Friday, 23 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 23.06.2017 - 06.50



Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 June 2017

Time – 06.50 AM to 07.00 AM

Language - Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जून २०१७ सकाळी ०६.५० मि.

****
·      राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्यावतीनं लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांना उमेदवारी

·      जम्मू काश्मिरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद

·      प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातल्या सरकारच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळल्या

·      साहित्यिक ल.म.कडू आणि राहुल कोसम्बी यांना बाल साहित्य अकादमीचा पुरस्कार

आणि

·      भारत आणि वेस्ट इंडिज संघांदरम्यान आजपासून पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला सुरूवात

****

येत्या १६ जुलैला होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संयुक्त पुरोगामी आघाडी आणि अन्य विरोधी पक्षाच्यावतीनं लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवी दिल्ली इथं काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या बोलावण्यात आलेल्या बैठकीनंतर मीरा कुमार यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली. या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, यांच्यासह इतरही विरोधी पक्षांचे सदस्य उपस्थित होते.

****

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेले रामनाथ कोविंद यांना तामिळनाडूतल्या सत्तारूढ अण्णा द्रमुकनं आणि माजी मुख्यमंत्री पनीर सेल्वम यांच्या अण्णाद्रमुक पीटीएनं आपला पाठिंबा जाहीर केला आहे. कोविंद आज आपला अर्ज दाखल करणार आहेत.

****

उत्पादन शुल्क, सेवा कर आणि वॅट भरणाऱ्या व्यवसायिकांना येत्या २५ जून पासून जीएसटी अंतर्गत पुन्हा नोंदणी करता येणार आहे. व्यवसायिक जीएसटीएन या संकेतस्थळावर ही नोंदणी करु शकतील, असं महसूल सचिव हसमुख अधिया यांनी सांगितलं. या नोंदणीचे दोन टप्पे या आधीच झाले असल्याचं ते म्हणाले. 

****

वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासाठी मदत केल्याबद्दल सर्व राज्यांचे मुख्यमंत्री राजकीय पक्ष आणि सहकार्य  करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करणारा ठराव काल केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुर करण्यात आला. या प्रस्तावात वस्तू आणि सेवा कर प्रणालीला देशातला सर्वात मोठा कर सुधार आणि जगातल्या कुठल्याही लोकशाही व्यवस्थेततला सर्वात मोठा अप्रत्यक्ष कर सुधार असल्याचं म्हटलं आहे.

****

जम्मू काश्मिरमध्ये  नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर ॲक्शन टीम –बॅट तुकडीनं पूंछ सेक्टरमध्ये भारताच्या सीमेत घुसून भारतीय लष्करावर केलेल्या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले, यात औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातल्या केळगाव इथला नाईक संदीप जाधव आणि कोल्हापूर जिल्ह्यातला श्रावण माने या जवानांचा समावेश आहे. काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही दहशतवाद्यांसह पाकिस्तानच्या या तुकडीनं नियंत्रण रेषा ओलांडून हा हल्ला केला. भारतीय लष्करानं या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार केला आहे.

****

राज्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून राज्य शासनाचे सर्व अधिकारी, कर्मचारी येत्या जुलै महिन्यातलं एका दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. याबाबतचा शासन आदेश सामान्य प्रशासन विभागानं जारी केला असून आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या बळीराजाला आर्थिक मदत करण्यासाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचं वेतन स्वेच्छेनं द्यावं असं आवाहन राज्य शासनानं केलं आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या सर्व मंत्री, खासदार आमदारांसह विविध स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांनी एक महिन्याचं वेतन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

****

पुणे महापालिकेचा देशातला पहिला बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्याचा शुभारंभ काल मुंबई शेअर बाजारमध्ये करण्यात आला. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. म्युनिसिपल बॉण्ड मार्केटही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना पुणे महापालिकेनं प्रत्यक्षात आणली असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. देशातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावा, असं आवाहन नायडू यांनी यावेळी केलं. शहरे ही विकासाचा पाया आहेत, त्यामुळे नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी महापालिकांनी अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घ्यावेत, असं ते म्हणाले.

****

इस्त्राईलच्या शेती प्रयोगांना राज्यात राबवण्याचा विचार केला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. इस्त्राईलचे राजदूत डॅनिअल कार्मन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. इस्त्राईलच्या मोशाव पद्धतीच्या शेतीचा राज्यातल्या शेतकऱ्यांना कसा उपयोग होईल, या दृष्टीने प्रयत्न करतानाच शेतीसह शेतीपूरक उद्योग, पशुसंवर्धन आणि इतर विभागांनाही याचा काय फायदा होईल हे तपासलं जाईल, असं ते म्हणाले.

