Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 May 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१० मे
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
तामिळनाडूमध्ये, ‘तमिळगा वेट्री कळघम’ म्हणजेच टीव्हीके
पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी काही वेळापुर्वीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
हा शपथविधी समारंभ चेन्नई इथल्या नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये पार पडत आहे. राज्यपाल
राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. विजय यांच्यासह पक्षाच्या नऊ मंत्र्यांनीही यावेळी शपथ घेतली.
****
लोकशाही बळकट करण्यामध्ये प्रत्येक
मतदारानं सहभागी होणं अनिवार्य असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी
म्हटले आहे. तिरुपती इथं आज ते पत्रकारांशी बोलत होते. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू
इथं पार पडलेल्या यशस्वी आणि शांततापूर्ण निवडणुकांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
ज्ञानेशकुमार, सध्या तिरुपतीच्या दोन
दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी तिरुमला इथल्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात
दर्शन घेतलं.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या
अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज एका उच्चस्तरीय बैठक होणार आहे. देशातील संभाव्य पूर
परिस्थिती आणि उष्णतेच्या लाटांचा सामना करण्यासाठीच्या पूर्वतयारीचा आढावा या बैठकीत
घेतला जाईल. संभाव्य आपत्तीच्या काळात "शून्य जीवितहानी" आणि कमीत कमी नुकसान व्हावे, यादृष्टीने आढावा गृहमंत्री घेणार
आहेत.
****
मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता
वाढवण्यासाठी, भारत निवडणूक आयोगाच्या
सूचनेनुसार सध्या मतदार पडताळणीच्या दृष्टीनं ‘एसआयआर मॅपिंग’ मोहीम राबवण्यात येत
आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून घेतली, हे मॅपिंग यशस्वीपणे पूर्ण केलं. दुबार नावं टाळण्यासाठी
आणि मतदार यादीतील गोंधळ कायमचा दूर करण्याकरिता सर्व नागरिकांनी तातडीनं आपली पडताळणी
पूर्ण करावी, असं आवाहन पाटील यांनी
केलं आहे.
****
भारतानं काल प्रगत 'अग्नी' क्षेपणास्त्राची यशस्वी
चाचणी घेतली आहे. ओडिशातील डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून, 'एम.आय.आर.व्ही' प्रणालीनं सुसज्ज असलेल्या अशा या
क्षेपणास्त्राची चाचणी झाली. या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'संरक्षण संशोधन आणि विकास संस्था- डी.आर.डी.ओ', भारतीय लष्कर आणि संबंधित उद्योगांचं
कौतुक केलं आहे. वाढत्या सुरक्षिततेच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या
चाचणीमुळं अभूतपूर्व भर पडेल, असं सिंह यांनी म्हंटलं
आहे.
****
आज जागतिक मातृदिन अर्थात ‘मदर्स
डे’ आहे. जगातील बहुतांश ठिकाणी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा
करण्याची रित आहे. जन्मदात्री आईवरचं प्रेम
व्यक्त करत कृतज्ञता याद्वारे व्यक्त करण्यास संधी मिळते.
****
राज्यात काल विविध ठिकाणी जोराचे
वारे, विजांसह पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यात
काल संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळं मोठं नुकसान झालं. त्याआधी वावटळीमुळं सर्वत्र
धुळीचं साम्राज्य पसरलं होतं, नंतर पावसात झाडं कोसळली, घरांचे पत्रे उडाली, वीज पुरवठाही खंडित झाला. संगमेश्वर
तालुक्यात अनेक ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी विजांसह पाऊस पडला, या पावसामुळं रत्नागिरी-कोल्हापूर
महामार्गावर पाणी साचलं आणि काही ठिकाणी घरात पाणी शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सलग
तिसऱ्या दिवशी तसंच रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली
जिल्ह्यातही काल पावसानं हजेरी लावली.
दरम्यान, जालना जिल्ह्याच्या काही भागात आज सकाळी पाऊस झाल्ह्याचं वृत्त आहे.
****
हवामान -
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याच्या वारे तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट
राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
****
शांघाय इथं पार पडलेल्या धनुर्विद्या विश्वचषकाच्या दुरसऱ्या टप्प्यातील
थरारक अंतिम सामन्यात, भारतीय महिला रिकर्व्ह
संघानं यजमान चीनचा ५-४ ने पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा
समावेश होता.
****
ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई
१५ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत
नऊ भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली आहे. १५ वर्षांखालील गटात, ३०-३३ किलो वजनी गटात भारताच्या अक्षिताने
कझाकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला. तर ३७, ४०, ४३, ४६ आणि ५८, ६१ आणि ६४ किलो वजनी गटात भारतीय
महिला मुष्टीयोध्यांनी विजय संपादन केला.
****
क्रिकेट –आयपीएलमध्ये, चेन्नई इथं आज चेपॉक स्टेडियमवर लखनौ
सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना दुपारी साडेतीन
वाजता सुरू होईल. दुसऱ्या सामन्यात, रायपूर इथल्या शहीद वीर
सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने
येतील. हा सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल. दरम्यान, काल जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात, गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा
७७ धावांनी पराभव केला.
****
No comments:
Post a Comment