Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 May
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २१ मे
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत
पाकिस्तानच्या नरसंहाराच्या काळ्या इतिहासावर जोरदार प्रहार केला आहे. काल सुरक्षा परिषदेत ‘सशस्त्र
संघर्षांमध्ये नागरिकांचे संरक्षण’ या विषयावरील वार्षिक
खुल्या चर्चेदरम्यान बोलताना, संयुक्त राष्ट्रांमधले
भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत हरीश पर्वथनेनी यांनी पाकिस्तानवर टीका केली.
पाकिस्तानची ही अमानवी वृत्ती म्हणजे स्वतःचे अंतर्गत अपयश लपवण्यासाठी आणि
त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून देशाच्या सीमांच्या आत
आणि बाहेर हिंसाचार पसरवण्याचा त्यांचा पूर्वनियोजित प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.
ज्या देशाचा स्वतःचा इतिहास नरसंहाराच्या कृत्यांनी डागाळलेला आहे, त्याने भारताच्या पूर्णपणे अंतर्गत असलेल्या मुद्द्यांवर भाष्य करावं, हा एक मोठा विरोधाभास असल्याचंही ते म्हणाले. पाकिस्तानच्या प्रतिनिधीने या
चर्चेदरम्यान जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राजदूत पर्वथनेनी
यांनी पाकिस्तानला हे चोख प्रत्युत्तर दिलं.
****
'दहशतवादविरोधी दिन' आज पाळला जात आहे. युवकांना
दहशतवाद आणि हिंसाचाराच्या मार्गापासून परावृत्त करण्याच्या उद्देशानं हा दिवस
पाळला जातो. १९९१ मध्ये याच दिवशी, माजी पंतप्रधान राजीव गांधी
यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून
अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या
संदेशात राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.
काँग्रेस नेते सोनिया गांधी, मल्लिकार्जुन
खरगे,
राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी चिदंबरम यांनी नवी दिल्लीत वीर भूमी या राजीव गांधी यांच्या समाधी स्थळावर
पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.
****
महाराष्ट्रातलं सांडपाणी प्रक्रिया केंद्र मॉडेल अत्यंत
प्रभावी ठरलं असून, लवकरच हे मॉडेल राष्ट्रीय स्तरावर एक
आदर्श मॉडेल म्हणून विकसित केलं जाणार असल्याचं, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या
वतीनं नवी दिल्लीत आयोजित स्वच्छ भारत अभियान शहरी या मोहिमेच्या दुसऱ्या
टप्प्याच्या राष्ट्रीय आढावा बैठकीत ते काल बोलत होते. ही बाब महाराष्ट्राच्या
दृष्टीने अतिशय अभिमानास्पद असून, राज्य सध्या शून्य कचरा आणि
कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती या संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी ठोस पावलं उचलत
असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
****
राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार कंपन्यांकडून
अनुदानित खतांच्या विक्रीसोबत विनाअनुदानित खते, सूक्ष्म
अन्नद्रव्ये,
जैवखते, जैवउत्तेजके सक्तीनं विक्री
केली जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर
राज्य शासनानं महत्त्वाचा निर्णय घेत संबंधित प्रकाराला तात्काळ बंदी घालण्याचे
आदेश जारी केले असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शेतकऱ्यांचं
हीत लक्षात घेऊन राज्य शासनानं आता अनुदानित खतांचा पुरवठा करताना इतर कोणत्याही
उत्पादनांची सक्ती करण्यास मनाई केली असल्याचं भरणे यांनी सांगितलं.
दरम्यान, अकोला इथं पोलीसांनी छापा
टाकून एका कारखान्यातून विना परवाना साठवलेला ९२ लाख रुपयांचा खताचा साठा जप्त
केला.
****
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात सर्व
राजकीय पक्षांनी सक्रिय सहकार्य करावं, असं आवाहन धाराशिवचे
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे. यासंदर्भात राजकीय पक्षांच्या
प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. विशेषतः जास्तीत जास्त मतदान
बुथ प्रतिनिधी नेमून मतदारांची नावं वगळली जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
****
बीड पोलिस दलात चार अत्याधुनिक एआय सर्व्हेलन्स व्हॅन दाखल
झाल्या,
पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या वाहनांना हिरवा झेंडा
दाखवला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात हे तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास काँवत यांनी यावेळी
व्यक्त केला.
****
बीड जिल्ह्यातल्या दिव्यांग बांधवांचं युडीआयडी कार्डचं
आधार संलग्नीकरण न झाल्यामुळे अनेक योजनांपासून लाभार्थी वंचित राहत आहेत. खासदार
बजरंग सोनवणे यांनी या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांना अधिकृत पत्र पाठवून
तातडीने ठोस पावले उचलण्याची सूचना केली आहे.
****
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जवळील
ओझर इथल्या विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या बांधकामास नवी दिल्ली इथल्या नागरी
विमान सुरक्षा विभागाच्या महासंचालकांनी मंजुरी दिली आहे. विस्तारीकरणाच्या
कामासाठी ५६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
****
नवी मुंबईत वाशी इथल्या जुहुगाव परिसरात गुन्हे शाखेने
केलेल्या कारवाईत एका नायजेरियन नागरिकाकडून एक कोटी २६ लाख रुपयांचं कोकेक जप्त
करण्यात आलं. त्याच्यासह अंमली पदार्थ पुरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
****
No comments:
Post a Comment