****

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासंदर्भातल्या शासन निर्णयास आव्हान देणाऱ्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं काल फेटाळल्या. त्यामुळं राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागानं  गेल्या २७ फेब्रुवारी ला काढलेला बदल्यांच्या नव्या धोरणांचा निर्णय कायम राहिला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघासह वैयक्तिक  २० याचिका खंडपीठात दाखल करण्यात आल्या होत्या.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

बाल साहित्य अकादमीचा २०१७ वर्षासाठीचा मराठी भाषेसाठीचा बाल साहित्य पुरस्कार  ‘खारीच्या वाटा’ या कादंबरीसाठी साहित्यिक ल.म.कडू यांना तर ‘युवा पुरस्कार’ ‘उभं- आडवं’ या कथा संग्रहासाठी राहुल कोसम्बी यांना जाहीर झाला आहे. बाल साहित्य अकादमीचे अध्यक्ष प्रसाद तिवारी यांनी काल हे पुरस्कार घोषित केले. देशातल्या २४ भाषांमधले लेखक आणि त्यांच्या कलाकृतींची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. बालदिनाचं औचित्य साधून येत्या  १४ नोव्हेंबर  रोजी हे पुरस्कार  प्रदान करण्यात येणार आहेत. ताम्रफलक आणि ५० हजार रूपये असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे.

****

संजय गांधी निराधार योजनेमध्ये अपात्र लाभार्थ्यांना पात्र ठरवून, प्रशासन आणि लाभार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडचे तत्कालीन  तहसीलदार राहुल गायकवाड यांना विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी काल निलंबित केलं. याप्रकरणी त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या योजनेत पात्र – अपात्र लाभार्थ्यांचा ताळमेळ न घालता २ हजार २४९ लाभार्थ्यांना पात्र दाखवून मंजूरी दिल्याचं चौकशीअंती निर्दशनास आल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

****

मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी चालू आर्थिक वर्षासाठीच्या दुसऱ्या टप्प्यात ६३ कोटी ३३ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे  अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी काल मुंबईत दिली. शेततळ्यांसाठी या योजनेअंतर्गत आपले सरकार वेब पोर्टल किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरून शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतात, अस रावल यांनी सांगितलं.

****

उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं चुकीचा प्रस्ताव दाखल करून काम सुरू केलं असल्याचा आरोप नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना केला. अटल अमृत योजनेअंतर्गत या पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू करण्यात आल्याचं ते म्हणाले. प्राधिकरणानं शहरातल्या पाणी वितरणाचं नियोजन व्यवस्थित न केल्यामुळेच शहरात पाणी टंचाई जाणवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

****

नांदेड जिल्ह्यात मागील पाच दिवसांत पावसाचा खंड पडला असून, आतापर्यंत ५० टक्के खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणी झालेल्या शेत जमीनीला चांगल्या पावसाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****

बीड जिल्ह्यातल्या आष्ठी इथं घड्याळ दुरुस्ती आणि झेरॉक्स दुकानात नव्या बनावट नोटांची छपाई करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. बीडच्या दरोडा प्रतिबंधक पथकानं ही कारवाई केली. या दोघांकडे सापडलेल्या नोटांमध्ये दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास आणि दहा रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. ही रक्कम दोन लाख १५ हजार इतकी आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुर्यभान मुंडे यांची, तर उपसभापतीपदी काँग्रेसचे विजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनलचा विजय झाला.

****

बीड इथं वीज वितरण कपंनीतल्या वीज तंत्रज्ञ कर्मचाऱ्यानेच वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अधिक्षक अभियंता यांनी धाड टाकून ही कारवाई केली असून, कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

****

ऑस्ट्रेलियाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत काल भारताचे पी व्ही सिंधू, सायना नेहवाल, के श्रीकांत आणि बी साई प्रणीत हे खेळाडू उपान्त्यपूर्व फेरीत दाखल झाले आहेत. पुरुष एकेरीत श्रीकांतनं कोरियाच्या सोनवान होऱ्याला तर साई प्रणीतनं चीनच्या वांग यिआंग याला पराभूत केलं.  पी व्ही सिंधूनं चीनच्या चेन जियाओ जिंग हिला तर सायना नेहवालनं मलेशियाच्या सोनिया चेआहचा पराभव केला.

****

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघांदरम्यान आजपासून पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होत आहे. हा पहिला सामना वेस्ट इंडिजच्या पोर्ट ऑफ स्पेन इथं खेळला जाणार आहे.

****

No comments: