Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 June 2017
Time – 06.50 AM to 07.00 AM
Language - Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जून २०१७ सकाळी ०६.५० मि.
****
·
राष्ट्रपती पदाचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा उमेदवारी
अर्ज दाखल
·
स्मार्ट सिटी योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहराचा समावेश
·
वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षा - एनईईटीचा निकाल जाहीर; अनुसूचित जाती प्रवर्गात
लातूरचा विवेक शामंते देशात पाचवा
आणि
· औरंगाबाद शहरात एका पेट्रोल पंपावर मापात तूट होत
असल्याचं उघड; महत्त्वाची उपकरणं पोलिसांच्या ताब्यात
****
राष्ट्रपती पदाचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार
रामनाथ कोविंद यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप
अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले अनेक सदस्य तसंच भाजपशासित राज्यांचे
मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. अर्ज सादर केल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना कोविंद
यांनी, राष्ट्रपती पद हे लोकशाहीचं सर्वात मोठं पद असून, या पदाची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी
प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.
****
केंद्रीय नागरी विकास मंत्रालयानं स्मार्ट सिटी
योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यातल्या ३० शहरांची यादी काल जाहीर केली. यात पिंपरी चिंचवड
शहराचा समावेश आहे. या ३० शहरांमध्ये विविध सोयी -सुविधा पुरवण्यासाठी या योजनेतंर्गत ५७
हजार ३९३ कोटी रूपये गुंतवणूक करण्यात येणार आहे. आतापर्यंत या योजनेत देशातल्या ९० शहरांची निवड करण्यात आली असून यामध्ये
महाराष्ट्रातल्या औरंगाबाद सह ११ शहरांचा
समावेश करण्यात आला आहे.
****
अटल नागरी पुनर्निर्माण
आणि परिवर्तन - ‘अमृत’ योजनेअंतर्गत राज्याला ४७ कोटी
रुपयांचा प्रोत्साहन निधी प्राप्त झाला आहे. काल नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय
कार्यशाळेत केंद्रीय नागरी विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्याच्या नगर विकास विभागाच्या
प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला. नव्या प्रकल्पांमध्ये सुधारणा आणि क्षमता
विकासासाठी हा निधी
खर्च
करण्यात येणार आहे.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
- इस्रोनं कार्टोसॅट दोन या मालिकेतल्या दोन भारतीय उपग्रहासह एकूण ३१ उपग्रहांचं काल
यशस्वी प्रक्षेपण केलं, आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथून काल सकाळी पीएसएलव्ही
सी ३८ या यानातून हे उपग्रह अवकाशात झेपावले. हे उप्रगह संरक्षण क्षेत्रात सहायक ठरणार
आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या
रविवारी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रम श्रृंखलेचा हा तेहतिसावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात
येणाऱ्या विविध १७ वस्तूंचा लाभ थेट त्यांच्या खात्यात देण्यात येणार असून त्यापैकी
६० टक्के रक्कम वितरित करण्यात आली आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी काल
नाशिक इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आदिवासी विकास विभागात झालेल्या गैरव्यवहार
प्रकरणात न्यायमूर्ती गायकवाड समितीच्या अहवालानुसार दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल
असं त्यांनी सांगितलं.
****
दिव्यांगांना अपंगत्वाचं संगणकीय
प्रमाणपत्र त्वरित मिळावं, यासाठी राज्यात मिशन झीरो पेंडन्सी अभियान सुरू होणार आहे. सामाजिक न्याय मंत्री
राजकुमार बडोले यांनी काल मुंबई इथं आयोजित ‘आत्ममग्नता जाणीव जागृती
कार्यशाळे’त ही माहिती दिली. दिव्यांगांसाठी असलेला
चार टक्के निधी योग्य प्रकारे खर्च व्हावा, यासाठी तालुकास्तरापर्यंत
समित्यांची स्थापना करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. मूकबधिर विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी
विशेष महाविद्यालय स्थापन करण्याचा सरकारचा विचार असल्याचं बडोले यांनी
सांगितलं.
****
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी काल मुंबई इथं माय प्लांट या मोबाईल अॅपचं लोकार्पण केलं. या ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्यांना वृक्ष लागवड मोहिमेत
सहभागाची माहिती शासनापर्यंत पोहोचवता येईल. राज्यात लोकसहभागातून येत्या एक
जुलै ते सात जुलै या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवडीचा वन विभागाचा संकल्प आहे. हे
अभियान सर्वांनी मिळून यशस्वी करण्याचं आवाहन वनमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात वृक्ष संवर्धन कक्ष स्थापन करण्यात
आला आहे. नागरिकांना आपल्या परिसरात वृक्षारोपण
करण्याच्या दृष्टीनं या कक्षाला भेट देता येईल. तसंच १८०० -२३३-८१७१ या मोफत क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेता येईल.
