Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 June 2017
Time – 06.50 AM to 07.00 AM
Language - Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जून २०१७ सकाळी ०६.५० मि.
·
आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात उत्साहात साजरा
·
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे विमुद्रीकरणानंतर जमा
झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा,
भारतीय रिझर्व्ह बँकेत भरण्याची परवानगी
·
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दहा हजार रुपयांचं कर्ज न देणाऱ्या बँकांविरुद्ध
कायदेशीर कारवाई करण्याचा सरकारचा इशारा
आणि
·
लातूर इथं आणखी एक बनावट टेलिफोन एक्स्चेंज सापडलं
****
आंतरराष्ट्रीय योग दिवस काल जगभरात उत्साहात साजरा झाला. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, बांगलादेश, दक्षिण
आफ्रिकेसह एकशे ऐंशी देशात योग दिनानिमित्त योग शिबीरांचं आयोजन करण्यात आलं होतं. संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला. चीनच्या प्रसिद्ध भिंतीवर
योग साधकांनी योगासनं केली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
यांनी तर लखनऊ इथं आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी योगासनं केली. भारतीय नौदलाच्या सैनिकांनी आयएनएस विक्रमादित्य आणि जलाश्व या युद्धनौकांवर तर इंडो-तिबेटियन सीमा सुरक्षा दलाच्या
सैनिकांनी लडाख मध्ये उणे पंचवीस अंश सेल्सियस तापमानात योगासनं केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार
आणि खासदार पूनम महाजन यांनी मुंबईत, मुंबई पोलिसांनी आयोजित केलेल्या योगदिनाच्या कार्यक्रमामध्ये
भाग घेतला.
औरंगाबाद इथं पतंजली योग
समितीच्या वतीनं जवाहरलाल नेहरु अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात योग शिबीर घेण्यात आलं, समितीच्या वतीनं
जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमाबाबत समितीचे औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष सतीश मुळावेकर
यांनी माहिती दिली. ते म्हणाले ....
आपल्या औरंगाबाद शहरामध्ये
आणि जिल्ह्यामध्ये दिडशे ठिकाणी मोठमोठ्या योगशिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद
शहरामध्ये जवळपास ७५ शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडून योग करुन घेण्यात आला आहे.
त्यानंतर बऱ्याचशा कंपन्यांमध्ये, ग्रामीण भागात, प्रत्येक तालुका प्लेसला हा योग साधनेचा
कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झालेला आहे. काही छोट्या छोट्या गावांमध्ये, शाळांमध्ये
प्रत्येक ठिकाणी जागरुकता निर्माण झालेली आहे. गेल्या तीन वर्षामध्ये हा अतिशय बदल
झालेला आहे.
मराठवाड्यात जालना, बीड,
लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, तसंच हिंगोली इथं नागरिकांनी योग शिबीरांमध्ये उत्स्फुर्त
सहभाग नोंदवला. अंबाजोगाई इथं प्राचार्य डॉ आर एम हजारी यांनी नगर परिषदेच्या जलतरण
तलावात पाण्यावर तरंगत योगासनांचं सादरीकरण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या
समारंभात जगभरातून सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.
****
योग प्रसार आणि प्रचारासाठी दिला जाणारा पंतप्रधान पुरस्कार पुण्याच्या राममणि अय्यंगार स्मारक
योग संस्थेला जाहीर झाला आहे. या संस्थेनं गेल्या चाळीस वर्षांमध्ये देशात तसंच परदेशांमध्ये
केलेल्या योग प्रसार कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशभरातून
प्राप्त झालेल्या शंभर नामांकनांमधून या संस्थेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
****
राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकांकडे विमुद्रीकरणानंतर जमा झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा, येत्या वीस जुलैपर्यंत
भारतीय रिझर्व्ह बँकेत भरण्याची परवानगी सरकारनं दिली आहे. कोणत्याही बँकेत किंवा टपाल
कार्यालयात ३० डिसेंबर २०१६ पर्यंत जमा झालेल्या, तसंच कोणत्याही जिल्हा सहकारी बँकेत
१० नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत जमा झालेल्या नोटाच अशा प्रकारे भरता येणार
असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. मात्र या नोटा ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत रिझर्व्ह बँकेत
जमा न करण्याचं कारणही या बँकांना किंवा टपाल कार्यालयांना, द्यावं लागणार आहे.
