Wednesday, 13 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 13 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

तामिळनाडूमध्ये, टीव्हीके आणि घटक पक्षांनी आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच, मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी AIADMK च्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघमचे एकमेव आमदार एस. कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. विधानसभेत आज १४४ आमदारांनी सरकारच्या बाजुने मतदान केलं. २२ आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मत दिलं, तर पाच आमदार तटस्थ राहीले.

****

ए आय एन आर सी नेते एन. रंगस्वामी यांनी आज पुदुचेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नायब राज्यपाल कैलासनाथन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

****

केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून, ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदीच्या घटकांवर पाच टक्के शुल्क आकारलं जाईल, तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी पाच पूर्णांक चार टक्के शुल्क लागू होईल.

****

भारत येत्या १४ आणि १५ मे रोजी ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर या बैठकीचे अध्यक्ष असतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना याबाबत माहिती दिली. या बैठकीत ब्रिक्स परराष्ट्र मंत्री, तसंच सदस्य आणि भागीदार देशांचे शिष्टमंडळ प्रमुख सहभागी होतील. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँडस, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या पांच देशांच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहितीही जयस्वाल यांनी यावेळी दिली.

****

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव यांचं आज लखनऊ इथं अल्पशा आजारानं निधन झालं, ते ३८ वर्षांचे होते. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंग यादव यांचे ते पुत्र, तर राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आणि भाजपाच्या सदस्य अपर्णा बिष्ट यादव यांचे ते पती होत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

****

सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात एका यात्रेदरम्यान भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. यासंदर्भात सामाजिक माध्यमावर लिहिलेल्या संदेशात त्यांनी, जखमी लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. मृतांपैकी तिघे जण जत तालुक्यातले असून, इतर तिघे कर्नाटकातले आहेत. या घटनेत १३ भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज, जत, संख आणि विजापूर इथल्या विविध रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंनी येत्या १९ मे पर्यंत अर्ज करावेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. यात्रेसाठीची नोंदणी लवकरात लवकर करण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. kmy.gov.in या संकेतस्थळावर यात्रेची सविस्तर माहिती असून याच संकेतस्थळावरुन नोंदणी करता येऊ शकते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्य विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे. सभापती राम शिंदे या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले डॉ. नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ. प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे.

****

बनावट औषध निर्मिती आणि विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी येत्या २० मे रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. राज्य रसायनशास्त्रज्ञ आणि औषध विक्रेते संघटनेचे उपाध्यक्ष मुकुंद दुबे यांनी आज भंडारा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात बनावट औषधांचा धोका वाढला आहे, ही बाब केंद्र सरकारच्या वारंवार निदर्शनास आणूनही त्याकडे लक्ष दिलं जात नसल्याने, हा संप पुकारला असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक कंपन्या निकृष्ट दर्जाची औषधी तयार करून बाजारात आणत असून, या प्रकारात काही डॉक्टर्सचाही सहभाग असल्याचा आरोप दुबे यांनी केला.

****

इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. रायपूर इथं संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

राजस्थानमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्ये उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून, किनारी कर्नाटकात आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...