Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 17 May 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ मे २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
नीट पेपरफुटीप्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक
·
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा ३० मे पासून पुन्हा
बेमुदत उपोषणाचा इशारा
·
गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, आठ नक्षलवाद्यांना
अटक, पाच जणांचं आत्मसमर्पण
·
थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक-चिराग जोडी अंतिम
फेरीत दाखल
आणि
·
अंदमानमध्ये नैऋत्य मौसमी पाऊस दाखल, राज्यात १०
जूनपर्यंत येण्याचा अंदाज
****
नीट पेपरफुटी
प्रकरणी पुणे इथल्या वनस्पती शास्त्राच्या प्राध्यापक मनिषा मांढरे यांना सीबीआयनं
काल सखोल चौकशीनंतर अटक केली. नीट २०२६ च्या वनस्पती शास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका
तयार करण्यात त्यांचा सहभाग होता. मांढरे यांनीच जीवशास्त्र विषयाचा पेपर लिक केल्याचं
सीबीआयनं म्हटलं आहे. या पेपरफुटी संदर्भात पूर्वीच अटक केलेल्या मनिषा वाघमारे यांच्याबरोबर
मांढरे यांनी संपर्क साधत स्वत:च्या निवासस्थानी एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांची विशेष
शिकवणी घेत परीक्षेतले प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे.
याप्रकरणी
अटक केलेले लातूरचे निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्यासह मांढरे यांना
न्यायालयाने दहा दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
**
दरम्यान, काही व्यक्तींच्या
कथित कृत्यामुळे संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये,
असं मत, लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. एस. एस. बेल्लाळे यांनी म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी याच महाविद्यालयातले
निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयकडून अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर,
बेल्लाळे आकाशवाणीशी बोलत होते. लातूर हे शिक्षण क्षेत्रातलं विश्वासार्ह
केंद्र असून, या प्रकरणामुळे लातूरच्या शैक्षणिक वातावरणावर कोणताही
नकारात्मक परिणाम होणार नसल्याचा विश्वासही बेल्लाळे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले…
बाईट
– प्राचार्य डॉ.एस.एस. बेल्लाळे
****
मराठा समाजाची
शासनाकडून दिशाभूल आणि फसवणूक होत असल्याचा आरोप करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज
जरांगे यांनी येत्या ३० मे पासून जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं पुन्हा उपोषण
आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी इथं काल मराठा समाजाची महत्त्वपूर्ण
बैठक पार पडली. यावेळी बोलताना जरांगे यांनी शासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. २९
मेपर्यंत कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं, सातारा, कोल्हापूर,
हैदराबाद आणि इतर संस्थानांच्या गॅझेटचा अध्यादेश लागू करावा,
आंदोलनातले सर्व गुन्हे मागे घ्यावेत तसंच आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या
कुटुंबीयांना महावितरण आणि औद्योगिक क्षेत्रात नोकरी देण्याबाबत अध्यादेश काढावा,
अशा मागण्या जरांगे यांनी केल्या.
खुल्या
प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य
सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी २८ मे रोजी
आंतरवली सराटीमध्ये जमावं, असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे.
****
राज्यातल्या
शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी
‘POSH’ अर्थात ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध,
मनाई आणि निवारण अधिनियम, २०१३’ या कायद्याची प्रभावी
अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बाल विकास विभागानं दिले आहेत. यासंदर्भात विभागानं
परिपत्रक जारी केलं असून, विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी
अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार दिले आहेत. राज्यातल्या ज्या आस्थापनांमध्ये दहा किंवा
त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्या सर्व ठिकाणी,
‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ स्थापन करणं बंधनकारक आहे. या समितीमध्ये
किमान ५० टक्के महिला सदस्य असणं, वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष
म्हणून नियुक्त करणं तसंच बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असणं आवश्यक
राहणार आहे.
****
जनगणना
२०२७ अंतर्गत गृहयादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा कालपासून सुरू झाला. या टप्प्यांतर्गत, १६ मे ते
१४ जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी
भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या ३३ प्रश्नांची माहिती मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे
संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांच्या एसई आयडीद्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करणार
आहेत.
नांदेड
जिल्ह्यात गृहभेटी देणारे प्रगणक आणि पर्यवेक्षकांना नागरिकांनी आवश्यक सहकार्य करावं, असं आवाहन
जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे.
****
सी बी एस
ई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने येत्या १ जुलैपासून नववीच्या अभ्यासक्रमात
तीन भाषा अनिवार्य केल्या आहेत. या तीन भाषांपैकी किमान दोन भाषा या मूळ भारतीय भाषा
असणं आवश्यक आहे. तसंच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा
घेतली जाणार नाही, सर्व मूल्यमापन पूर्णपणे शाळा-आधारित आणि अंतर्गत स्वरूपाचे असेल,
असं मंडळाने सांगितलं आहे.
