Saturday, 24 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 24.06.2017 - 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२४ जून २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

औरंगाबाद जिल्ह्यातला हुतात्मा जवान संदीप जाधव यांचा पार्थिव देह औरंगाबाद इथं आणण्यात आला असून, आज सिल्लोड तालुक्यात केळगाव इथं शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जम्मू - काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात २२ जूनला संदीप जाधव यांना वीरमरण आलं.

दरम्यान, जाधव यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ करणार असल्याचं आमदार सतीश चव्हाण यांनी जाहीर केलं आहे.

****

ऑस्ट्रेलिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू के श्रीकांत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आज झालेल्या उपान्त्य सामन्यात श्रीकांतनं चीनच्या युकी शी चा २१-१०, २१-१४ असा पराभव केला.

पी व्ही सिंधू आणि सायना नेहवालचा उपउपान्त्य फेरीत पराभव झाल्यानं या स्पर्धेत महिला एकेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

****

अटल नागरी पुनर्निर्माण आणि परिवर्तन - अमृत योजनेअंतर्गत महाराष्ट्राला ४७ कोटींची प्रोत्साहन राशी प्रदान करण्यात आली. केंद्रीय नगर विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते महाराष्ट्र नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी ही प्रोत्साहन राशी स्वीकारली. नवी दिल्ली इथं आयोजित ‘शहरी परिवर्तन’ या राष्ट्रीय कार्यशाळेत नायडू यांच्या हस्ते अमृत योजनेतंर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशातल्या १६ राज्यांना एकूण ५०० कोटी रूपयांची राशी प्रदान करण्यात आली.

****

नांदेड ते अजनी नागपूर या उन्हाळी विशेष साप्ताहिक रेल्वे गाडीला जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी नांदेड इथून दर सोमवारी रात्री साडे आठ वाजता सुटेल आणि मंगळवारी सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास अजनी नागपूर इथं पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दर मंगळवारी रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी अजनी नागपूर इथून सुटेल आणि बुधवारी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी नांदेड इथं पोहोचेल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 17 December 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छ...