Friday, 30 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.06.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 June 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जून  २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशात वस्तू आणि सेवा कर प्रणाली - जीएसटी लागू करण्याची सगळी तयारी पूर्ण झाली असून, आज रात्री बारा वाजता संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात जीएसटीची औपचारिक सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्व केंद्रीय मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. गेल्या सात दशकांपासून देशात लागू असलेल्या एक डझनपेक्षा अधिक राज्य आणि केंद्रीय करांच्या जागी आता एकच करप्रणाली सुरु होणार आहे.
जीएसटी हे एक परिवर्तन असून, सगळ्या व्यवसायिकांनी त्याचा लाभ घेण्याचं आवाहन, केंद्रीय नागरी विकास मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. केंद्र आणि राज्यांची अर्थव्यवस्था यामुळे एकत्र येणार असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, विमुद्रीकरणाप्रमाणे संस्थात्मक तयारीशिवाय जीएसटीची अंमलबजावणी होत असल्याचं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. जीएसटी कर प्रणाली देशाच्या दृष्टीनं महत्वाची आहे, मात्र अर्धवट तयारीवर त्याची अंमलबजावणी होत असल्याचं ते म्हणाले. जीएसटीच्या कार्यक्रमावर काँग्रेस पक्षानं बहिष्कार टाकला आहे. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं टेक्स्टाईल इंडिया २०१७ या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. भारतीय वस्त्रोद्योग आणि हातमागाचा जगभर प्रचार प्रसार करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात १०० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

****

जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात सीमारेषेवर पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळी त्यांनी लष्करी चौक्या आणि नागरी वस्त्यांवर उखळी तोफांचा मारा केला. या हल्ल्यात एक स्थानिक महिला जखमी झाल्याचं वृत्त आहे.

****

राज्य आणि देशाच्या विकासात व्यापारी-उद्योजकांचं मोठं योगदान असून, वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये प्रामाणिकपणे व्यापार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस त्रास होणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मुंबई इथं उद्योग व्यापारी जगतातल्या प्रतिनिधींशी मुनगंटीवार यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर येणाऱ्या अडचणी, शंकांचं निरसन करण्यासाठी विक्रीकर विभागानं एक हेल्पलाईन सुरु केली आहे. एक आठ शून्य शून्य दोन दोन पाच नऊ शून्य शून्य या क्रमांकावर फोन करून राज्यातली कोणतीही व्यक्ती, उद्योजक-व्यापारी आपल्या शंका विचारु शकतील, असं ते म्हणाले.

****

मराठी भाषा सल्लागार समितीनं आज राज्य शासनाला मराठी भाषा धोरणाचा सुधारीत मसुदा सादर केला असून, या मसुद्यावर संबंधीत विभागाचे अभिप्राय घेतल्यानंतर मराठी भाषा विभागामार्फत सदर मसुदा मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मांडण्यात येईल, असं मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. मंत्रीमंडळानं या धोरणास मंजूरी दिल्यानंतर मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल, असं ते म्हणाले. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आज तावडे यांना मराठी भाषा धोरणाचा मसुदा सादर केला, त्यावेळी ते बोलत होते.

****

राज्यात उद्यापासून सात जुलैपर्यंत वन महोत्सव सप्ताह राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मराठवाड्यात चौऱ्याहत्तर लाख वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट आहे. या सप्ताहाअंतर्गत प्रामुख्यानं टेकड्या, शासकीय पडीक जमीन, गायरान शेतांचे बांध, रस्ते, रेल्वेच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याचं आवाहन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे. यासाठी वृक्ष आपल्या दारी योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात रोपं उपलब्ध करुन दिल्याचं ते म्हणाले. मराठवाड्यात आठ जिल्ह्यातल्या शहात्तर तालुक्यांत २७७ रोपवाटीकांमध्ये एक कोटी ३४ लाख रोपं तयार करुन लागवडीसाठी तयार ठेवली आहेत.   
जालना जिल्ह्यात आठ लाख ५० हजार वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट असून, या मोहीमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सुरु असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तीसरा  सामना आज अँटीग्वा इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला, तर दुसऱ्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर १०५ धावांनी विजय मिळवल्यामुळे भारत मालिकेत एक - शून्यनं आघाडीवर आहे.

****

धुळे जिल्ह्यात आज दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर १२ जण जखमी झाले. सुरत रस्त्यावर अज्ञात वाहनानं दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे सुरत नागपूर महामार्गावर आनंदखेडे गावाजवळ लक्झरी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात १२ जण जखमी झाले. जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...