Monday, 18 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 18 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर इथल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयकडून अटक

·      राज्य विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर

·      जलसंवर्धनासाठी लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त

·      पालघर जिल्ह्यात वऱ्हाडाच्या ट्रकचा अपघात;सुमारे १जणांचा मृत्यू

आणि

·      अकोल्यात उष्माघाताचा दुसरा बळी;विदर्भासह मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा

****

नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने आज अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती. त्यामुळे आज ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांमध्ये मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असून, त्यांनी २३ एप्रिल रोजी संबंधित आरोपींकडून ही प्रश्नपत्रिका मिळवली असल्याचं, सीबीआयने म्हटलं आहे.

दरम्यान, मोटेगावकरला सीबीआयने अटक केल्यानंतर RCC क्लाससमोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी कार्यकत्यांनी घोषणाबाजी करत क्लासच्या बाहेरील फलकावर शाईफेक केली. या पार्श्वभूमीवर आज क्लासला सुट्टी जाहीर करण्यात आली, तसंच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

****

केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य विधान परिषदेच्या १६ जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे.

 

यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्याने त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या २५ तारखेला जारी होईल. एक जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, तर चार जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. यासाठी १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जूनला मतमोजणी होईल. संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे.

****

शिर्डी इथं सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं, येत्या २३ मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून, प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची असेल. खासगी क्षेत्रातील तोफगोळा उत्पादनाची ही देशातील सर्वांत मोठी क्षमता मानली जात आहे. यासाठीचा संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान तसंच कच्चा माल स्वदेशी असणार आहे. अवघ्या एका वर्षात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातल्या सहा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी ७२ लाख रूपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. वेरूळ इथल्या श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखड्यासाठी २१० कोटी रुपये तर बीड इथल्या श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी ३०१ कोटी ५४ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकासाठी १७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या प्रकल्पाचं काम मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

****

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या प्रवास दरात तत्काळ भाडेवाढ करणार नसल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरवाढ टाळण्यासाठी इंधन बचत, ई-बसचा वाढता वापर, खर्च नियंत्रण तसेच महसूलवाढीच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.

****

जलसंवर्धनासाठी लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपुरात पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त जलक्रांती परिषदेत बोलत होते. नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं सांगत, ‘वेस्ट टू वेल्थ आणि नॉलेज टू वेल्थ या संकल्पनांवर गडकरी यांनी भर दिला. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

****

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकची कंटेनरसोबत धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सुमारे १जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. पालघर जिल्ह्यात धानीवरी इथं ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त ट्रक मध्ये शंभरपेक्षा जास्त वऱ्हाडी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातातल्या जखमींची संख्या पाहता, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

****

नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन करण्यात आलं. कांद्याला २४०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळावा, तसंच बाजार समित्यंमधूनच कांदा खरेदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर इथं समृद्धी महामार्ग जवळील जांबरगाव इथं कांदा उत्पादकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज सकाळी आंदोलन करण्यात आलं. आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होतं, पोलिसांनी दानवे यांना ताब्यात घेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर सोडून दिलं.

****

हिंगोली इथं आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांची प्रशिक्षण कार्यशाळा माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत पार पडली. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला अंत्योदय आणि एकात्म मानववाद हाच आमच्या कार्याचा मुख्य गाभा असल्याचं कराड यावेळी म्हणाले. केंद्र सरकारच्या सर्व योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन कराड यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं.

****

नांदेड इथं आज स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. नीट युजी पेपरफुटी आणि शिक्षण क्षेत्रातील वाढत्या भ्रष्टाचार प्रकरणी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण माफियांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विविध मागण्याचं निवेदन संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.

****

बीड शहर परिसरातील इमामपूररोड इथल्या रस्ता रूंदीकरणाच्या मागणीसाठी आज सकाळी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. हा रस्ता ६०० मीटर पर्यंत वाढवण्यासंदर्भात वारंवार पत्र व्यवहार करूनही काम न झाल्यामुळे महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस सुभाष राऊत, यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

****

वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागाने ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व वाहनधारकांनी मुदतीत आपल्या वाहनाची नंबरप्लेट बदलून घेण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेतर्फे परवा २० मे रोजी देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं खबरदारी घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त ब. दा. मरेवाड यांनी केलं आहे. नियमित औषधोपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांनी गैरसोय टाळण्यासाठी आपली आवश्यक औषधे आधीच खरेदी करून ठेवण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

****

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने विशेष एकमार्गी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या सुमारे दीड पट भाडेदराने चालवण्यात येणार आहेत. यामध्ये उद्या मंगळवारी तिरुपती नांदेड विशेष रेल्वे, बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस नांदेड, गुरुवारी नांदेड तिरुपती ही रेल्वे चालवली जाणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली.

****

आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. चेन्नई इथं चिदंबरम स्टेडिअमवर संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरूवात होईल.

****

अकोला जिल्ह्यात पिंपरखेड इथल्या ५० वर्षीय व्यक्तीचा आज उष्माघातामुळे मृत्यू झाला, तालुक्यात उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे.

दरम्यान, विदर्भ तसंच मराठवाड्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात आज अकोला इथं सर्वाधिक ४६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४५ पूर्णांक दोन, छत्रपती संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक चार, तर धाराशिव इथं सुमारे ४२ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

येत्या दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****


No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 مئی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 30 May 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ت...