Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 May
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मे २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
राज्यात इंधनाच्या मागणीत
मोठी वाढ; साठेबाजांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
·
पाच मोठ्या प्रकल्पांना
विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय, मराठवाड्यात मिळणार
औद्योगिक विकासाला चालना
·
मानव वन्यजीव संघर्ष
टाळण्यासाठी राज्य वन्य जीव मंडळाकडून विविध उपाययोजना
·
देवस्थान इनाम निर्मूलन
मसुदा कायदा मागे घेण्याची विविध संघटनांची मागणी
आणि
·
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ अंतिम फेरीत, आज हैदराबाद-राजस्थान
संघामध्ये लढत
****
राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी सरासरीपेक्षा लक्षणीय
वाढली असून,
साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकार कडक पावलं उचलत असल्याची
माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत
होते. साठेबाजी रोखण्यासाठी पुरवठा विभाग आणि गृहविभाग संयुक्तपणे कारवाई करणार
असल्याचं त्यांनी सांगितलं. पेट्रोलची मागणी सरासरीपेक्षा २३ टक्के आणि डिझेलची
मागणी ५२ टक्क्यांनी वाढली आहे, त्यामुळे काही ठिकाणी टंचाईसदृश
परिस्थिती निर्माण झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये खप जास्त असून व्यावसायिक
वापरातील पेट्रोल-डिझेलचा खप कमी होताना दिसत आहे. त्यामुळे हे इंधन व्यावसायिक
वापराकडे वळवलं जात आहे का,
याची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना डिझेल वेळेवर मिळावं यासाठी सरकार
प्रयत्नशील असून साठेबाजी किंवा गैरफायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असंही
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले,
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ
नेते मधु दंडवते यांचं नाव देण्यात येणार आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत
हा निर्णय घेण्यात आला.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधल्या सर्वसाधारण बदल्यांना
मुदतवाढ देण्याला,
तसंच महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं नियमन
आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये
सुधारणा करण्यालाही काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे ८९ हजार ७३१ कोटी
रुपयांच्या पाच विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय
घेतला आहे. उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय
घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे वीस हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष
रोजगारनिर्मिती होणार असून विदर्भ तसंच मराठवाड्यासह राज्यातल्या विविध भागांमध्ये
औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या सर्व
प्रकल्पांमुळे राज्यात उच्च तंत्रज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राचा विस्तार होण्यास
मदत होणार आहे.
****
मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्य वन्य जीव मंडळाच्या
स्थायी समितीने विविध निर्णय घेतले. काल या संदर्भातल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष
तथा वन मंत्री गणेश नाईक यांनी या निर्णयांना मंजुरी दिली. या अंतर्गत राज्यात
पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं, राज्यातल्या एक हजार
गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्लट यंत्रणा उभारणं, तसंच
दोन रेस्क्यू सेंटर आणि दहा उपचार केंद्रं उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा
प्रकल्प सुमारे २६० कोटी रुपयांचा असून, मानवांवरील वन्यजीवांचे
हल्ले रोखण्यासाठी तातडीने या उपाययोजना राबवण्याचे निर्देश मंत्री नाईक यांनी
यावेळी दिले.
****
गावं आणि महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या
सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर 'नेपियर
ग्रास' आणि बांबूची लागवड करण्यात येणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, काल
यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. या जमिनी महिला बचत गट, महिला
आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना तीन वर्षांच्या
भाडेपट्ट्यावर दिल्या जाणार आहेत.
****
नाशिक मधल्या कांद्याला एक हजार ५८० रुपये प्रति क्विंटल
हमीभाव कालपासून लागू झाला. केंद्र सरकारने याबाबत परिपत्रक जारी केलं. कांद्याचे
दर कोसळल्याने नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे
हा निर्णय घेण्यात आला.
****
राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक
संघटनांनी,
प्रस्तावित 'महाराष्ट्र देवस्थान इनाम
निर्मूलन मसुदा कायदा २०२६'
ला तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा
कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे.
मंदिरांच्या जमिनींना लक्ष्य करण्याऐवजी सरकारनं या मंदिरांच्या मूलभूत समस्यांचं
निराकरण करावं,
अशी मागणी या संघटनांनी केली आहे.
