Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 June 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जून २०१७ दुपारी १.००वा.
****
येत्या एक जुलै पासून देशभरात
वस्तु आणि सेवा कर प्रणाली लागू होणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी
सांगितलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. ३० जून ला रात्री
बारा वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते जीएसटीची
औपचारीक सुरुवात होणार असल्याचं ते म्हणाले. या कार्यक्रमात
उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा
महाजन, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एच पी देवेगौडा यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री,
अर्थमंत्री, अधिकारी उपस्थित राहणार असल्याचं जेटली यांनी सांगितलं. जीएसटी परिषदेनं
सर्व राज्यांच्या सहमतीनं अनेक महत्वाचे निर्णय घेतले असल्याचं ते म्हणाले. जीएसटीमुळे
अप्रत्यक्ष कर प्रणालीत अमुलाग्र बदल होणार असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसाच्या लखनऊ दौऱ्यावर जाणार आहेत. ते
आज केंद्रीय औषध संशोधन संस्थेचा परिसर आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम तंत्रज्ञान
विद्यापीठाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करणार आहेत. ते उद्या लखनऊ इथं जागतिक योग दिनाच्या
कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
****
सर्वोच्च न्यायालयानं वृत्तपत्रांना पत्रकारांच्या वेतन श्रेणीशी संबंधित माजीठिया
वेतन मंडळाच्या शिफारशी लागू करण्यास सांगितलं आहे. पत्रकार, इतर कर्मचारी आणि त्यांच्या
संघटनांनी दाखल केलेल्या ८३ अवमान याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हे निर्देश
दिले. सात फेब्रुवारी २०१४ ला च माजीठिया वेतन मंडळाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे
निर्देश दिले असल्याचं न्यायालयानं यावेळी नमूद केलं.
****
पर्यावरणपूरक घर निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार काही सवलती
देण्याच्या विचारात आहे. पर्यावरणपूरक गृह संकुलांच्या कर्जावरच्या व्याजदरात सूट देणार
असून नोंदणी शुल्कातदेखील सवलत दिली जाणार आहे. पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र
सरकार अशा घरांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देणार असून, त्यासाठी नवे नियम आणि कायद्यांमध्ये
आवश्यक बदल केले जाणार आहेत.
****
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर
सिंग यांनी पाच एकर आणि त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत
कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. तर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना
संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय पंजाब सरकारनं घेतला आहे. यामुळे पंजाब मधल्या दहा
लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
****
आषाढी वारीसाठी पंढरीकडे निघालेल्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री
तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यातला दोन दिवसांचा मुक्काम आटोपून आज सकाळी पुढील
मुक्कामासाठी मार्गस्थ झाल्या. आज माउलींची पालीखी दिवे घाटाचा अवघड टप्पा पार करून
सासवड मुक्कामी पोहोचेल, तर तुकोबारायांची पालखी सोलापूर रस्त्यानं लोणी काळभोरच्या
मुक्कामाला जाईल.
पैठणहून
निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज राक्षसभुवनच्या मुक्कामी पोहोचेल. दरम्यान, राज्य
शासनाचा पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आयोजित 'पर्यावरणाची
वारी पंढरीच्या दारी' या आळंदी ते पंढरपूर पायी वारीचा प्रारंभ काल पुण्यात
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाला.
****
राजर्षी
शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे देण्यात येणारा यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ
पद्मभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि
मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या २६ जूनला राजर्षी शाहू महाराजांच्या
जयंतीदिनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते
या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार
यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
देशात काही ठिकाणी पेट्रोलपंपावर इंधन वितरण प्रक्रियेत
पंप चालकाकडून ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार घडत असल्यानं औरंगाबाद मधल्या चार पेट्रोलपंपांची
अचानक तपासणी करण्यात आली. मात्र यात कुठलाच गैरप्रकार आढळून आला नाही, अशी माहिती
पोलिसांनी दिली आहे. कंपनीचे अधिकारी, शासकीय अधिकारी, संबंधित तंत्रज्ञ यांच्यामार्फत
पोलिस आयुक्तालयातल्या गुन्हे शाखेनं ही तपासणी केली.
//********//
No comments:
Post a Comment