Sunday, 31 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 31 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मे २०२ सकाळी.०० वाजता

****

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती आज देशभरात साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. अहिल्यादेवींनी देशभरातील पवित्र मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांच्या पुनर्बांधणीपासून ते सर्वांसाठी न्याय आणि कल्याण सुनिश्चित करण्यापर्यंत अतुलनीय योगदान दिले. त्यांनी भारताची सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ केली आणि समाज, संस्कृती आणि राष्ट्र उभारणीसाठी असलेले त्यांचे समर्पण प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील, अशा शब्दात पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील संदेशात आपल्या भावना व्यक्त केल्या.

****

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात चोंडी इथं अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत.

****

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन झालं. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिंदे यांच्या हस्ते धनगररत्न पुरस्कार प्रदान देऊन गौरवण्यात आलं.

****

राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्या वतीनं आज मुंबई इथं लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात येत आहे. तसंच शोभायात्रा, धनगरी डफ आणि वाघ्या-मुरळी स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधतील. हा या मालिकेचा १३४ वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, एआयआर न्यूज हे संकेतस्थळ आणि न्यूजऑनएअर मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल.

****

आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे. तंबाखूचा वापर पूर्णपणे बंद करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं या उपक्रमाची सुरूवात केली आहे. "आकर्षणाला चालना - निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात." ही या वर्षीची संकल्पना आहे. या निमित्त, केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी नवी दिल्ली इथं 'तंबाखू-मुक्त शैक्षणिक संस्था' ॲपचे उद्घाटन केले. देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू-मुक्त मानकांची अंमलबजावणी आणि देखरेख अधिक मजबूत करणे, हे या ॲपचे उद्दिष्ट आहे.

यानिमित्त पद्मश्री सन्मानित वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पुरी समुद्रकिनाऱ्यावर २५ फूट उंचीचे वाळूशिल्प साकारत तंबाखू आणि निकोटीन व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली.

****

जून महिन्याच्या २५ तारखेपासून राज्यभरात नशामुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार असून, सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन, मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे.

****

सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवल्या येणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी मध्ये प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ झाली असून सीएनजीचा दर आता ८६ प्रति किलो इतका झाला आहे. पीएनजीच्या दरात प्रती युनिट ५० पैशांनी वाढ झाल्यानं, त्याचा प्रति युनिट दर ५२ रुपयांवर पोचला आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर सायंकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

येत्या चार ते पाच दिवसांत केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात नैऋत्य मोसमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

दरम्यान आज सकाळी अकोला जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. बुलडाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.  यामुळे खामगाव, शेगाव आणि संग्रामपूर परिसरातल्या पपई, केळी यासारख्या बागायती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४५ पूर्णांक सात दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४१ पूर्णांक नऊ दशांश सेल्सियस, बीड ४१ पूर्णांक पाच, छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक नऊ, तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 31 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...