****
बीड शहरातही या प्रस्तावित कायद्याविरोधात सकल वारकरी समाज
आणि मंदिर संरक्षण समितीच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. यावेळी बीडच्या
जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
****
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी ३३
उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून, एक अर्ज दाखल झाला आहे. काल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कळंब नगरपालिकेचे गटनेते माजी नगराध्यक्ष
संजय मुंदडा यांनी अर्ज दाखल केला.
परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघात काल चार
इच्छुकांनी एकूण १० उमेदवारी अर्ज घेतले. मात्र, एकाही उमेदवाराने
अर्ज दाखल केला नाही.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेत येऊन बारा
वर्षं पूर्ण झाली. सरकारच्या या कार्यकाळात डिजिटल इंडिया मोहिम यशस्वी झाल्याचं
मत मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशनचे छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष तथा
ज्येष्ठ उद्योजक अर्जुन गायकवाड यांची व्यक्त केलं. ते म्हणाले,
बाईट – ज्येष्ठ उद्योजक अर्जुन गायकवाड
****
नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचणं हे
अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी असल्याची भावना आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त
केली. लातूरमध्ये काल आयोजित व्यापक चिंतन बैठकीपूर्वी ते वार्ताहरांशी बोलत होते.
एका घटनेमुळे लातूर पॅटर्नची प्रतिमा मलिन होऊ देणार नाही, असं
ते म्हणाले. परीक्षा व्यवस्थेमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी विरोधी
पक्ष म्हणून आम्ही सरकारसोबत असल्याचही देशमुख यांनी स्पष्ट केलं.
****
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या
पथकाने आता लातूर मधले विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या
तपासाकडे लक्ष केंद्रित केलं आहे. त्या व्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही
चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे.
****
नांदेडचं नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि पुण्याचं भांडारकर
प्राच्यविद्या संशोधन केंद्र यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार झाला आहे. यानुसार, भांडारकर
संशोधन केंद्राच्या ‘भारत विद्या’ या विविध ऑनलाईन अभ्यासक्रमांच्या मंचासाठी
मराठवाडा-विदर्भ विभागात समन्वय भागीदार म्हणून कुरुंदकर प्रतिष्ठान कार्य करणार
आहे. प्राचीन भारतातल्या विविध ज्ञानशाखांचा आणि कलांचा परिचय करून देणारे हे
अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आले आहेत.
****
जागतिक जैवविविधता दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्याच्या
कळमनुरी तालुक्यात उगम ग्राम विकास संस्थेत शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली.
उगमचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. कयाधू
नदी काठावरच्या जैवसंपदेचं संवर्धन गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी
पडू नये आणि खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये, असं
आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. खतं उपलब्ध होण्यास अडथळा निर्माण
झाल्यास, वाजवीपेक्षा जास्त दरात खत विक्री होत असल्यास, तात्काळ कृषी
विभागाशी संपर्क साधावा,
असं आवाहनही कृषी विभागानं केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात उमरगा नगरपालिकेचे माजी उप नगराध्यक्ष
उमाकांत कुलकर्णी यांचं काल मेंदू विकाराने निधन झालं, ते
६८ वर्षांचे होते. कुलकर्णी दोन वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले
होते.
****
इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल
चॅलेंजर्स बंगळुरु संघाने अंतिम फेरी गाठली आहे. काल झालेल्या पहिल्या प्लेऑफ
सामन्यात बंगळुरुच्या संघाने गुजरात टायटन्सचा ९२ धावांनी पराभव केला. प्लेऑफचा
दुसरा सामना आज सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल एका शाळकरी मुलाचा अंगावर वीज कोसळून
मृत्यू झाला. कळमनुरी तालुक्यातल्या पिंपरी-शिवारात हा मुलगा शेळ्या राखत असतांना
वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत शेळ्या राखत असलेली एक
महिला गंभीररित्या भाजली. तिला उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलं आहे.
****
राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४७
पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४३ अंश
सेल्सियस, छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक दोन, तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक
आठ दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे दोन दिवस उष्णतेचा
रेड अलर्ट तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला
आहे.
****
No comments:
Post a Comment