Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 21 June 2017
Time 6.10 AM to 6.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जून २०१७ सकाळी ६.१० मि.
****
·
वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या
अंमलबजावणीला ३० जूनच्या मध्यरात्री राष्ट्रपतींच्या हस्ते औपचारिक प्रारंभ
·
राष्ट्रपती पदासाठीचे राष्ट्रीय
लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा
·
थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी
तातडीनं कर्ज देण्यासाठीच्या निकषात बदल
·
महाराष्ट्र धोरण संशोधन संस्था स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
आणि
·
तिसऱ्या जागतिक योग दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं
आयोजन
****
देशभरात वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीला येत्या
३० जूनच्या मध्यरात्री राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते औपचारीक प्रारंभ
होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. वस्तू आणि सेवा कर परिषदेनं सर्व राज्यांच्या सहमतीनं अनेक महत्वाचे
निर्णय घेतले असून, या कर कायद्यामुळे अप्रत्यक्ष कर प्रणालीत आमुलाग्र बदल होणार असल्याचं
जेटली यांनी यावेळी सांगितलं.
****
शिवसेनेने राष्ट्रपती पदासाठी भारतीय जनता पक्ष प्रणित
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला
आहे. काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोविंद यांना
पाठिंबा देत असल्याचं सांगितलं.
दरम्यान, रामनाथ कोविंद यांनी काल बिहारच्या
राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. कोविंद, परवा, २३ तारखेला उमेदवारी अर्ज
भरणार आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांचा
राजीनामा मंजूर केला असून, पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी
यांच्याकडे बिहारच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
****
थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी
तातडीनं कर्ज देण्यासाठीच्या निकषात बदल करण्यात आले आहेत. आता चार लाख रुपयांपर्यंत
उत्पन्न असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना, हे कर्ज मिळू शकणार आहे. वार्षिक उत्पन्न चार लाख
रुपयांच्या आत असलेले डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यावसायिक किंवा शासकीय कर्मचारी असलेले
शेतकरीही या कर्जासाठी पात्र असतील. याबाबतचा शासननिर्णय काल जारी करण्यात आला. आजी
माजी लोकप्रतिनिधी मात्र या योजनेसाठी अपात्र असतील
****
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची
व्याप्ती वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आता कृषी तसंच संलग्न पदवी अभ्यासक्रमाच्या
पात्र विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पदविकाधारक विद्यार्थ्यांना
पदवी प्रवेशासाठी, दहावी ऐवजी, पदविकेच्या शेवटच्या वर्षात ५० टक्के गुण मिळवणं आवश्यक
असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट शिथिल करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता
दिली.
****
राज्यात प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये विद्युत वितरण संनियंत्रण
समिती गठीत करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. महापालिका
क्षेत्रातले वीज ग्राहक आणि वितरण कंपनी यांच्यात सुसंवाद आणि समन्वय व्हावा
म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं शासनानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. महानगर
पालिका आयुक्तांनी महिनाभरात या समितीचं गठन करावं, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
****
महाराष्ट्र धोरण संशोधन संस्था
स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं काल घेतला. राज्य शासनाच्या
निर्णयप्रक्रियेशी संबंधित धोरणात्मक विषयांचा शास्त्रशुद्ध अभ्यास-संशोधन आणि
प्रभावी मुल्यमापनासाठी जागतिक मानांकन असलेली ही संस्था पुण्याजवळ
ताथवडे इथं कार्यान्वित होणार आहे. राज्यशासनाची
धोरणं, योजना, तसंच कार्यक्रमांचं
ही संस्था नियमितपणे
मूल्यमापन करेल. अशा प्रकारची संस्था स्थापन करणारे
महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य आहे.
****
केंद्र शासन पुरस्कृत जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी
पुनर्निर्माण अभियान - जे एन एन यू आर एम अंतर्गत मंजूर, मात्र केंद्राचं संपूर्ण अनुदान न मिळालेल्या १८ प्रकल्पांना
अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत
घेतला. या प्रकल्पांना ८० टक्के रक्कम राज्य
शासनाकडून देण्यात येणार असून, उर्वरित २०
टक्के रकमेचा
भार स्थानिक स्वराज्य संस्थांना वहन करावा लागेल. या
१८ प्रकल्पांमध्ये औरंगाबाद पाणीपुरवठा योजना, तसंच
नांदेडच्या
सिडको हडको क्षेत्र पाणीपुरवठा योजनेचा समावेश आहे.
****
कुपोषणानं बालमृत्यू झाले, तर जिल्हाधिकारी
आणि राज्याच्या मुख्य सचिवांना जबाबदार धरलं जाईल, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं
आहे. आदिवासी भागात कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंसंदर्भातल्या याचिकांच्या एकत्रित
सुनावणीवेळी न्यायालयानं ही बाब नमूद केली. आदिवासींच्या कल्याणकारी योजनांबाबत न्यायालयानं
आतापर्यंत दिलेल्या सर्व आदेशांची, राज्य सरकारनं येत्या दोन महिन्यात अंमलबजावणी करण्याचे
निर्देश न्यायालयानं दिले.
