Thursday, 29 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.06.2017 - 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२९ जून २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

सरकारनं आधार क्रमांक पॅन क्रमांकाशी जोडणं बंधनकारक केलं असून येत्या एक जुलैपासून या नियमाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या वित्त विधेयकातील नियमानूसार आयकर भरणा करण्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. तसंच वेगवेगळ्या पॅन कार्डच्या सहाय्यानं होणाऱ्या करचुकवेगिरीचा शोध घेण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. देशभरातील जवळपास दोन कोटी जनतेनं आपला आधार क्रमांक पॅन क्रमांकाशी जोडून घेतला आहे.

****

मतदार यादीत आतापर्यंत नावं समाविष्ट न झालेल्या नागरिकांची नावं, मतदार यादीमध्ये यावीत यासाठी, निवडणूक आयोग येत्या  एक जुलैपासून एक विशेष मोहीम राबवणार आहे. यामध्ये प्रथम मतदान करणाऱ्या युवकांवर विशेष लक्ष पुरवण्यात येणार आहे.

दरम्यान, लातूर जिल्ह्यातल्या अठरा ते एकवीस वर्षं वयोगटातल्या प्रथम मतदारांच्या नोंदणीसाठी, येत्या एक ते एकतीस जुलै दरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती, लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली आहे. नवमतदारांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, प्राध्यापक राम शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरता मुख्यमंत्री सहाय्यता निधीस स्वत:चं वेतन दिलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी आमदारांनी आपलं एक महिन्याचं वेतन द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. राज्यात सर्वप्रथम अहमदनगरच्या आमदारांनी हे वेतन दिलं आहे

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातल्या केळगांव इथं, शहीद संदीप जाधव यांच्या नावानं व्यायामशाळा काढण्यात येईल, त्यासाठी ग्रामविकास मंत्रालयातर्फे २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, असं ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल सांगितलं. शहीद जाधव यांच्या कुटूंबियांची मुंडे यांनी केळगाव इथं भेट घेतली, त्यावेली त्या बोलत होत्या.

****

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगानं शिफारस केलेल्या भत्त्यांमध्ये काही सुधारणा करत, केंद्रीय मंत्रीमंडळानं काल या शिफारशींना मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 17 December 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छ...