Friday, 29 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 29 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मे २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दहशतवादाविरोधातल्या लढ्यात दुटप्पी भूमिका किंवा दुहेरी निकष स्वीकारले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा दिला आहे. रशियाची राजधानी मॉस्को इथं आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचात आणि सुरक्षाविषयक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या १४ व्या आंतरराष्ट्रीय बैठकीत बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. दहशतवादाला समर्थन देणाऱ्या आणि त्याला आर्थिक मदत करणाऱ्या शक्तींविरोधात निर्णायक कारवाई करण्याची वेळ आली असून, जबाबदार देशांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, असं डोवाल म्हणाले. दहशतवादाचा मुकाबला करणं ही प्रत्येक देशाची सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगत, त्यांनी, दहशतवादी संघटना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांविरोधात कठोर पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली. पश्चिम आशियातल्या वाढत्या अस्थिरतेमुळे सागरी व्यापार आणि जागतिक सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचंही ते म्हणाले. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या जागतिक सुरक्षा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचंही डोवाल यांनी स्पष्ट केलं. 

****

राज्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून १२ लाख ५१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

****

बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या, पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी-यूजी या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेने काल जाहीर केलं. या परीक्षा आता ३१ मे, तसंच सहा आणि सात जून रोजी घेतल्या जातील. ३१ मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत; ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील, अशी माहिती संस्थेनं दिली आहे.

****

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद नियोजनाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नवी दिल्ली इथं काल उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी आपत्ती संवेदनशीलता आणि जोखीम मूल्यांकन, आपत्कालीन प्रतिसाद नियोजन, संभाव्य दुर्घटना परिस्थिती, गर्दी व्यवस्थापन, गर्दीच्या उच्च दाबाच्या कालावधीचे विश्लेषण, स्थळ आपत्कालीन नियंत्रण केंद्रांचं कार्यान्वयन, घटना प्रतिसाद प्रणाली तसंच विविध विभागांतल्या समन्वय यंत्रणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

****

गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली-छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलातून नक्षलवाद्यांनी जंगलात सुरु केलेला शस्त्र निर्मितीचा कारखाना काल उद्ध्वस्त करण्यात आला. अलीकडेच ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. जंगलात स्फोटके लपवून ठेवली असल्याची आणि शस्त्रे तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मागील आठवड्यात भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडानजीकच्या जंगलातूनही असाच शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उदध्वस्त केला होता.

****

आगामी मॉन्सूनमध्ये कोकण विभागातला मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेनं व्यापक पावसाळी पूर्वतयारी केली आहे. गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून, १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नरकर यांनी दिली. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने ठाण्यात ७ लाख ३० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल जप्त केला, तसंच प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालामधे फरसाण, तूप, नूडल्स, ताडी, शरबत याचा समावेश आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ४ लाख ५३ हजार ३४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

****

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये येत्या एक ते पाच जून दरम्यान स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू मोहिम राबवण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केलं आहे

****

परभणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने पाथरी उपविभागातील नदीपात्र परिसरात शोध आणि बचाव कार्याची रंगीत तालीम काल घेण्यात आली. आपत्तीच्या काळात तात्काळ प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता यावेळी तपासण्यात आली. नदीपात्रात बोटीद्वारे बचावकार्य, पूरग्रस्त नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर, लाइफ जॅकेटचा वापर, आपत्कालीन समन्वय, नागरिक बचाव आणि प्राथमिक उपचार यांचं प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...