****
सर्व राष्ट्रीयकृत बँका, व्यावसायिक बँका, राज्य सहकारी
बँका, जिल्हा सहकारी बँका तसंच अन्य बँकांनी राज्य शासनानं शेतकऱ्यांना तातडीची मदत
म्हणून जाहीर केलेलं दहा हजार रुपयांचं कर्ज त्वरीत देण्याची प्रक्रिया करावी, असं
आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या
राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. केलेल्या कर्जपुरवठ्याची
माहिती शासनाकडे जमा केल्यानंतर तातडीनं बँकांना व्याजासह परतावा दिला जाईल असं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले.
****
ज्या बँका शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दहा हजार रुपयांचं
कर्ज देणार नाहीत, त्या बँकां विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा, महसूल मंत्री
चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ते काल सोलापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. ज्या
बँका अडचणीत आहेत, त्या बँकांनी राज्य सहकारी बँकांकडे मदत मागावी, सरकार त्या बँकांना
मदत करण्यास तयार आहे, असं ते म्हणाले.
****
राज्यातल्या सर्व शासकीय आणि अनुदानित खाजगी शाळांमध्ये
शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी, तसंच नेमकी पटसंख्या समजण्यासाठी विद्यार्थ्यांची
माहिती आधार क्रमांकाशी जोडण्याचं काम तातडीनं पूर्ण करावं, असे निर्देश मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
राज्यातल्या शैक्षणिक सुधारणांसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांचा
काल त्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या सर्व शाळांची अचूक माहिती
संकलित करून, ती पब्लिक क्लाऊडवर ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
शिक्षकांच्या नियमित उपस्थितीसाठी शाळांमध्ये चेहऱ्यावरून
उपस्थिती नोंदवणारं जैवमिती - बायोमेट्रीक यंत्र सक्तीचं करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट
कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
केंद्र सरकारनं चौदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत
किंमतीत वाढ केली आहे. यामध्ये भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस यासह उडीद, तूर, मूग या पिकांचा समावेश
आहे. भाताच्या प्रति क्विंटल किमतीत ८० रुपये, डाळीसाठी ४०० रुपये, सोयाबीनसाठी पावणे तीनशे रुपये तर कापसाच्या
किमान आधारभूत किमतीत प्रतिक्विंटल एकशे साठ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
****
लातूर इथं आणखी एक चौथं बनावट टेलिफोन एक्स्चेंज सापडलं
आहे. शहरातल्या नंदी स्टॉप भागात हे टेलिफोन एक्स्चेंज चालवलं जात होतं. यापूर्वीच्या
प्रकरणात अटक करण्यात आलेला, रवी साबदे हाच
हे टेलिफोन एक्स्चेंज चालवत होता. या ठिकाणाहून दोन लाख रूपये किमतीची तीन गेट वे यंत्र
आणि १०० सिमकार्ड जप्त पोलिसांनी काल जप्त केले.
****
औरंगाबाद शहरातल्या वाळूज एम आय डी सी पोलीस ठाण्यातला
सहाय्यक पोलीस निरीक्षक विट्ठलसिंह राजपूत आणि उपनिरीक्षक ताहेर पटेल या दोघांना लाच
मागितल्याच्या आरोपावरुन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी काल निलंबित केलं. स्क्रॅपनं
भरलेले २ ट्र्क गेल्या सोमवारी या दोघांनी पकडले होते. त्यांनी हे ट्र्क सोडून देण्यासाठी
ट्र्क मालकाकडे साडे आठ लाख रुपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात ट्रक मालकानं पोलिस
आयुक्तांकडे तक्रार केली होती.
****
वाढतं प्रदूषण रोखून पर्यावरणाचा
समतोल राखला जावा यासाठी येत्या १ ते ७ जुलै या कालावधीत उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष
लागवड करण्याचं आवाहन जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे.
जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या वृक्ष
लागवडी संदर्भात घेण्यात आलेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना काल ते बोलत होते.
पाऊस पडण्यास उपयुक्त ठरणाऱ्या
वृक्षांची अधिकाधिक लागवड केल्यास भविष्यात दुष्काळी परिस्थितीवर आपण कायमस्वरुपी मात
करण्यात यशस्वी ठरु अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील
खोडवेकर यांनी कार्यालय आणि शासकीय निवासस्थान सजवण्यासाठी ३१ लाख रुपयांची उधळपट्टी
केल्याची तक्रार आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे
एका पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर याच कामासाठी आणखीन १० लाख रुपयांची निविदा काढण्यात
येत असल्याचं आमदार दुर्राणी यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment