Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 June 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जून २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला असला तरी तो समाधानकारक नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक जिल्ह्यातल्या येवला इथं शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
२०१७ पर्यंतच्या सर्व थकबाकीदारांना कर्जमाफी दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी
केली. सरकारनं दीड लाख रुपयांपर्यंत दिलेल्या कर्ज माफीचा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या
काही शेतकऱ्यांना लाभ होणार असला तरी सर्वच शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही, असं ते
म्हणाले. शेतमालाला हमी भाव द्यावा आणि स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी यासाठी
आता लढा देणार असल्याचं
ते म्हणाले.
****
दरम्यान, शेतकरी
कर्जमाफीच्या
निर्णयावर शेतकऱ्यांच्या सुकाणू
समितीच्या सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाचा लाभ फक्त मराठवाडा आणि
विदर्भातल्या शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं
समितीनं म्हटलं आहे.
****
मुंबईसह पुणे, नाशिक शहरात आज
मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे जिल्ह्याल्या पुनर्वसन केलेल्या माळीण गावातही मुसळधार
पाऊस सुरु आहे. पहिल्याच पावसात गावातले रस्ते खचले असून, घरांच्या भिंतींनाही भेगा
पडल्या आहेत. त्यामुळे गावकरी स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत. या सर्व गावकऱ्यांना
आवश्यक ती मदत पाठवली असल्याचं जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.
****
ईद उल फित्र - रमजान ईदनिमित्त राज्यपाल सी
विद्यासागर राव यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. रमजानच्या माध्यमातून व्यापक सामाजिक
एकात्मतेचा संदेश मिळतो, असं ते म्हणाले. रमजान ईदचा सण सर्वांच्या जीवनात सुख, समाधान
आणि समृद्धी घेऊन येवो तसंच त्यातून परस्पर बंधुभाव वृद्धिंगत होवो अशी अपेक्षा त्यांनी
व्यक्त केली.
****
जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरमधल्या
पांथा चौक इथं आज झालेल्या चकमकीत दोन दहशवादी ठार झाले. आज पहाटे सुरू झालेल्या या
चकमकीत लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत.
दरम्यान, राजौरी जिल्ह्यातनौशेरा
सेक्टर इथं पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळी रहिवासी भागांवर
गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनी या हल्ल्याला
चोख प्रत्यूत्तर दिलं.
****
अफगाणिस्तानात सलमा धरणावर झालेल्या
तालिबानी हल्ल्यात १० अफगाण जवान शहीद झाले. यावेळी झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना
कंठस्नान घालण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे पंतप्रधान अशरफ घनी
यांनी या धरणाचं लोकार्पण करुन, त्याला भारत अफगाणिस्तान मैत्री धरण असं नाव दिलं होतं.
****
नेपाळ आणि भूतान या देशांत जाण्यासाठी
आधार कार्ड वैध मानलं जाणार नसल्याचं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. नेपाळ आणि भूतानला
भेट देण्यासाठी व्हिसा आवश्यक नाही, मात्र वैध पारपत्र असणं अनिवार्य आहे. भारतीय नागरिक
मतदार ओळखपत्राच्या आधारेही या देशांना भेटी देऊ शकतील. नेपाळ आणि भूतानला भेट देणाऱ्या
६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि १५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पर्यटकांना
वयाचा दाखला सोबत बाळगणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
****
विदर्भ तसंच मराठवाड्यातून अंबाजोगाई
मार्गे पंढरपूरला सुमारे २७४ दिंड्या जातात, छोट्या दिंड्यातल्या वारकऱ्यांची गैरसोय
टाळण्यासाठी या सर्व दिंड्या एकत्रित करून, संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या
पालखीसोबत जाव्यात, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं, अश्वरिंगण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष
नंदकिशोर मुंदडा यांनी म्हटलं आहे. संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या दिडींतला,
मराठवाड्यातला एकमेव अश्वरिंगण सोहळा काल अंबाजोगाई इथं झाला, त्यावेळी मुंदडा बोलत
होते. दरम्यान, संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या पालख्या आज पंढरपूरकडे मार्गस्थ
झाल्या.
****
मुंबईतलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भवन पाडल्याच्या निषेधार्थ आज औरंगाबाद शहरात क्रांती चौक ते भडकल गेट असा मोर्चा काढण्यात
आला. यात विविध दलित संघटना, डाव्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी
झाले होते. माजी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर कारवाई न करता राज्य सरकार
त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
****
राजर्षी शाहु महाराज जयंती आणि
आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त उद्या औरंगाबाद इथं समता आणि व्यसनमुक्ती
दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. जय विश्वकर्मा सर्वोदय संस्था आणि समाज कल्याण विभागातर्फे
आयोजित ही दिंडी उद्या सकाळी आठ वाजता भडकल गेट परिसरातून निघणार आहे. विविध सामाजिक
संस्था, विद्यार्थी, नागरिकांनी यात सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं
आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान
सुरु असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज पोर्ट ऑफ स्पेन
इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामन्याला सुरुवात होईल.
या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता.
****
No comments:
Post a Comment