आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
३० जून २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
देशातली सर्वात मोठी कर सुधारणा
म्हणून ओळखली जाणारी वस्तू अणि सेवा कर - जीएसटी प्रणाली आज मध्यरात्रीपासून देशभर
लागू होणार आहे. ‘एक देश एक कर’ या धोरणानुसार या कर प्रणालीची निर्मिती करण्यात आली
आहे. यानिमित्त केंद्र सरकारनं संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आज रात्री अकरा वाजता
एका विशेष समारंभाचं आयोजन केलं आहे. मध्यरात्री बारा वाजता घंटानाद करून ही प्रणाली
लागू झाल्याची घोषणा केली जाईल.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांना
कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनानं घेतल्यानंतर त्यासाठी आपलंही योगदान
असावं या भावनेनं विविध व्यक्ती आणि संस्था शेतकऱ्यांसाठी मदत करत आहेत. शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीसाठी मुंबईतल्या हरमन फिनोकेम या संस्थेनं मुख्यमंत्री सहायता निधीस २५ लाख
रुपयांचा धनादेश दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मदतीबद्दल संस्थेचे
विशेष आभार मानले आहेत.
****
राज्यातल्या ८९ लाख शेतकऱ्यांना
कर्जामाफीचा लाभ देण्यासाठी आणलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजने’चं
राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करत असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील
तटकरे यांनी म्हटलं आहे. तटकरे यांनी काल वार्ताहरांशी संवाद साधून पक्षाची भूमिका
मांडली.
****
नाशिक जिल्ह्यात मालेगाव
इथं झालेल्या तिहेरी वाहनांच्या अपघातात धुळे इथले चौघे जण जागीच ठार झाले. काल रात्रीच्या
सुमारास हा अपघात झाला.
****
हिंगोली जिल्ह्यात खरिपाच्या
८१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी तीन लाख ४० हजार
हेक्टरवर पेरणीचं नियोजन आहे, यापैकी दोन लाख ७८ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.
यामध्ये सुमारे एक लाख ६४ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाल्याचं वृत्त आहे.
****
No comments:
Post a Comment