****
गडचिरोली
जिल्हा आता पूर्णत: नक्षलमुक्त झाला आहे. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक एम.रमेश यांनी ही
माहिती दिली. पोलिसांनी राबवलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' दरम्यान आठ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून, पाच
नक्षलवाद्यांनी काल पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. या सर्वांवर एकूण ६४ लाख रुपये बक्षीस
होतं. शिवाय त्यांच्याकडून ६५ लाख ३४ हजार रुपये एवढी रोख रक्कम आणि एके-४७,
एसएलआर तसंच अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या. यापुढेही इतर राज्यातून
नक्षलवादी, गडचिरोली जिल्ह्यात येऊ नये, यासाठी पोलिस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील, असंही रमेश
यांनी स्पष्ट केलं.
****
राज्यातल्या
प्रत्येक महाविद्यालयाला आपलं प्रवेश शुल्क, ट्यूशन फी आणि विकास शुल्काची संपूर्ण
माहिती, महाविद्यालयातल्या सूचना फलकावर तसंच माहिती पुस्तिकेत
जाहीर करणं बंधनकारक आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या महाविद्यालयांवर थेट कारवाई
करण्याचा इशारा उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे यांनी दिला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पदवी प्रवेशांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सर्व शासकीय
तसंच खासगी महाविद्यालयांना त्यांनी कडक आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांची आर्थिक लूट
थांबवणं आणि प्रवेशापूर्वीच शुल्काची स्पष्ट कल्पना देणं, हा
या निर्णयाचा उद्देश आहे.
****
राज्यातल्या
ऐतिहासिक बारवांचं जतन आणि संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावं, यासाठी कृती
कार्यक्रम तयार करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष
शेलार यांनी दिले. शासनाने स्थापन केलेल्या बारव संवर्धन समितीच्या बैठकीत ते काल बोलत
होते. समिती सदस्यांनी यावेळी विविध सूचना मांडल्या. बारव परिसरातली अतिक्रमणं हटवण्यासाठी
जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवण्याचं नियोजन करावं, तसंच बारव संवर्धनासाठी कार्यपद्धती निश्चित करणारं परिपत्रक जारी करण्याच्या
सूचना शेलार यांनी दिल्या.
****
परभणी जिल्ह्यातल्या
टाकळी कुंभकर्ण इथं काल, नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध
करून देण्याच्या उद्देशाने महसूल मंडळाच्या वतीनं “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व
समाधान शिबीर” घेण्यात आलं. या शिबीरात पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने
उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. या समाधान शिबिरात विविध १६ विभागांचे स्वतंत्र
स्टॉल उभारण्यात आले होते.
****
बीड जिल्ह्याच्या
धारुर तालुक्यात हिंगणी गावा नजिकच्या सरस्वती तलावात काल दुपारी उभी होडी उलटल्यानं
दोन लहान मुलिंचा बुडून मृत्यू झाला. मासेमारी व्यवसाय करत असलेल्या एका कुटुंबातली
एक महिला आणि सहा मुली या तलावाकडे गेल्या होत्या. मुली पाण्यात खेळत असतांना तीन मुली
तलावात उभा असलेल्या मासेमारीच्या होडीवर बसल्यानंतर ही दुर्घटना घडली.
****
बीड शहरात
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताकरता निवारा बांधकामासाठी ५० लाख रुपये निधी उपमुख्यमंत्री
तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. गेवराईचे
आमदार विजयसिंह पंडित यांनी गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्र्यांकडे याबाबतची मागणी केली
होती. नगर पालिकेच्या माध्यमातून राजीव गांधी चौकानजिक पालिकेच्या मालकीच्या जागेत
हे निवारा बांधकाम होणार आहे.
****
थायलंड
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने
पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपान्त्य सामन्यात त्यांनी मलेशियाच्या
जोडीला त्यांनी १९-२१, २२-२०,२१-१६ अशा गुणफरकाने हरवलं. अंतिम
फेरीत सात्विक चिराग जोडीचा इंडोनेशियाच्या जोडीसोबत सामना होणार आहे.
****
इंडियन
प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु
यांच्यातला सामना दुपारी साडेतीन वाजता धरमशाला इथं होईल. तर, दुसरा सामना
दिल्ली कॅपिटल आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सायंकाळी साडेसातला दिल्ल्ली इथं खेळला
जाणार आहे.
****
वाढत्या
तापमानामुळे नांदेड इथं काल सकाळी एका इलेक्ट्रिक स्कुटीला अचानक आग लागली. सुदैवाने
या घटनेत कोणीही जखमी झालं नाही.
दरम्यान, राज्यात काल
अमरावती इथं सर्वाधिक ४५ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात
छत्रपती संभाजीनगर इथं ४० पूर्णांक आठ, परभणी ४२ पूर्णांक सात,
बीड ४१ पूर्णांक पाच तर धाराशिव इथं ४१ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं
गेलं.
**
नैऋत्य
मौसमी पाऊस काल अंदमानमध्ये दाखल झाला. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची
नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. मोसमी पाऊस यावर्षी एक जूनपर्यंत तामिळनाडूत
तर १० जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, येत्या चोवीस
तासात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment