Monday, 18 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 18 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ मे २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान, काल स्वीडन भेटीसाठी गोथेनबर्ग इथं पोहोचले. मोदी यांनी स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी चर्चा केली. व्यापार, गुंतवणूक, नवोन्मेष, हरित परिवर्तन, उदयोन्मुख तंत्रज्ञान, संरक्षण, अंतराळ, संशोधन, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील देवाणघेवाण या क्षेत्रांमध्ये वाढत असलेल्या सहकार्याचं दोन्ही नेत्यांनी स्वागत केलं. भारत-स्वीडन भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य अधिक बळकट करण्याची वचनबद्धता व्यक्त केली. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेलं योगदान तसंच त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार, डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा ३१ वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी गोलमेज परिषदेला संबोधित केलं. भारत आणि युरोपमधील वाढत्या धोरणात्मक सहकार्यावर त्यांनी भर दिला.

दरम्यान, पंतप्रधान आज स्वीडनचा दौरा आटोपून नॉर्वेला रवाना होणार आहेत. या दौऱ्यात ते तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून, अनेक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.

****

काँग्रेसचे वरिष्ठ नेते व्ही. डी. सतीशन आज केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. शपथविधीपूर्वी सतीशन यांनी २० सदस्यीय यूडीएफ मंत्रिमंडळाची घोषणा केली असून, त्यापैकी १४ मंत्री प्रथमच मंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेसला मुख्यमंत्रीपदासह ११ मंत्रीपदं मिळाली आहेत, तर IUMLला ५ मंत्रीपदं देण्यात आली आहेत. केरळ काँग्रेस, आरएसपी, केरळ काँग्रेस जेकब आणि सीएमपी यांना प्रत्येकी एक मंत्रीपद मिळालं आहे.

****

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या नव्या एक्स्प्रेस रेल्वे सेवेला दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला; यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वेसेवेला मोठी चालना मिळाली आहे. मुंबई, बंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जाळ्याचा दीर्घकालीन विस्तार करून ते सात हजार किलोमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे, असंही वैष्णव यांनी सांगितलं.

****

लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातल्या बोथी इथं ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ काल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. राज्य शासनाचा मृद आणि जलसंधारण विभाग, नाम फाऊंडेशन, टाटा मोटर्स फाऊंडेशन आणि सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. गावात पडणारं पावसाचं पाणी गावातच जिरवण्यासाठी प्रत्येक गावकऱ्याने ‘जलतारा’ सारख्या जलसंधारण उपक्रमात सहभागी व्हावं, असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं.

****

इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि देशहिताचा संदेश देणाऱ्या ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमाला काल परभणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सप्तसूत्रीच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वाहने वापरणं टाळून सायकल, पायी प्रवास तसंच सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला. या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणीकरांचे आभार व्यक्त केले. नागरिकांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद असून, अशाच प्रकारे पुढील रविवारीही ‘नो व्हेईकल डे’ ला प्रतिसाद द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयोजित समर कॅम्पला मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी काल भेट देत विविध ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांची पाहणी केली. गरवारे स्टेडियम इथं आयोजित करण्यात आलेल्या या समर कॅम्पमध्ये त्यांनी विशेषतः फेंसिंग क्रीडा प्रकाराची सविस्तर माहिती जाणून घेतली. मनपाच्या खेळाडूंनी भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

****

अनेक दशकांपासून पाणीटंचाई, अनियमित पाऊस आणि दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रासाठी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल ४ हजार ११६ कोटी रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश जारी केले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली.

****

नैऋत्य मान्सून २६ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज अंदमान-निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, किनारी कर्नाटक, केरळ आणि माहे इथं मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर दुसरीकडे पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, मराठवाडा, पंजाब, राजस्थान, तेलंगणा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात अनेक भागांमध्ये कमाल तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 مئی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 30 May 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ت...