Friday, 22 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्य सरकार जागतिक भागीदारीसाठी कटिबद्ध - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन, सायप्रस मुंबईत येत्या एक सप्टेंबर पासून व्यापार केंद्र सुरु करणार

·      खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

·      नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर इथले बालरोग तज्ञ डॉ. मनोज शिरूरे सीबीआयच्या ताब्यात

·      पेट्रोल तसंच डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध, नागरिकांनी संयम राखावा-छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

आणि

·      पुढील ३६ तासांसाठी विदर्भातल्या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट, मराठवाड्यात परभणी इथं ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

****

महाराष्ट्र शासन स्थिर, निर्णयक्षम आणि उद्योगपूरक असून जागतिक भागीदारीसाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात बोलत होते. सायप्रसच्या उद्योगसमूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन फडणवीस यांनी यावेळी केलं.

सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलीदेस यांनी यावेळी बोलतांना, भारतीय उद्योगांना फक्त युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस साहाय्य करेल अशी ग्वाही दिली. मुंबईत येत्या एक सप्टेंबर पासून सायप्रस व्यापार केंद्र सुरु करण्याची घोषणा निकोस यांनी केली. दोन्ही देशांमध्ये सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

****

दरम्यान, दक्षिण कोरियासोबतही राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभागाने काल तीन सामंजस्य करार केले. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. कौशल्य विकासाच्या क्षेत्रात दक्षिण कोरियासोबतची भागीदारी राज्यातल्या तरुणांसाठी जागतिक संधी निर्माण करेल, प्रगत तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण प्रणालींच्या माध्यमातून भारताची कुशल मनुष्यबळ शक्ती मजबूत करेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. काल मुंबईत राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा तसंच कृषीकर्जासाठी सिबिल रेटिंग विचारात न घेण्याच्या सूचना बँकांना केल्याचंही त्यांनी सांगितलं.

यंदाच्या खरीप हंगामावर एल-निनोचं सावट असून, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या फक्त ८८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. हे संकट लक्षात घेता, जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामं अत्यंत जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. राज्यात बियाणे तसंच खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.

****

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात १५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण ७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, नियोजन विभागाकडून यासंदर्भातला शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

****

इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेत डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी, इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना तत्काळ वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या लक्षणांमध्ये ताप, डोकेदूखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्त्राव किंवा उलटी अशा लक्षणांचा समावेश आहे. अशा प्रवासानंतरही २१ दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळली तर वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयाने केलं आहे.

****

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं.

छत्रपती संभाजीनगर इथं काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष सय्यद अक्रम यांच्यासह अनेकांनी राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयात दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. महापौर समीर राजूरकर, आयुक्त अमोल येडगे यांच्यासह अनेक अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांनी ही शपथ घेत, दहशतवादमुक्त आणि शांततामय समाज निर्मितीचा संकल्प केला.

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत ही शपथ घेण्यात आली.

****

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधले बालरोग तज्ञ डॉ. मनोज शिरूरे यांना केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयने काल ताब्यात घेतलं. शिरूरे याने आपल्या मुलीसाठी नीटचा प्रश्नपत्रिका संच खरेदी केल्याच्या संशयावरून ही कारवाई केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी सीबीआयने त्याच्या याच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला पुणे इथं बोलावलं होतं, चौकशीअंती त्याला ताब्यात घेण्यात आलं.

दरम्यान, आरसीसी कोचिंग केंद्राच्या वतीने काल लातूर इथल्या केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात आली. संचालक शिवराज मोटेगावकर सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत, मात्र विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी क्लास प्रशासनाकडून शैक्षणिक उपक्रम सुरू ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत असून, नागरिकांनी संयम राखावा, असं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातल्या विविध पेट्रोल पंपांवर इंधन खरेदीसाठी नागरिकांनी विनाकारण गर्दी केल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. सामाजिक माध्यमावरील चुकीच्या संदेशांमुळे नागरिकांमध्ये इंधन टंचाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सर्व पेट्रोल पंपांवर नियमित मागणीपेक्षा ३० टक्क्यांहून अधिक अतिरिक्त पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सामाजिक माध्यमावर चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर प्रशासन सायबर कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा जिल्हाधिकार्यांनी दिला आहे.

****

नांदेड शहर आणि जिल्ह्यातही पेट्रोल तसंच डिझेलचा पुरेसा साठा असून, नियमितपणे पुरवठा होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. अचानक डिझेलच्या मागणीत २५ ते ३० टक्के वाढ झाल्याने पॅनिक खरेदी होत आहे, त्यामुळे टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं.

****

जालना जिल्ह्यात खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्रात रेशीम हातमाग प्रशिक्षण कार्यक्रमाचा काल समारोप झाला. जालना इथं रेशीम विणकाम उद्योग वाढवण्यासाठी मोठी संधी उपलब्ध असल्याचं जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी नमूद केलं. पहिल्या टप्प्यात ३० महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं असून पुढील काळात आणखी ५०० महिलांना प्रशिक्षण देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

****

आगामी मान्सूनचा संभाव्य धोका आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नांदेडमध्ये महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली काल शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. पावसाळ्यात शहरातल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता प्रत्येक विभागाने घ्यावी, कामात निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

****

तेलंगणा राज्यातल्या पोचमपाड बॅक वॉटरचा मोठा फटका नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसला असून, सीमावर्ती तालुक्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धरतीवर विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावं, या मागणीसाठी काल नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चात धर्माबाद, नायगाव, उमरी, मुदखेड आदी तालुक्यातले शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

****

३०० कोटी वृक्षारोपण अभियानाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी योग्य जमिनींची ‘लँड बँक’ तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. प्रत्येक तालुक्यातला शासकीय कार्यालय परिसर, मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा, गायरान, पडीक जमीन तसंच इच्छुक शेतकऱ्यांच्या जमिनींचं सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

****

बीड तालुक्यातल्या हिंगणी खुर्द इथल्या पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण तत्काळ हटवून रस्ते मोकळे करण्याचे आदेश तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिले आहेत. काल या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला या रस्त्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे.

****

राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४७ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४४ अंश, छत्रपती संभाजीनगर इथं ४१, बीड ४० पूर्णांक चार, तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना पुढच्या ३६ तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...