****
राज्यात अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
उद्यापासून सुरळीत सुरू होणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. या प्रवेशप्रक्रियेत कला आणि क्रीडा गुणांसह टक्केवारी गृहीत
धरली जाणार असल्याचं तावडे यांनी स्पष्ट केलं.
****
महिला
तक्रार निवारण समितीच्या अधिकारांबाबत माहितीच्या अभावामुळे या समित्या पीडितांना न्याय
मिळवून देऊ शकत नाहीत, अशी खंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर यांनी व्यक्त
केली आहे. ‘महिला तक्रार निवारण समित्यांचं सक्षमीकरण’ आणि कामाच्या ठिकाणी महिलांचं
लैंगिक छळापासून संरक्षण
अधिनियम या संदर्भात नाशिक इथं आयोजित प्रशिक्षण शिबीराचे काल रहाटकर यांच्या हस्ते
उद्घाटन झालं, यावेळी त्या बोलत होत्या.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिन आज साजरा
होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लखनऊ इथं योगदिनाचा मुख्य कार्यक्रम
होणार आहे. आकाशवाणीवरून सकाळी सहा वाजून २५ मिनिटांपासून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण
होणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं `सेलिब्रेटिंग
योग’ हे मोबाईल ॲप सुरू केलं आहे. नागरिकांना आपले अनुभव यावर अपलोड करता येणार आहेत.
योगदिनानिमित्त मराठवाड्यातही विविध
ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद शहरात योगदिनाचा मुख्य कार्यक्रम
सिडको परिसरात जवाहरलाल नेहरु अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. शहरात
इतरही शाळा, महाविद्यालयं, तसंच शासकीय कार्यालयांमधून
योग शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, काल औरंगाबादसह विविध शहरातून योगदिंडी
काढून, योगदिनाबाबत जनजागृती करण्यात आली.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरला
जाणाऱ्या, वारकयांनी राज्यभर स्वछतेच्या कामात सहकार्य केले असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक
आणि वैचारिक विकासामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं, पाणीपुरवठा आणि स्वच्छता
मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. काल पुणे इथं त्यांच्या उपस्थितीत स्वच्छता
दिंडीचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, जळगाव जिल्ह्याच्या
मुक्ताईनगर इथून निघालेली संत मुक्ताबाई यांची पालखी काल दुपारी बीड शहरात दाखल झाली.
उद्या ही पालखी पालीकडे मार्गस्थ होईल. पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं काल
शिरूर इथं पूर्वापार प्रथेप्रमाणे पायघड्या घालून स्वागत करण्यात आलं.
****
ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातला आरोपी
समीर गायकवाड याला जामीन मिळाल्याच्या निषेधार्थ काल औरंगाबाद इथं डाव्या पक्षांच्या
वतीनं निदर्शनं करण्यात आली. कोल्हापूर सत्र न्यायालयानं मंजूर केलेल्या जामीनाविरोधात
राज्य शासनानं उच्च न्यायालयात दाद मागावी, तसंच या प्रकरणात इतर सर्व आरोपींना तत्काळ
अटक करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज
पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहावं, असं आवाहन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री तथा नांदेड
जिल्हाचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केलं आहे. ते काल नांदेड इथं एका कार्यक्रमात
बोलत होते. बँकांनी आर्थिक मदत करून शेतीपूरक तसंच प्रक्रिया उद्योगाला चालना द्यावी,
असं खोतकर म्हणाले. दरम्यान, खोतकर यांनी काल विविध विभागांच्या बैठकीत जिल्ह्यातल्या
विविध विकास कामांचा आढावा घेतला.
****
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी भाईचंद
हिराचंद रायसोनी सहकारी संस्थेच्या संचालकांना २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात
आली आहे. संचालक मंडळाविरोधात औरंगाबाद इथं गुन्हा दाखल झाल्यानं, अध्यक्षासह चौदा
जणांना काल जळगाव इथून ताब्यात घेऊन, न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता, न्यायालयानं
त्यांना पोलिस कोठडी सुनावली.
****
बीड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात १२ लाख ८२ हजार वृक्षांच्या
लागवडीचं उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे, हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी योग्य
ते नियोजन करावं, असे निर्देश बीडचे जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी दिले आहेत. ते काल
वृक्ष लागवड आढावा बैठकीत बोलत होते. दरम्यान, जिल्हातल्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बँकांनी १० हजार रूपये मर्यादेपर्यंत शासन हमीवर तातडीनं
पीक कर्ज उपल्ब्ध करून द्यावं, अशा सूचनाही
जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
****
परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मृग
नक्षत्रापूर्वी आणि नंतरही चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी कपाशी तसंच मुगाची पेरणी केली होती. मात्र,
सध्या पाऊस नसल्यानं, शेतकरी वर्गातून दुबार पेरणीची
भीती वर्तवली जात आहे.
दरम्यान, औरंगाबाद शहर परिसरात काल
सायंकाळच्या सुमारास पावसानं जोरदार हजेरी लावली. पुढच्या दोन दिवसात मराठवाड्यात अनेक
ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
औरंगाबाद इथल्या साई अभियांत्रिकी महाविद्यालयाची संलग्नता डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं रद्द केली आहे. अभियांत्रिकी प्रवेशाच्या
संकेतस्थळावरून
या महाविद्यालयाचं नाव
देखील काढण्यात येणार असल्याचं,
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment