुली संचालनालय - ईडीने आज जिल्ह्यात ९ ठिकाणी छापे टाकले. फसवणूक आणि ठेवीदारांच्या पैशाचा गैरवापर केल्याच्या तक्रारीवरून, रिझर्व्ह बँकेनं २०२२ मध्ये या बँकेचा परवाना रद्द केल्याचं ईडीनं म्हटलं आहे. बँकेच्या माध्यमातून सुमारे २४२ कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, अधिकारी आणि कर्जदार यांच्यातलं संगनमत उघड झाल्याचा ईडीचा आरोप आहे.

****

नांदेड जिल्हा परिषदेच्या स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत एक दिवस, एक तास, एक साथ या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातल्या गावागावांत व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसच विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमात महाविद्यालयीन तरुण, शालेय विद्यार्थी, महिला, महिला बचत गट, ग्रामपंचायत कर्मचारी आणि अधिकारी, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

****

नांदेड जिल्ह्यात स्वच्छता चळवळीचे दूत म्हणून ओळखले जाणारे माधवराव पाटील शेळगावकर यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. राज्य  शासनाच्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समितीचे ते पहिले अध्यक्ष होते. स्वच्छता चळवळीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शेळगाव गौरी या गावाला दोन राष्ट्रपती पुरस्कार तसंच इतर विविध पुरस्कार मिळवून दिले होते. नायगाव तालुक्यातल्या शेळगाव गौरी इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

हवामान

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात काही भागांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्याही या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 01 October 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

यूपीएससीच्या शंभर वर्षांच्या प्रवासात पिढ्या, सरकारे, तंत्रज्ञान आणि अभ्यासक्रम बदलले आहेत, परंतु या संस्थेवरील लोकांचा विश्वास पूर्वीसारखाच अचल आणि दृढ राहिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज केंद्रीय लोकसेवा आयोग - यूपीएससीच्या शताब्दी सोहळ्याला ते संबोधित करत होते. केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी नव्हे, तर लोकसेवेच्या भावनेने प्रेरित होऊन पुढे येतात, अशा तरुणांना सार्वजनिक सेवेत आणण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. प्रशासकीत सेवेतल्या भरती प्रक्रियेत कालानुरुप सुधारणा केल्या पाहिजे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले –

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

यूपीएससीच्या माध्यमातून होणाऱ्या सरकारी नियुक्त्यांची संख्या वाढली असून, भरती प्रक्रियेतील पारदर्शकताही सुधारली असल्याचं, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या १२ वर्षांच्या काळात यूपीएससीमार्फत सुमारे ६५ हजार नियुक्त्या करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

यावेळी पंतप्रधान मोदींनी यूपीएससीचं शताब्दी स्मृती नाणं, एक विशेष टपाल तिकीट आणि एका पुस्तकाचं प्रकाशन केलं.

****

बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता पाहता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांत सर्व प्रकारच्या चाऱ्याच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. जिल्ह्यात १९ हजार ४९१ मेट्रिक टन चारा शिल्लक असून, हा साठा सुमारे ६० दिवस पुरेल एवढाच आहे. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, अकोला जिल्ह्यातही पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. चाऱ्याअभावी दूध उत्पादनावर परिणाम होण्यासोबतच पशुधन विक्रीची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते. या पार्श्वभूमीवर युवापर्व ग्रामविकास फाउंडेशनने दुष्काळग्रस्त भागातल्या जनावरांसाठी संघटितपणे चारा निर्मिती अभियान हाती घेण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या अभियानांतर्गत विहीर किंवा बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडून दोन एकर क्षेत्रात हिरव्या चाऱ्याची लागवड करून घेण्याचं नियोजन आहे.

****

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव इथल्या औद्योगिक वसाहतीत अन्न आणि औषध प्रशासनने कारवाई करत गोदामामध्ये बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेलं २ लाख ५१ हजार किलो सुटं सोयाबीन तेल जप्त केलं. या तेलाची किंमत सुमारे ३ कोटी ५१ लाख रुपये इतकी आहे. ए.एम. ऑईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे अन्न पदार्थाच्या साठवणुकीचा, उत्पादनाचा किंवा घाऊक विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नौकानयन मध्ये भारताने आज रौप्य पदक जिंकलं. पुरुष गटातल्या 'स्किफ' शर्यतीत मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरिसिंकल नोबल यांनी या प्रकारातलं हे पहिलं पदक पटकावलं. आतापर्यंत झालेल्या नऊ शर्यतींमध्ये फ्रान्सिस आणि नोबल यांनी सातत्यपूर्ण कामगिरीचं प्रदर्शन केलं, त्यांनी एकूण २३ गुण मिळवले आणि एका शर्यतीत विजयही संपादन केला, ज्यामुळे त्यांचं रौप्यपदक निश्चित झालं.

स्क्वॅशमध्ये भारतीय महिला संघाने आज कांस्य पदक जिंकलं. उपान्त्य फेरीत आज भारतीय संघाला हाँगकाँग कडून पराभव पत्करावा लागला. पुरुष हॉकी मध्ये उपान्त्य फेरीत आज भारत - पाकिस्तान सामना होईल.

पुरुष क्रिकेटमध्ये भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा १२४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने २० षटकात सात बाद १६९ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला श्रीलंकेचा संघ दहाव्या षटकात ४५ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून इशान किशनने नाबाद ८० धावा केल्या. 

कुस्तीमध्ये ग्रीको रोमन प्रकारात नितेशने मंगोलियाच्या खेळाडुचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. महिला कुस्तीमध्ये ६२ किलो वजनी गटात मानसी अहलावत आज कांस्य पदकासाठी खेळणार आहे.  