दरम्यान, शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेत औरंगाबाद विभागासाठी
७५ लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आहे. नागरिकांनी खाजगी पडीक क्षेत्र, शेताचे
बांध, अंगण-परसबाग, शाळा महाविद्यालयं परिसर, तसंच मोकळ्या मैदानांवर वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन विभागीय आयु्क्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी केलं
आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण
मंडळ - सीबीएसईनं वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षा - एनईईटीचा निकाल काल जाहीर केला.
या निकालात पंजाबच्या नवदीप सिंगनं देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. पुण्याच्या अभिषेक
डोग्रानं देशातून पाचवा, तर राज्यातून पहिला क्रमांक पटकावला. लातूरच्या राजर्षी शाहु
महाविद्यालयातला विवेक विठ्ठल शामंते हा अनुसूचित जाती प्रवर्गात देशात पाचवा तर याच
प्रवर्गात याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी नेहा गोविंद बास्टे हिनं देशभरातून १९ वा
क्रमांक पटकावला. या परीक्षेसाठी केलेल्या तयारीबाबत विवेक शामंते यानं आमच्या वार्ताहराला
अधिक माहिती दिली.
कॉलेजचा टाईमटेबल सकाळी सात ते सहा होता. आणि संध्याकाळी
पूर्ण आम्ही सेल्फस्टडी करत होतो. आणि इथं प्रशस्त रिडींग असल्यामुळे मी इथच अभ्यास
करत होतेा. रात्री पुन्हा १ वाजेपर्यंत घरी अभ्यास करत होतो. आणि कॉलेजमध्ये इथं दरवीक
च्या सिलॅबसनं दर रविवारी एक्झाम होत होत्या.
*****
औरंगाबाद शहरातल्या पेट्रोल
पंपांच्या तपासणीत एका पेट्रोलपंपावर मापात तूट होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. ठाणे
गुन्हे शाखा, औरंगाबाद गुन्हे शाखा आणि वजन- मापे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या
संयुक्त तपासणीत लीटरमागे सुमारे ५५ ते ७५ मिलीलीटर पेट्रोल कमी दिलं जात असल्याचं
निदर्शनास आलं आहे. मापात तूट आढळल्यामुळे या पंपावरची महत्त्वाची उपकरणं पोलिसांनी
ताब्यात घेतली आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातला हुतात्मा जवान संदीप जाधव यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी सिल्लोड तालुक्यात केळगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार
आहेत. जम्मू - काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात परवा २२ जूनला गुरुवारी संदीप जाधव यांना वीर मरण आलं.
****
परभणी इथं तूर उत्पादक शेतकऱ्यांनी काल दुपारी शहरातील
उड्डाणपुलावर रास्ता रोको आंदोलन केलं. शहरात शासनाचं हमीभाव तूर खरेदी केंद्र १० जून रोजी बंद झालं. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे तूर खरेदीबाबत टोकन असूनही त्यांची तूर खरेदी करण्यात आलेली
नाही. ही तूर खरेदी केली जावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात
आलं.
****
नांदेड जिल्ह्यात काल संध्याकाळी
अनेक ठिकाणी पाऊस झाला. नांदेड
आणि नायगांव परीसरात दमदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना जिल्ह्यातही काल अनेक
ठिकाणी सुमारे तासभर पाऊस झाला. बीड शहरासह जिल्ह्यातही काल संध्याकाळी पावसाच्या हलक्या
सरी कोसळल्या त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाल्यानं, शेतकऱ्यांमध्ये
समाधानाचं वातावरण आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या
औसा तालुक्यात उजनी इथं काल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं शासनाच्या
विविध कल्याणकारी योजनांच्या जनजागृतीसाठी विशेष प्रचार अभियान राबवण्यात आलं. विविध
विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. राज्याच्या
महसूल विभागाच्या वतीनं यावेळी महाराजस्व अभियान राबवून, विविध दाखल्यांचं वाटप करण्यात आलं.
****
लातूर शहराला २४ तास पाणी
पुरवठा करण्यासाठी कटीबद्ध असल्याचं लातूरचे महापौर सुरेश पवार यांनी म्हटलं आहे. अमृत
योजनेअंतर्गत शहरात गांधी चौक ते कन्हेरी चौक या दरम्यान नूतन जलवाहिनीच्या कामाचं
उद्घाटन महापौरांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या
या जलवाहिनीचं काम महिनाभरात पूर्ण होईल, असं पवार यांनी सांगितलं.
****
ऑस्ट्रेलियन खुल्या बॅटमिंटन
स्पर्धेत भारतीय बॅटमिंटनपटू किदंबी श्रीकांत उपान्त्य फेरीत पोहोचला आहे. काल झालेल्या
उपान्त्यपूर्व सामन्यात श्रीकांतनं भारताच्याच बी साई प्रणितचा २५-२३, २१-१७ असा पराभव
केला. भारताच्या पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल या दोन्ही बॅटमिंटनपटूंचं आव्हान उपान्त्यपूर्व
फेरीत संपुष्टात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment