Saturday, 23 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 23 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ मे २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त ५१ हजार युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. हा १९ वा रोजगार मेळा देशभरातल्या ४७ ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. याआधीच्या १८ रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत सुमारे १२ लाख युवकांना विविध सरकारी विभागांत नियुक्त करण्यात आलं आहे.

****

आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेत येत्या ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा १३४ वा भाग आहे.

****

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर ९१ पैसे दरवाढ झाली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे इंधनाचे दर वाढल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या दहा दिवसातली पेट्रोल- डिझेलमधील ही तिसरी दरवाढ आहे.

****

भारतीय सैन्यदलातील अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना २०२५ चा संयुक्त राष्ट्र सैन्य लैंगिक समानता पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय सैन्य अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनान इथं तैनात आहेत. त्या भारतीय सैन्य दलातल्या पहिल्या फायटर हेलिकॉप्टर पायलट आहेत.

****

अमेरिकेने ग्रीन कार्डसंबंधीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठीचे अर्ज करण्यासाठी इच्छुकांना मायदेशी परतावं लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया त्यांना आपल्या देशातूनच पूर्ण करावी लागेल. या निर्णयामुळे अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर राहणारे विद्यार्थी, नोकरदार तसंच नोकरदारांच्या जोडीदारांवर याचा परिणाम होणार आहे.

****

सामाजिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिले जाणारे ‘पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कार’ तसंच विविध मानाचे पुरस्कार काल मुंबईत प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात अभिनेते बोमन इराणी आणि गायक हर्षद गोळेकर आणि दुहिता गोळेकर, शहजाद अली यांना ‘पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कार’, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना आयटीएसएफचा जीवन गौरव पुरस्कार यांना तर 'ज्वेल ऑफ इंडिया अवॉर्ड' क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांना प्रदान करण्यात आला. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आणि मुंबई पोलीस दलातील उप आयुक्त बजरंग बनसोडे यांना ‘रणझुंजार पुरस्काराने गौरवण्यात आलं तर महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना 'सेवा रत्न पुरस्कार’ देण्यात आला.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्याची मुदत २४ मे पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत २३ मे पर्यंत होती. सीबीएसईच्या संकेतस्थळावर गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला.

विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यानंतर निदर्शनाला आलेल्या त्रुटींची पडताळणी अथवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मिळेल.

****

मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या २६ तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरिटाइम बोर्डाने दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातील जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पोर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल.

****

लातूर औद्योगिक वसाहतीमध्ये उत्पादन व्यवसायाव्यतिरिक्त सुरू असलेले विविध व्यावसायिक उपक्रम तात्काळ बंद करण्याचे निर्देश जिल्हा उद्योग केंद्राने दिले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काल जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर लातूर इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला पत्र पाठवून औद्योगिक क्षेत्रात उत्पादनाव्यतिरिक्त सुरू असलेल्या व्यवसायांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. या कारवाईमध्ये कोचिंग क्लासेस, शिवणकाम वर्ग, हॉस्टेल, खानावळ, वसतिगृह, अभ्यासिका तसंच इतर छोट्या मोठ्या व्यावसायिक उपक्रमांचा समावेश असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

****

जिनेव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. युकीन आपला न्यूझीलंडचा जोडीदार मायकेल व्हीनस याच्या साथीने काल उपांत्य फेरीत चेक रिपब्लिकच्या जोडीचा ७-५, ६-३ असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...