या स्पर्धेत भारत सध्या ६३ पदकांसह आठव्या स्थानावर आहे. यामध्ये दहा सुवर्ण, २२ रौप्य आणि ३१ कांस्य पदकांचा समावेश आहे.

****

यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या हंगामात देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या ८७ टक्के तर राज्यात सरासरीच्या ८१ टक्के पाऊस पडल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने काल दिली. नाशिक आणि पालघर हे दोन जिल्हे वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 October 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑक्‍टोबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नौकानयन मध्ये भारताने आज रौप्य पदक जिंकलं. पुरुष गटातल्या 'स्किफ' शर्यतीत मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरिसिंकल नोबल यांनी या प्रकारातलं हे पहिलं पदक पटकावलं. आतापर्यंत झालेल्या नऊ शर्यतींमध्ये फ्रान्सिस आणि नोबल यांनी सातत्यपूर्ण कामगिरीचं प्रदर्शन केलं, त्यांनी एकूण २३ गुण मिळवले आणि एका शर्यतीत विजयही संपादन केला, ज्यामुळे त्यांचं रौप्यपदक निश्चित झालं. स्क्वॅशमध्ये भारतीय महिला संघाने आज कांस्य पदक जिंकलं. पुरुष हॉकी मध्ये उपान्त्य फेरीत आज भारत - पाकिस्तान सामना होईल.

या स्पर्धेत भारत सध्या ६२ पदकांसह आठव्या स्थानावर आहे. यामध्ये दहा सुवर्ण, २२ रौप्य आणि ३० कांस्य पदकांचा समावेश आहे.

****

केंद्रीय लोकसेवा आयोग - यूपीएससीच्या शताब्दी सोहळ्याचा समारोप आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. १९२६ मध्ये यूपीएससीची स्थापना झाली. स्थापनेला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गेल्या वर्षी एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या वर्षभराच्या शताब्दी उत्सवाचा समारोप या कार्यक्रमाद्वारे होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यूपीएससीच्या शताब्दीनिमित्त विशेष स्मारक नाणं, टपाल तिकीट आणि पुस्तकाचं प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला देशभरातल्या राज्य लोकसेवा आयोगांचे अध्यक्ष आणि सदस्य, केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, यूपीएससीचे अधिकारी आणि अन्य हितसंबंधी उपस्थित राहणार आहेत.  

****

दुबईहून इस्रायलमधल्या तेल अवीव इथं जाणाऱ्या फ्लाय दुबईचं विमानातल्या सहवैमानिकाने कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला करत दोन मिनिटांपेक्षा कमी वेळेत विमान १७ हजार फूट खाली नेण्यास भाग पाडलं. मात्र प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांनी कॉकपिटमध्ये प्रवेश करत हल्लेखोराला ताब्यात घेऊन विमान स्थिरावण्यास मदत केली. या घटनेत भारतीय नागरिक असलेले कॅप्टन स्मित मच्छार जखमी झाले असून, त्यांनी शौर्याने प्रतिकार केल्यानं मोठी दुर्घटना टळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मित मच्छार यांच्या धैर्य आणि दृढनिश्चयाचं कौतुक केलं.

****

बँकर्स बुक्स एव्हिडन्स कायदा, २०२६ आजपासून लागू झाला. १३ ऑगस्ट रोजी या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली होती. या कायद्याने १८९१ च्या बँकर्स बुक्स एव्हिडन्स कायद्याची जागा घेतली आहे. आधुनिक बँकिंग पद्धतींशी सुसंगत अशी बँकिंग नोंदी पुरावा म्हणून वापरण्यासाठी आधुनिक कायदेशीर चौकट या नव्या कायद्याद्वारे उपलब्ध होणार आहे.

****

राज्य शासनाच्या भर्ती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत मूलभूत बदलांची गरज आहे, असं राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि उच्चस्तरीय कृती दलाच्या प्रमुख व्ही. राधा यांनी म्हटलं आहे. या कृती दलानं काल नाशिक विभागातले विद्यार्थी, उमेदवार आणि पालकांशी थेट संवाद साधला, त्यानंतर त्या बोलत होत्या. राज्यातल्या पाचही महसूल विभागांमध्ये परीक्षा पद्धतीतल्या सुधारणांच्या अनुषंगानं समितीनं आतापर्यंत सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला, तर सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी ई-मेल तसंच निवेदनाद्वारे आपल्या शंका, प्रश्न आणि सूचना मांडल्या असल्याचं व्ही. राधा यांनी सांगितलं.

****

किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या धान आणि भरडधान्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना वेळेत मिळावी, यासाठी प्रलंबित देयकं तातडीने अदा करण्याचे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणांना दिले. पणन हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात एमएसपी अंतर्गत धानासह ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरडधान्यांची खरेदी करण्यात आली असून, शेतकऱ्यांना देण्यात आलेली रक्कम तसेच द्यावयाच्या प्रलंबित रकमेची विभागनिहाय माहितीही संकलित करण्यात आली आहे.

****

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी बीड जिल्ह्यात २५ विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल या कक्षांसह इतर यंत्रणेचा आढावा घेतला.

दरम्यान, या निवडणुकीसाठी काल २७ इच्छुकांनी एकूण ४५ नमुना नामनिर्देशन पत्रं घेतली. मात्र एकाही उमेदवाराकडून अर्ज दाखल करण्यात आला नाही.

****

छत्रपती संभाजीनगर इथं काल सुमारे ५५ लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर करमाड परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी मुद्देमालासह दोन जणांना ताब्यात घेतलं.

****

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...