Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 23 June 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जून २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
पारपत्र आत इंग्रजी बरोबर हिंदी
भाषेतही मिळणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे.
नवी दिल्ली इथं पारपत्र कायदा एकोणीसशे सदूसष्ठला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित
कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या. आठ वर्षांखालच्या बालकांसाठी आणि ६० वर्षांवरच्या
वृद्धांसाठी पारपत्र फी मध्ये १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्या म्हणाल्या.
पारपत्रावर असलेली खासगी माहितीही यापुढे फक्त इंग्रजी मधून छापून येणार असल्याचंही
स्वराज यांनी यावेळी सांगितलं.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ
- सीबीएसईनं जाहीर केलेल्या वैद्यकीय पात्रता प्रवेश परिक्षा - नीटच्या निकालात पंजाबच्या
नवदीप सिंगनं देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. मध्य प्रदेशच्या आर्चित गुप्तानं दुसरा,
तर मध्य प्रदेशच्याच मनिष मुलचंदानीनं तिसरा क्रमांक मिळवला. सात मे रोजी झालेल्या
या परिक्षेत सहा लाख ११ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
****
श्रीनगर इथं जमावानं पोलीस उपअधीक्षकाला
बेदम मारहाण करून त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. मोहम्मद अयूब पंडित असं या
पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. काल रात्री जामा मशिदीबाहेर ही घटना घडली. आयूब यांनी नमाजादरम्यान
केलेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाले होते, त्यामुळे चिडलेल्या जमावानं त्यांची हत्या
केल्याचं सांगण्यात आलं आहे. या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. एक आरोपी
फरार असून त्याची ओळख पटली असल्याचं पोलीस महासंचालक एस.पी वैद यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या
रविवारी २५ तारखेला आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या मालिकेचा हा तेहतिसावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
दिव्यांगांना अपंगत्वाचं संगणकीय
प्रमाणपत्र त्वरित मिळावं, यासाठी राज्यात मिशन झिरो पेंडन्सी अभियान सुरू करणार आहे.
तसंच मूकबधिर विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी विशेष महाविद्यालय स्थापन करण्याचा
विचार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं. मुंबई इथं आयोजित
‘आत्ममग्नता जाणीव जागृती कार्यशाळे’चं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. दिव्यांगांसाठी
असलेला चार टक्के निधी योग्य प्रकारे खर्च व्हावा, यासाठी तालुकास्तरापर्यंत समित्यांची
स्थापना करण्यात आली असल्याचं ते म्हणाले. पॅरा-ऑलिम्पिकमध्ये यशस्वी कामगिरी केलेल्या
दिव्यांग खेळाडूना दिव्यांग खेळरत्न पुरस्कारानं सन्मान, त्यांना राज्य शासनाच्या सेवेत
थेट सामावून घेणं, पहिली ते बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना
विशेष सोयीसुविधा देणं, विशेष शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी समिती स्थापन करणं असे अनेक
महत्त्वाचे निर्णय राज्य शासनानं घेतले असल्याचं बडोले यांनी सांगितलं.
****
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी
आज मुंबई इथं माय प्लांट या मोबाईल अॅपची सुरुवात केली. या ॲपच्या माध्यमातून जनतेला
वृक्ष लागवडीची माहिती शासनापर्यंत पोहोचवता येईल. राज्यात लोकसहभागातून येत्या एक
जुलै ते सात जुलै या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवडीचा वन विभागाचा संकल्प आहे. हे
अभियान सर्वांनी मिळून यशस्वी करण्याचं आवाहन वनमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
‘ओला’ या प्रवासी वाहतूक क्षेत्रातल्या
कंपनीनं महाराष्ट्र राज्यातल्या २० हजार तरुणांना येत्या पाच वर्षांत प्रवासी वाहतूक
व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला
आहे. या माध्यमातून तरुणांना सूक्ष्म उद्योजक बनवण्यासाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमती दर्शवली आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात पाऊस थांबल्यानं
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस
झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. परंतू त्यानंतर पावसानं उघडीप
घेतल्यानं खामगाव, शेगाव, नांदुरा आदी तालुक्यांमध्ये दुबार पेरणीचं संकट असून, मोताळा,
चिखली, देऊळगाव राजा इथल्या पेरण्या अद्याप खोळंबल्या असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं
दिली आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडिज या दोन
संघांदरम्यान आजपासून पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होत आहे.
आजचा पहिला सामना वेस्ट इंडिजच्या पोर्ट ऑफ स्पेन इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार
संध्याकाळी साडे सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत
भारतीय बॅडमिंटमपटू पी व्ही सिंधू आणि सायना नेहवालला महिला एकेरीत उपउपान्त्य फेरीच्या
सामन्यात पराभव पत्करावा लागला.
तर पुरुष एकेरीत के श्रीकांत
उपान्त्य फेरीत पोहोचला आहे. आज झालेल्या उपान्त्य पूर्व सामन्यात श्रीकांतनं भारताच्याच
बी साई प्रणितचा २५-२३, २१-१७ असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment