Saturday, 24 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 24.06.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 June 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ जून  २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्यातल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा आज राज्य सरकारनं केली आहे. याबरोबरच राज्यातल्या ४० लाख शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज मुंबई इथं कर्जमाफीसंदर्भात झालेल्या मंत्रीमंडळाच्या विशेष बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. कर्जमाफीच्या या योजनेला ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ हे नाव देण्यात आलं आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन झालं, किंवा ज्या शेतकऱ्यांनी मध्यम मुदतीचं कर्ज घेतलं, अशा शेतकऱ्यांनाही हा लाभ मिळणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये किंवा २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याद्वारे राज्यातल्या ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची मदत करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
आजी माजी मंत्री, राज्य आणि केंद्र सरकारचे कर्मचारी, व्यापारी किंवा नोंदीत पुरवठादार, व्हॅटला पात्र असणारे तसंच शेती व्यतिरिक्त उत्पन्न असलेल्यांना या योजनेचा लाभ होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसंच विरोधी पक्षांसोबत चर्चा करुन हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी मदत म्हणून सर्व भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि आमदारांनी एक महिन्याचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.    

****

सर्व राज्यांमधली एकूण वित्तीय तूट चार लाख तीन हजार कोटींहून अधिक झाली आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांची तूट सर्वाधिक असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं प्रकाशित केलेल्या एका सांख्यिकी पुस्तकात म्हटलं आहे. या आकडेवारीनुसार देशात सर्वात अधिक शहरी विभाग असलेल्या आणि औद्योगकदृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्रात मात्र वित्तीय तूट गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कमी झाली आहे. गेल्या २५ वर्षापासून सर्व राज्यातली वार्षिक वित्तीय तूट वाढतच असल्याचं या आकडेवारीत स्पष्ट झालं आहे.  

****

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत ही ’सकारात्मक शक्ती’ असल्याची जाणीव असून भारतासोबतचे संबंध महत्वाचे असल्याचं अमेरिकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या अगोदर ट्रम्प प्रशासन भारताला दुर्लक्षित करत असल्याच्या वृत्तांचं खंडन करताना हा अधिकारी बोलत होता. पंतप्रधान मोदी हे उद्या अमेरिकेत पोहोचणार असून सोमवारी ते ट्रम्प यांना भेटणार आहे. तसंच या अधिकाऱ्यानं अमेरिकेतल्या नव्या प्रशासनामध्ये भारत-अमेरिका संबंध रेंगाळले असल्याचे वृत्तही नाकारले आहे.

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय व्यवहार मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. लोकसभेचे खासदार विनोद खन्ना आणि राज्यसभेच्या खासदार पल्लवी रेड्डी यांच्या निधनाच्या शोक प्रस्तावामुळे पहिल्या दिवशीचं कामकाज होणार नसल्याची शक्यता आहे. तसंच १७ जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणुकही होणार आहे.  

****

श्रीनगर इथं पोलिस उपअधिक्षक मोहम्मद अय्यूब पंडित यांची हत्या केल्याप्रकरणी आज आणखी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणात बारा जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आल्याचं पोलीस महासंचालक एस.पी वैद यांनी सांगितलं. अय्यूब यांनी नमाजादरम्यान केलेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाले होते, त्यामुळे चिडलेल्या जमावानं त्यांची हत्या केल्याचं सांगण्यात आलं आहे.

****

संसदीय सचिव नियुक्ती प्रकरणाशी संबंधीत आम आदमी पक्षाच्या २१ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी निवडणूक आयोगासमोर दाखल केलेल्या याचिवेरील सुनावणी आज संपली. संसदीय सचिव या पदाचा या आमदारांनी लाभ घेतलेला असल्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द करावं अशी याचिका आयोगासमोर दाखल आहे. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयानं सचिव पदाची निवड यापूर्वीच बेकायदेशीर ठरवली असल्यामुळे आयोगासमोर या प्रकरणाची सुनावणी होऊ शकत नाही अशी भूमिका या आमदारांनी घेतली आहे. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर आयोगानं याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे.

****

निवडणूक आयोगानं मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी निवडणुकीचा चुकीचा खर्च सादर केल्यामुळे त्यांना अपात्र घोषित केलं आहे. यामुळे मिश्रा यांना तीन वर्षांसाठी निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. मिश्रा यांनी २००८ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती छापल्या मात्र निवडणूक खर्चामध्ये त्याबाबत माहिती सादर केला नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...