Thursday, 22 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 22.06.2017 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 June 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जून २०१ दुपारी .००वा.

****

भारत आणि रशियानं उभय देशांदरम्यान सहकार्य वाढवण्यासाठी अंतराळ आणि सागरी तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, समुद्राशी संबंधित अभियांत्रिकीसह विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राची निवड केली आहे. रशियामध्ये भारत-रशिया संयुक्त समितीच्या बैठकीत या क्षेत्रांची निवड करण्यात आली. अर्थमंत्री अरुण जेटली आणि रशियाचे उपपंतप्रधान दमित्री रोगोजिन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मेक इन इंडिया हा उपक्रम औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचा असल्याचं मत रोगोजिन यांनी यावेळी व्यक्त केलं.  

****

भारतीय रोखे आणि विनिमय महामंडळ-सेबीनं थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला मदत व्हावी, या दृष्टीनं नोंदणीकृत कपंन्यांची मालमत्ता ताब्यात घेण्याबाबतचे नियम शिथिल केले आहेत. सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी मुंबई इथं झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.

****

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य मोहीमेअंतर्गत, क्षयरोग नियंत्रण योजनेतल्या लाभार्थींना आता आधार क्रमांक द्यावा लागेल. केंद्रीय आरोग्य विभागानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली. ज्या क्षयरोगग्रस्त नागरिकांकडे आधार क्रमांक नाही, त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी, असं मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

ठाणे जिल्ह्यात कल्याणमधल्या नेवाळी विमानतळासाठी सरकारनं जबरदस्तीनं जमिनी संपादित केल्याच्या विरोधात शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन सुरु आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी डोंबिवली-बदलापूर रस्त्यावर डावलपाडा गावाजवळ पोलिसांच्या गाड्या पेटवल्या. आपल्याच मालकीच्या शेतजमिनींवर पेरणी करण्यास मज्जाव केल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी टायर जाळून मलंग गडाकडे जाणारा मुख्य रस्ता बंद केला. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****

राज्यात मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना राबवण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी तसंच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतमालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी ही योजना सुरु करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. यामध्ये फळं आणि भाजीपाला यांच्यासाठीचे प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार असून, २०१७-१८ पासून पुढची पाच वर्ष ही योजना राबवण्यात येणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यात मागील पाच दिवसांत पावसाचा खंड पडला असून, आतापर्यंत ५० टक्के खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणी झालेल्या शेत जमीनीला चांगल्या पावसाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****

हिंगोली जिल्ह्यातल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाचे जयप्रकाश दांडेगावकर यांच्या पॅनलनं १६ जागा मिळवत सलग चौथ्यांदा सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे विधिज्ञ शिवाजी जाधव यांच्या गटाला पाच जागा मिळाल्या. तर शिवसेनेचे आमदार जयप्रकाश मुंदडा यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.

****

ऑक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्यानं स्थापित झालेल्या बीड तालुक्यातल्या १४१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला. बीडचे तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलावून ग्रामपंचायतनिहाय प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षण सोडत आजपासून येत्या २६ जूनपर्यंत काढण्यात येणार आहेत.

****

बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं घड्याळ दुरुस्ती आणि झेरॉक्स दुकानात नव्या बनावट नोटांची छपाई करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. बीडच्या दरोडा प्रतिबंधक पथकानं ही कारवाई केली. या दोघांकडे सापडलेल्या नोटांमध्ये दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास आणि दहा रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. ही रक्कम दोन लाख १५ हजार इतकी आहे.

****

औरंगाबाद एमआयडीसी पोलीस ठाण्यातल्या दोघा अधिकाऱ्यांना लाच मागितल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. भंगारचे पकडलेले दोन ट्रक सोडवण्यासाठी आठ लाख रूपयांची लाच त्यांनी मागितली होती.

****

ऑस्ट्रेलिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू के श्रीकांत आणि बी साई प्रणित पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. तर पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांचे उपान्त्यपूर्व फेरीचे सामने आज सामने होणार आहेत. 

****

लंडन इथं सुरु असलेल्या हॉकी विश्व लीग सेमीफायनल स्पर्धेत भारताचा उपान्त्यपूर्व सामना आज मलेशिया विरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारत ब गटात दुसऱ्या स्थानावर आहे.  

****

No comments: